
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवार यादी जाहीर करणारा भाजपा पहिला पक्ष ठरला आहे. भाजपाने पहिल्या यादीत 99 उमेदवार जाहीर केलेत. भाजपाला उमेदवार यादी जाहीर करण्याचे जसे फायदे आहेत, तसे तोटे सुद्धा आहेत. या यादीमुळे काही ठिकाणी बंडाचे संकेत मिळाले आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर ज्यांना तिकीट मिळालं, ते आभार मानण्यासाठी आले, तसच ज्यांच नाव जाहीर झालेलं नाही ते सुद्धा होते. दरम्यान राजापूर लांजा साखरपा या विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित यशवंतराव हे आज उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मातोश्रीवर आज दुपारी साडेबारा वाजता होणार प्रवेश. स्थानिक आमदार राजन साळवी यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी प्रवेशावेळी मातोश्रीवर असणार हजर.
सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बारामती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांची देखील मेळाव्याला उपस्थिती आहे.
गडचिरोली पोलिसांकडून चकमकीत पाच माओवाघांना कंटास्नान घालण्यात यश आलंय. या पाच माओवाद्यांवर एकूण 38 लाख रुपयांचे बक्षीस होते. तीस किलोमीटरच्या पायी प्रवास करून नक्षलविरोधी पोलीस पथक घनघाट जंगलात गेले आणि 72 तास हे आपरेशन राबवले. आठ तास ही चकमक सुरु होती. चकमकीत अजून काही नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री गुवाहाटी रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांचे हस्ते आज रात्री बारा वाजता कामाख्या मंदिरात पूजा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. कामाख्या मंदिर व्यवस्थापनाला राज्य सरकारकडून कळवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी छगन भुजबळ 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भुजबळ सकाळी 10 वाजता येवला तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. छगन भुजबळ येवल्यातील संपर्क कार्यालयापासून रॅलीद्वारे मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर येवल्यात छगन भुजबळांची सभा होणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून विदर्भातील यवतमाळ आणि आर्णी मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. भाजपच्या ताब्यात असलेला मतदारसंघ शिंदे गटाला जागा सोडा, अशी प्रमुख नेत्यांची मागणी आहे. भाजप आर्णी विधानसभा मतदारसंघात भाकरी फिरवण्याच्या तयारीत असताना शिंदे गटाने हा दावा केला आहे.
मालाड भाजपमध्ये बंडखोरी पाहायला मिळत आहे.भाजप नेते ब्रिजेश सिंह अपक्ष उमेदवारी अर्ज घेण्यासाठी समर्थकांसह पोहोचले आहेत. शिवसेनेचे विभागप्रमुख लालसिंग राज पुरोहित यांनी मालाडची जागा भाजपला देण्यास विरोध केला आहे. ब्रिजेश सिंह हे भाजपचे जुने नेते आहेत, ते मालाड पश्चिम विधानसभेतून इच्छुक होते. मात्र भाजपने आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना तिकीट दिले आहे. ब्रिजेश सिंगच नाही तर शिवसेनेचे विभागप्रमुख लालसिंग राजपुरोहित यांनीही मालाडची जागा भाजपला देण्यास विरोध केला.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबतच्या द्विपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तुमच्या मैत्रीबद्दल आणि हार्दिक स्वागताबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. या शहराशी भारताचे खोल आणि ऐतिहासिक संबंध आहेत. कझानमध्ये भारताचे नवीन वाणिज्य दूतावास सुरू झाल्याने हे संबंध अधिक दृढ होतील. गेल्या 3 महिन्यांत माझी दोनदा रशियाची भेट आमच्यातील घनिष्ठ समन्वय आणि सखोल मैत्री दर्शवते.
मुंबई पोलिसांनी एकता कपूर, शोभा कपूर आणि ऑल्ट बालाजी कंपनीविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांना 24 ऑक्टोबर रोजी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
संसदेत वक्फ जेपीसीच्या बैठकीत हाणामारी झाली. घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी तिथे ठेवलेली काचेची पाण्याची बाटली उचलून टेबलावर फेकली आणि चुकून ते जखमी झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
सर्वोच्च न्यायालयाने तीस्ता सेटलवाड यांना आंतरराष्ट्रीय डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिव्हलसाठी ॲमस्टरडॅमला जाण्याची परवानगी दिली आहे. तिस्ता सेटलवाडने तिच्या ‘सायकल महेश’ या माहितीपटाच्या आगामी वर्ल्ड प्रीमियरसाठी ॲमस्टरडॅमला जाण्याची परवानगी मागितली होती.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे आणि प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे उद्या मुंबईत उद्धव ठाकरे गटात प्रवेश करीत हाती शिवबंधन बांधणार आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दर्राणी यांनी पाथरी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तर काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर ही जागा सोडायला तयार नाहीत त्यामुळे पाथरीत महाविकास आघाडीत जागेचा पेच कायम आहे.
