परळी हादरणार, धक्कादायक नावं पुढे येणार… मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, बड्या नेत्यांची धडधड वाढली

महादेव मुंडे हत्या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी खळबळजनक दावा केला आहे. एसआयटीकडे आलेल्या नार्को टेस्टच्या अहवालातून परळीतील अनेक बड्या हस्तींची नावे उघड होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

परळी हादरणार, धक्कादायक नावं पुढे येणार... मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, बड्या नेत्यांची धडधड वाढली
Manoj Jarange Patil
| Updated on: Mar 02, 2026 | 8:53 AM

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा २० ऑक्टोबर २०२३ रोजी परळीतील तहसील कार्यालयासमोर निर्घृणपणे खून करण्यात आला. या प्रकरणी मुंडे कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आता परळीतील महादेव मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणी नवनवीन अपडेट समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी महादेव मुंडे यांच्या नार्को टेस्टचा रिपोर्ट एसआयटीच्या हाती आला आहे. ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट रिपोर्टमधून महादेव मुंडे हत्या प्रकरणाचं सत्य लवकरच बाहेर येणार आहे. आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणावर भाष्य करताना अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात आला आहे. यात अशी काही धक्कादायक नावे समोर येतील की ज्यामुळे संपूर्ण परळी हादरून जाईल,” असा दावा मनोज जरांगे पाटील केला आहे.

महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संशयितांच्या करण्यात आलेल्या नार्को टेस्ट (Narco Test) आणि ब्रेन मॅपिंग (Brain Mapping) चाचण्यांचे अहवाल आता अधिकृतपणे एसआयटीकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. या अहवालांमध्ये अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गूढ उकलण्याची शक्यता वर्तवली आहे.

मी ही नावे तुम्हाला माहिती असूनही सांगणार नाही

ही कायदेशीर प्रक्रिया आहे. नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगचा अहवाल आल्यानंतर तो कोर्टापुढे सादर केला जाईल. हा अहवाल आल्यानंतर पोलीस काही नाव नक्कीच सांगतील. मलाही काही नाव माहिती आहेत. परंतु आता मी ही नावे तुम्हाला माहिती असूनही सांगणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

या प्रकरणात भविष्यात अनेक मोठी नावं समोर येणार आहेत. या मोठ्या नावांमुळे परळी हादरुन जाईल. यात इतकी मोठमोठी नाव आहेत ती ऐकून परळी नक्कीच हादरुन जाणार आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घातले असून तपास एसआयटीमार्फत पुढे नेण्यात येत आहे. तपास यंत्रणेला अडचण निर्माण होऊ नये म्हणून माहिती असूनही आपण सध्या ती उघड करणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

कोणाचे पितळ उघड पडणार

दरम्यान महादेव मुंडे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी हा अपघात नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात राजकीय लागेबांधे असल्याची चर्चा सुरुवातीपासूनच होती. मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यामुळे प्रशासनाने एसआयटी स्थापन केली होती. आता या तांत्रिक चाचण्यांचे अहवाल कोणाचे पितळ उघड पाडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us