Nashik, Ahilyanagar, Jalgaon, Dhule, Malegaon Election Results 2026 LIVE: निकालाआधीच धुळ्यात भाजपचे 4, जळगावात महायुतीचे 12 उमेदवार विजयी

Nashik, Ahilyanagar, Jalgaon, Dhule, Malegaon Election Results 2026 LIVE Counting in Marathi: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल आज (शुक्रवार, 16 जानेवारी) सकाळी 10 वाजल्यापासून हाती येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि मालेगाव महापालिकांचा निकाल जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Nashik, Ahilyanagar, Jalgaon, Dhule, Malegaon Election Results 2026 LIVE: निकालाआधीच धुळ्यात भाजपचे 4, जळगावात महायुतीचे 12 उमेदवार विजयी
election results 2026
Image Credit source: Tv9
| Updated on: Jan 16, 2026 | 9:01 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 16 Jan 2026 08:51 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: जळगाव महापालिकेतील 75 पैकी बारा जागा बिनविरोध

    जळगाव महापालिकेतील 75 पैकी बारा जागा बिनविरोध झाल्यामुळे 63 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हातात येतील असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

    भाजपच्या सहा आणि शिवसेनेच्या सहा अशा एकूण 12 जागा बिनविरोध झाल्यामुळे 63 जागांसाठी निवडणूक पार पडली. 63 जागांसाठी 321 उमेदवार रिंगणात होते. यात अपक्ष उमेदवारांची संख्या देखील मोठी असल्याचं पाहायला मिळालं. आधीच महायुतीच्या 12 जागा बिनविरोध झाल्यामुळे निकालामध्ये भाजप आणि शिवसेनेने आधीच आघाडी घेतली आहे.

    मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांबरोबरच माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह महायुतीच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निकालामध्ये महायुतीचा गुलाल उडतो की महाविकास आघाडी बाजी मारते याकडे राजकीय पक्षांसह जळगावकरांचं लक्ष लागून आहे.

  • 16 Jan 2026 08:40 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: जळगाव महापालिका मतमोजणीनिमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त

    जळगाव महापालिका मतमोजणीनिमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उमेदवारांची पोलिसांकडून कसून चौकशी होत आहे. उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाची मानल्या जाणारी ही महानगपालिका आहे. दिग्गजांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे.

  • 16 Jan 2026 08:29 AM (IST)

    Dhule Mahapalika Election Results: धुळे महानगरपालिकेसाठी तीन टप्प्यांत होणार मतमोजणीची

    धुळे महानगरपालिकेच्या एकूण 74 जागा असून त्यापैकी चार जागा आधीच भाजपने बिनविरोध जिंकल्या आहेत. तर 70 जागांसाठी 316 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मतमोजणी होणार आहे. वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

    सहा कक्षात एकाच वेळी मतमोजणी प्रक्रिया सुरु होणार असून सर्वप्रथम टपाली मतांची मतमोजणी केली जाणार आहे. एकूण दहा ते चौदा मतगणनेच्या फेऱ्या होतील. तीन टप्प्यात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

  • 16 Jan 2026 08:23 AM (IST)

    Dhule Mahapalika Election Results: धुळ्यात निकालाआधीच भाजपचा चौकार

    धुळे महानगपालिका निवडणुकीत भाजपचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाक क्रमांक 1 अ मधून उज्वला रणजित भोसले, प्रभाग क्रमांक 6 ब मधून ज्योत्सना प्रफुल्ल पाटील, प्रभाग क्रमांक 17 अ मधून अमोल मासुळे आणि प्रभाग क्रमांक 17 ब मधून सुरेखा रावसाहेब उगले बिनविरोध निवडून आले आहेत.

  • 16 Jan 2026 08:18 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलारांचा राजीनामा

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी राजीनामा दिला आहे. गजानन शेलारांची पक्षातून हकालपट्टी होणार असल्याची चर्चा होती. निवडणूक काळात पक्षाच्या बड्या नेत्यांनी नाशकात सभा न घेतल्याचा शेलारांचा आरोप होता. तर शेलारांच्या निवडणूक काळातील कामगिरीवर पक्षाचे वरीष्ठ नेतेही नाराज होते.