दोन वर्षे झाली आयोग,सुप्रीम कोर्टात न्याय मिळाला नाही आता जनतेच्या कोर्टात जाणार ते आम्हाला न्याय देतील असे राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
उध्दव ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील प्रचंड मतभेदांमुळे काही तासांत महाविकास आघाडी तुटेल असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
महाविकास आघाडीची लवकरच बैठक होणार असल्याचे महाविकास आघाडीचे समन्वयक बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. थोरात यांनी आज अगोदर शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आज त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. आज दुपारी महाविकास आघाडीची बैठक होत आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय वरपूडकर यांनी परभणी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. परभणी विधानसभा शिंदे गट की भाजप कुठल्या पक्षाला सुटेल अद्याप निश्चित नाही, परभणी विधानसभा भाजपची जागा असून, सतत भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याने अर्ज दाखल केला असा प्रतिक्रिया वरपूडकर यांनी दिली.
अजित पवारांनी भेटायला बोलावलं होतं. बैठक सकारात्मक होती. मी अद्याप एनसीपीमध्ये प्रवेश करायचा विचार केला नाही, पक्ष श्रेष्टी याचा विचार करतील. दादांच्या कामाला भाळून मी दादासोबत पुढेही दादांसोबतच काम करणार. एबी फार्म दिले जात आहेत. मी देखील रणांगणात आहे. आगे आगे देखो होतो है क्या, असा इशारा देवेंद्र भोयर यांनी दिला.
सध्या काही बातम्या प्रसार माध्यम चालवत आहे त्या चुकीचा बातम्या अहेत. मी कुठे जाणार नाही. भाजप ध्ये कधी ही जाणार नाही आणि पेण मधून महायुतीकडून कोणाला ही उमेदवारी दिली तरी त्याचे काम मी करणार असल्याचे अनिकेत तटकरे यांनी सांगितले.
संदीप नाईक यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. कार्यकर्त्यांनी संकल्प केला आणि त्यामुळेच आज पक्ष प्रवेश झाला. अनेक कार्यकर्त्यांनी यां मेळाव्यासाठी पुढाकार घेतला. जयंत पाटील यांनी आम्हाला स्वीकारलं. त्यासाठी शरद पवार यांचं देखील आभार व्यक्त करतो. आम्हाला दिलेला शब्द त्यांनी फिरवला म्हणत संदीप नाईक यांनी भाजपवर टीका केली आहे.
लांजा रत्नागिरी राजापूर मतदार संघातून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे अजित पवार गटातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत अजित पवार गटातील रणजीत यशवंतराव हे आज मातोश्री निवासस्थानी दाखल झाले आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख रवींद्र माने हे निवडणूक लढवणार. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाटेला गेला आहे इथे उमेदवार ही घोषित झाला आहे. बंडखोरी होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र माने यांना मुंबईत बोलवले.
माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केला पक्ष प्रवेश हाती घेतली तुतारी.
ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार हे निश्चित नाही. मिळालेल्या माहितीनुसार, जीशान सिद्दीकी यांनी निवडणूक आयोगाकडे फॉर्मही मागवला आहे. झीशान सिद्दीकी यांना निवडणूक लढवण्याची तयारीही कार्यकर्त्यांनी केली आहे.
नुकताच अनिकेत तटकरे यांनी म्हटले की, जो उमेदवार दिला जाईल त्याचा प्रचार करेल.
सुप्रीम कोर्टाने शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने दाखल केलेली याचिका फेटाळली. अजित पवार यांच्या पक्षाला घड्याळा ऐवजी दुसरा चिन्ह देण्याची मागणी शरद पवार यांच्या वतीने करण्यात आली होती
नाकाबंदीदरम्यान 5 कोटींची कॅश जप्त, ही गाडी कोणाची होती त्याबद्दलचा तपास सध्या सुरू आहे. सदर गाडी मुंबईवरून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. मुंबई-बँगलोर हायवेवर खेड-शिवापूरजवळ तपासणी केली असता गाडीत 5 कोटींची रक्कम सापडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नाशिकच्या देवळ्यात भाजपला मोठं खिंडार, भाजपच्या माजी नगराध्यक्षांसह 17 माजी नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. भाजपचे जिल्हा उप्धाध्यक्ष किशोर चव्हाण यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे.
