सरकारवर भरोसा नाय का?… स्ट्राँग रुमबाहेर अजितदादा गटाबरोबरच शिंदे गटाचाही जागता पहारा; सर्वांच्याच भुवया उंचावल्या
Maharashtra Local Body Election : राज्यातील नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकींचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. आता EVM ठेवलेल्या स्ट्राँग रुमबाहेर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांकडून आणि कार्यकर्त्यांकडून जागता पहाला दिला जात आहे.

राज्यातील नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीचे मतदान 2 डिसेंबरला पार पडले आहे. काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्यासाठी 20 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 21 डिसेंबरला एकत्रितपणे सर्व निवडणुकींचे निकाल जाहीर होणार आहेत. 2 डिसेंबरला झालेल्या मतदानाच्या मतपेट्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. अशातच आता उमेदवारांकडून EVM मशीनमध्ये फेरफार होऊ नये साठी काळजी घेतली जात आहे. जळगाव, धाराशिव, धुळे आणि सोलापूरमधील उमेदवार स्ट्राँग रूमच्या बाहेर पहारा देत असल्याचे समोर आले आहे. यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा समावेश आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जळगाव
जळगावच्या जामनेर येथे शिवसेना व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांकडून स्ट्राँग रूमच्या बाहेर पहारा दिला जात आहे. जामनेर येथील स्ट्राँग रूम परिसरात पोलीसांचा मोठा बंदोबस्त असून एसआरपीएफचे सशस्त्र जवान देखील तैनात करण्यात आलेले आहे. मात्र शिवसेनेला सत्ताधारी मित्रपक्ष भाजपवर विश्वास नसल्याकारणाने स्ट्राँग रूमच्या बाहेर पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून पहारा दिला जात असल्याचे बोलले जात आहे. दिवसातून तीन ते चार वेळेत आलटून पालटून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि कार्यकर्ते पहारा देत आहेत
धाराशिव
धाराशिव मधील परंडा नगरपालिकेलाठी 2 डिसेंबरला मतदान पार पडले आहे. परांड्यातील स्ट्राँग रूमभोवती पोलीसांसह राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि उमेदवार पहारा देताना दिसत आहेत. परंडा येथे शिवसेनेकडून खडा पहारा दिला जात आहे. परंडा नगरपालिकेत आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांचे गट आमने-सामने आहेत. या ठिकाणी तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांकडून पहारा दिला जात आहे. शिवसेनेकडून जाकीर सौदागर आणि स्थानिक आघाडी आणि माजी आमदार राहुल मोटे गटाकडून विश्वजीत पाटील हे उमेदवार नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. शिवसेनेसाठी ही प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची निवडणूक असल्याने स्ट्राँग रूमभोवती पहारा पहायला मिळत आहे.
सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 29 मतदान केंद्रांवर मतदान पार पडले आहे. या केंद्रांवरील ईव्हीएम मशीन वखार महामंडळाच्या गोदामात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या गोदामाच्या आजूबाजूला राजकीय पक्षाचे उमेदवार पहारा देताना पहायला मिळत आहे. मतपेट्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार टाळण्यासाठी हा पहारा दिला जात आहे.
धुळे
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत निवडणूकीसाठी मतदान पार पडले आहे. प्रशासकीय कार्यालयात ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी 18 पोलिसांचा बंदोबस्त असून आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही या ठिकाणी पहारा देताना पहायला मिळत आहे. दोन कार्यकर्ते रात्री या ठिकाणी थांबतात आणि दिवसा इतर कार्यकर्ते स्ट्रॉंग रूमच्या बाहेर असतात. पोलीसांबाबत आम्ही देखील पहारा करतो असं यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे.
