महाबळेश्वर-तापोळ्याचा चेहरामोहरा बदलणार! पर्यटनाला चालना मिळणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
Mahabaleshwar and Tapola Tourism Development Plan: महाबळेश्वर-तापोळ्याचा कायापालट होणार आहे. नवे पूल, बोगदे, मल्टीलेव्हल पार्किंगसह रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, अशी एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांच्यातील दळणवळण अधिक गतिमान करण्यासोबतच महाबळेश्वर आणि तापोळा परिसराला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाकांक्षी विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. नवीन पूल, बोगदे, रस्त्यांचे रुंदीकरण, पार्किंग व्यवस्था आणि रोजगारनिर्मितीच्या प्रकल्पांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसराचा कायापालट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विकासकामांची माहिती दिली.
महाबळेश्वर आणि तापोळा परिसरात दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. मात्र अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी तापोळा केबल-स्टेड ब्रिज आणि ‘तापोळा-आपटी’ पूल उभारण्यात येणार आहे. या पुलांमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील संपर्क अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
महाबळेश्वरमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पसरणी घाटाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय पोलादपूर ते सातारा आणि रघुवीर घाट ते सातारा असे दोन नवीन बोगदे प्रस्तावित करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच पर्यटन आणि दळणवळणाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पर्यटकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी महाबळेश्वरमधील एसटी डेपोच्या जागेत मल्टीलेव्हल पार्किंग उभारण्याचे नियोजन आहे.
घाट परिसरातील वाहतुकीसाठी १० मिनी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी ‘वॉटर ॲम्ब्युलन्स’ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. केवळ पर्यटन विकास न करता स्थानिक नागरिकांचे उत्पन्न वाढवण्यावरही सरकारचा भर आहे. स्थानिक तरुणांचे रोजगारासाठी शहरांकडे होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी अत्याधुनिक ‘स्किल डेव्हलपमेंट सेंटर’ उभारण्यात येणार आहे.
या केंद्राच्या माध्यमातून तरुणांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘नवीन महाबळेश्वर’ प्रकल्पांतर्गत समूह शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. पतंजली आणि वैद्यनाथ यांसारख्या कंपन्यांशी करार करून आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या लागवडीला चालना देण्याचे नियोजन आहे.
यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे. या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून महाबळेश्वर आणि तापोळा परिसराचा पर्यटनासोबतच आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हे प्रकल्प प्रत्यक्षात पूर्ण झाल्यास सातारा जिल्ह्यासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळू शकते.