जळगावात महायुतीच्या पहिल्याच निर्धार मेळाव्याला भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील हे दोघेही गैरहजर असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
जळगावातील आदित्य लॉन येथे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीचा निर्धार मेळावा पार पडत आहे . मात्र भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनीही मेळाव्याला दांडी मारल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
“उद्या कुडाळच्या मैदानात सभा असून तिथेच शिंदे गटात प्रवेश करणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक मी जिंकणार,” असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला.
2019 मध्ये नारायण राणे आणि नितेश राणेंसोबत भाजपमध्ये आलो. पक्षप्रवेश केल्यापासून भाजपची शिस्त शिकायला मिळाली. देवेंद्र फडणवीसांनी मला लहान भावासारखं सांभाळलंय. मी उद्या दुपारी 4 वाजता शिंदे गटात प्रवेश करणार आहे,” असं निलेश राणे पत्रकार परिषदेत म्हणाले.
शिवसेनेला न विचारात घेता भाजपने जाहीर केलेल्या यादीबाबत कालच्या वर्षा बंगल्यावरील बैठकीत एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. कायदा हातात घेतलेल्या आमदारांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देणं योग्य नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी मत मांडलं. गणपत गायकवाड यांच्या पत्नीला दिलेल्या उमेदवारीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधकांना आयते मुद्दे मिळतील असे उमेदवार नको असं एकनाथ शिंदे यांचं मत आहे.
नाना काटे समर्थकांसह मुंबईत शरद पवारांच्या भेटीला आले आहेत. जयंत पाटील यांनी नाना काटे यांना भेटीसाठी वेळ दिली आहे. नाना काटे चिंचवडचे समीकरण बदलवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
“शरद पवार यांच्यासोबत उत्तम चर्चा झाली. आमच्याकडे चांगले उमेदवार असल्याने आम्ही आग्रही आहोत. प्रत्येक पक्षाला आग्रह धरण्याचा अधिकार आहे. आमच्यात उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यासंदर्भात चर्चा झाली,” अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली. नुकतीच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे.
पाच कोटी रुपये सापडलेली गाडी काही महिन्यांपूर्वीच मी बाळासाहेब आसबे नावाच्या व्यक्तीला विकल्याचं अमोल नलावडे यांनी स्पष्टीकरण दिलं. पाच कोटी रुपये सापडलेली गाडी सांगोला इथले उद्योगपती अमोल नलावडे यांच्या नावावर आहे, या प्रकरणाचा माझा काहीही संबंध नाही, असं ते म्हणाले. “मला पोलीस स्टेशन किंवा इतर कोणाचाही अजून तरी फोन आलेला नाही. माझी काही चूक नाही. मी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहे. गाडी विकल्यानंतर मी त्या गाडीचे ऑनलाइन पैसे घेतले असल्याने मला काही अडचण येईल असे वाटत नाही. आम्ही काही वर्षांपूर्वी शेकापचं काम करत होतो, मात्र आता कोणत्याही पक्षाशी आमचा संबंध नाही,” असं गाडीमालक अमोल नलावडे यांनी म्हटलंय.
नवी दिल्ली- थोड्याच वेळात विजया रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. मावळत्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. पहिल्यांदाच महाराष्ट्राला राष्ट्रीय अध्यक्षपद मिळालं आहे. यापूर्वी रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच अध्यक्ष म्हणून देखील काम केलं आहे.
आघाडी, युती करतो तेव्हा पुढेमागे करावं लागतं… यूती असते तेव्हा 1 -2 पाऊल मागे यावं लागतं… प्रत्येकाला तिकीट मागण्याचा अधिकार… असं वक्तव्य अजित पवार यांनी वक्तव्य केलं आहे.
शिंदे, फडणवीस, अजित पवारांकडून पैशांचं वाटप सुरु… फक्त 5 कोटी रुपये जप्त झाले, 10 कोटी रुपये सोडून दिले… 30 – 30 कोटी सुद्धा आता लवकरच वाटप करतील… सांगोल्याच्या गद्दार आमदारांसाठी रोकड जात होती… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.
