करेंगे दंगे चारो ओर..; विधानभवनातल्या राड्यानंतर कुणाल कामराचा सरकारवर जिव्हारी लागणारा वार

विधानभवनातल्या राड्यावरून कॉमेडियन कुणाल कामराने महायुती सरकारला डिवलचं आहे. उपरोधिक कवितेसह त्याने सरकारवर जिव्हारी लागणारा वार केला आहे. गुरुवारी संध्याकाळी विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही हाणामारी झाली होती.

करेंगे दंगे चारो ओर..; विधानभवनातल्या राड्यानंतर कुणाल कामराचा सरकारवर जिव्हारी लागणारा वार
Kunal Kamra on Maharashtra Assembly scuffle
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 18, 2025 | 9:48 AM

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गुरुवारी संध्याकाळी भिडले. त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली आणि त्यात एकमेकांचे कपडेही फाडण्यात आले. या घटनेवरून आता कॉमेडियन कुणाल कामराने सरकारला डिवचलं आहे. हाणामारीच्या व्हिडीओवर उपरोधिक कविता करत त्याने निशाणा साधला आहे. ‘होंगे नंगे चारो ओर, करेंगे दंगे चारो ओर..’ अशा शब्दांत त्याने महायुती सरकारवर टीका केली आहे. हाणामारीच्या घटनेचा व्हिडीओ एडिट करून त्यावर कुणालने त्याची ही उपरोधिक कविता सादर केली आहे. ‘कायदा मोडणारे’ असं कॅप्शन देत कुणालने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडताना दिसत आहेत. त्यानंतर पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही झलक पहायला मिळते.

‘होंगे नंगे चारो ओर, करेंगे दंगे चारो ओर
पुलिस के पंगे चारो ओर… एक दिन
मन में नथुराम, हरकतें आसाराम
हम होंगे कंगाल एक दिल’

अशी कविता त्याने या व्हिडीओला जोडली आहे. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना दिल्या असून त्याच अहवाल आल्यावर हाणामारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. ही घटना अतिशय चुकीची आहे. विधान भवनाचा परिसर विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्या अखत्यारित येत असून त्यांनी याची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

नेमकं काय घडलं?

गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात बुधवारी विधान भवनाच्या प्रवेशद्वारात जोरदार भांडण झालं होतं. आव्हाड विधानसभेत असताना बाहेर त्यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख काही कार्यकर्त्यांसोबत उभे होते. तेव्हा पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी ‘हा काल भांडणाच्या वेळी तिथे होते, त्याला धरा’ असं सांगून हाणामारी सुरू केली. तेव्हा आव्हाडांचे कार्यकर्तेही त्यांना भिडले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्यांना ओढून बाजूला केलं आणि हाणामारी कऱणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांना स्वतंत्र खोल्यांमध्ये नेलं. हा प्रकार पडळकर यांच्या सूचनेनुसार झाल्याचा आव्हाड समर्थकांचा आरोप आहे. तर पडळकर यांनी केवळ दिलगिरी व्यक्त करत त्यावर अधिक बोलणं टाळलं.