  • 16 Jan 2026 08:06 AM (IST)

    Malegaon Mahapalika Election Results: नाशिक महापालिकेत महायुतीचा भगवा डौलाने फडकेल- दादा भुसे

    “मालेगावातील 24 पैकी 24 उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाणाने निवडून येतील. महायुतीचा भगवा नाशिक महापालिकेत डौलाने फडकेल. एकनाथ शिंदे यांच्याविषयी संपूर्ण महाराष्ट्रात आत्मियता आहे. मालेगावात राजकीय आणि सामाजिक परिस्थिती वेगळी आहे,” अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

  • 16 Jan 2026 07:53 AM (IST)

    Dhule Mahapalika Election Results: धुळ्यात 74 पैकी 4 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध

    धुळे महानगपालिका निवडणुकीच्या निकालात मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निवडणुकीत एकूण 74 पैकी चार जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे 70 जागांवर मतमोजणी होणार आहे.

  • 16 Jan 2026 07:40 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: जळगाव महापालिकेसाठी 53.60% मतदान

    जळगाव महापालिकेसाठी 53.60% मतदान झालं आहे. या महापालिकेतील 75 जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीच्या 12 उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली होती. त्यामुळे आता उर्वरित 63 जागांसाठी उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे.

  • 16 Jan 2026 07:27 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: गुंडगिरीची सखोल चौकशीची मागणी करणार, आमदार अनिल पाटील यांचा शिरीष चौधरींवर हल्लाबोल

    शिरीष चौधरी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नंदुरबार इथल्या हाणामारी तसंच दाखल गुन्ह्यावरून आमदार अनिल पाटील यांनी निशाणा साधत तीव्र शब्दात टीका केली आहे. नंदुरबार इथं शिरीष चौधरी यांच्याविरुद्ध दाखल गुन्हेसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महानिरीक्षक यांची भेट घेणार असल्याचं अनिल पाटील म्हणाले. इतकंच नव्हे तर गुंडगिरीची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार असून विधानसभेत आवाज उठवणार असल्याचंही ते म्हणाले.

  • 16 Jan 2026 07:17 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: शिरीष चौधरी यांच्यावर अनिल पाटील यांची खोचक टीका

    जळगावच्या अमळनेर इथल्या शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी खोचक टीका केली आहे. शिरीष चौधरी हे दहशतीचं राजकारण करत असून नंदुरबार आणि अमळनेरमधल्या जनतेसाठी घातक असल्याची टीका आमदार अनिल पाटील यांनी केली आहे. गुंड प्रवृत्तीला नेतृत्व देऊन अमळनेरचं नुकसान करू नका, असं आवाहन जनतेला करत जनता तुम्हाला माफ करणार नाही असा सूचक इशारा अनिल पाटील यांनी शिरीष चौधरींना दिला आहे.

     

  • 16 Jan 2026 07:08 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिकमधील 122 जागांसाठी 155 टेबलवर होणार मजमोजणीची प्रक्रिया

    नाशिक महापालिकेसाठी गुरुवारी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. एकूण 122 जगासाठी 155 टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. एका प्रभागासाठी तीन टेबलवर मतमोजणी होणार आहे. संपूर्ण मतमोजणीसाठी 465 कर्मचारी नियुक्त असतील. साधारणपणे दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तर 2398 पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या मतमोजणी केंद्रावर बंदोबस्तासाठी तैनात असतील.

  • 16 Jan 2026 06:59 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिकमध्ये गेल्या वेळेच्या तुलनेत यंदा 5% कमी मतदान

    गेल्या वेळेच्या तुलनेत नाशिकमध्ये यंदा पाच टक्क्यांनी मतदानाची टक्केवारी कमी झाली. नाशिक महापालिका निवडणुकीत यंदा 56.67 टक्के मतदान झालं. 2017 मध्ये 61.60 टक्के मतदान झालं होतं. घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 16 Jan 2026 06:55 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: जळगावातील गोळीबाराच्या घटनेचा निवडणूक प्रक्रियेशी संबंध नाही- पोलीस

    जळगाव महापालिकेत अत्यंत सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडली असून कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. जळगावमध्ये जी गोळीबाराची घटना घडलेली आहे, या घटनेशी कुठलाही मतदान निवडणूक प्रक्रियेशी संबंध नाही. ही घटना वैयक्तिक वादातून घडली आहे. या घटनेत कोणीही जखमी झालं नसून सध्या चौकशी सुरू असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सांगितलं.

  • 16 Jan 2026 06:47 AM (IST)

    Jalgaon Mahapalika Election Results: प्रशासनाच्या चुकीमुळे 2 महिलांवर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ

    जळगाव शहरातील प्रभाग 1 मधील गेंदालाल मिल परिसरातील मतदान केंद्रावर दोन महिलांवर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली. महिलांची नावं असूनही, मतदानाच्या वेळेत मतदान केंद्रावर प्रवेश करूनही, तसंच अडीच तास रांगेत उभं राहूनही दोन्ही महिला मतदानापासून वंचित राहिल्या आहेत.

    महिलांना 18 व्या क्रमांकाच्या बूथचं टोकन दिलं, मात्र मतदान 15 क्रमांकाच्या बूथमध्ये होतं. तिथे गेल्यावर मतदान प्रक्रिया संपली होती. टोकन देण्यात घोळ झाल्याने मतदानाचा हक्क न बजावता आल्याचं सांगत दोन्ही महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • 16 Jan 2026 06:38 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: 2017 च्या निवडणुकीत भाजपला बहुमत

    2017 मध्ये नाशिक महानगरपालिकेच्या 31 वॉर्डमधील 122 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. त्या निवडणुकीत भाजपाने 64 जागांसह विजयी बहुमत प्राप्त केलं होतं. तर 32 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना पक्ष राहिला होता.

  • 16 Jan 2026 06:19 AM (IST)

    Nashik Mahapalika Election Results: नाशिक महापालिकेच्या एक्झिट पोलचे अंदाज काय?

    नाशिक महानगरपालिकेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. त्याआधी गुरुवारी संध्याकाळी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले. नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज आहे.

  • 16 Jan 2026 06:08 AM (IST)

    Dhule Mahapalika Election Results: धुळ्यात मतदान यंत्राची मोडतोड

    धुळे महापालिका निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक 18 मधील मिरच्या मारुती प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रातील खोली क्रमांक एकमध्ये असलेल्या मतदान यंत्राची मोडतोड करण्यात आली. या घटनेनंतर संबंधित मतदान केंद्रावरील मतदान काही काळासाठी थांबवण्यात आलं होतं.

  • 16 Jan 2026 06:06 AM (IST)

    Mahapalika Election Results : राज्यातील 29 महापालिकांसाठी गुरुवारी सरासरी 60% मतदान

    राज्यातील २९ महापालिकांसाठी गुरुवारी सरासरी ६०% मतदान झालं. जवळपास आठ ते दहा वर्षानंतर होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांमुळे अनेक ठिकाणी मतदानात उत्साह दिसून आला.

राज्यातील 29 महापालिकांसाठी गुरुवारी मतदान झालं असून आज (शुक्रवार, 16 जानेवारी) 15,931 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. मुंबईसह 29 महानगरपालिकांमध्ये एकूण 2869 जागा आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे आणि अहिल्यानगर या महानगरपालिकांचा निकाल या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेता येईल. नाशिक महापालिकेत एकूण 31 प्रभाग असून यातून 122 उमेदवार निवडून येणार आहेत. तर मालेगाव महानगरपालिकेत एकूण 21 प्रभागातून 84 नगरसेवक निवडून येतील. अहिल्यानगर महापालिकेत 17 प्रभाग असून 68 सदस्य निवडून येणार आहेत. तर धुळ्यात एकूण 19 प्रभागातून 74 नगरसेवक निवडून येणार आहेत. जळगावातील एकूण 19 प्रभागातून 75 नगरसेवक निवडून येणार आहेत. या महानगरपालिकांमधील कोणते उमेदवार आघाडीवर, कोणते पिछाडीवर, कोणाच्या पदरी निराशा तर कोण उधळणार विजयाचा गुलाल.. या सर्वांचे अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या..