दिंडोरीचे माजी आमदार आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते धनराज महाले बंडाच्या तयारीत… दिंडोरीतून धनराज महाले शिंदेंच्या शिवसेनेकडून होते इच्छुक… मात्र दिंडोरीची जागा अजित पवार गटाला सुटल्याने आणि नरहरी झिरवाळ यांना पक्षाचा AB फॉर्म मिळाल्याने महालेंचं बंड… २४ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा धनराज महाले यांचा निर्णय… राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने महायुतीचा धर्म पाळला नाही, तर आम्ही का पाळायचा? धनराज महाले यांचा विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांना सवाल…
मुंबईत अनेक ठिकाणी योगींचे पोस्टर लावण्यात आले आहेत… मुंबईतील अंधेरी पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि वांद्रे परिसरात होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत… होर्डिंग्जवर योगींच्या चित्रासह बंटेंगे तो कटेंगे अशी घोषणा होती… हरियाणानंतर आता योगींचा नारा महाराष्ट्राच्या निवडणुकीत उतरला आहे…
पैलवान या चित्रपटाच्या गाण्याचं अजीत पवार आणि अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत लाँचिंग… अजीत पवार यांचे खाजगी सचिव अजित सोलवट यांचंही या चित्रपटातून केलंय पदार्पण… काही वेळात अनेक पैलवानांच्या उपस्थितीत गाणं होणार प्रदर्शित
रत्नागिरी विधानसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रांन्त कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. विधानसभा निवडणुकांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. प्रमुख पक्षाचे उमेदवार कधी अर्ज भरणार याची उत्सुकता सध्या सर्वांना आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 विधानसभा मतदार संघ आहेत. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच प्रचाराचा नारळ फुटणार आहे. इच्छुक उमेदवारांना 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरपर्यत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.
रत्नागिरी जिल्हा कार्यालयात काँग्रेसची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. राजापूर मतदारसंघातील उमेदवारी संदर्भात काँग्रेस निर्णायक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे महाविकासआघाडीमध्ये जिल्ह्यातंर्गत धुसफूस समोर येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा मिळत नसल्याने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस वेगळी भूमिका गेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष आणि राजापूरमधून इच्छूक असलेले अविनाश लाड भूमिका स्पष्ट करणार आहेत. यामुळे राजापूरमध्ये सांगली पटर्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार राजन साळवी यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यामुळे काँग्रेसने आक्रमक पावित्रा घेतला आहे.
राजहंस सिंग, भाजपचे विधान परिषदेचे सदस्य (एमएलसी), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे निवडणूक लढवणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सिंग हे डिंडोशी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, जिथे त्यांनी २००९ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली होती. तर शिंदे सेनेचे राहुल कनाल, जे आदित्य ठाकरे यांचे माजी निकटवर्ती होते आणि आत्ता श्रीकांत शिंदे यांचं जवळचे मानले जातात. त्यांचा कालिना मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय पोटणीस यांच्याशी थेट सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आमदार सतीश चव्हाण यांचा शरद पवार गटात प्रवेश निश्चित झाला आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी तुतारी हाती घेण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे सतीश चव्हाण यांचा प्रवेश लांबला होता. मात्र अखेर हा प्रवेश निश्चित झाला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या राजीनामे देण्याच्या धमकीमुळे सतीश चव्हाण वेटिंगवर होते. मात्र एक ते दोन दिवसात सतीश चव्हाण यांचा प्रवेश निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे येत्या गुरुवारी 24 तारखेला विधानसभा उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच अविनाश जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठाण्यात उपस्थित राहणार आहेत. ठाण्यात मनसेचे मोठे शक्ती प्रदर्शन पहायला मिळणार आहे. मनसे आणि अविनाश जाधव हे ठाणे शहर या ठिकाणी दुसऱ्यांदा आपले नशीब आजमावणार आहेत. भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या समोर अविनाश जाधव पुन्हा एकदा विधान सभा रिगणात उतरणार आहेत. त्याच दिवशी शिवसेनेकडून एकनाथ शिंदे देखील कोपरी पाचपाखाडी येथून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
तिढा नसलेल्या जागावर संबंधित उमेदवाराला लढण्यासंदर्भात तयारीचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहेत. ठाकरे गट महाविकास आघाडीत 96 ते 98 जागांवर लढणार असल्याची सूत्रांची माहिती. त्यापैकी 86 जागावरील इच्छुक उमेदवारांची यादी ठाकरे गटाकडून निश्चित करण्यात आली आहे. 86 मतदार संघातील ज्या मतदार संघात एकापेक्षा जास्त इच्छुक आहेत, त्यांचा सर्वे करून उमेदवारांना मातोश्रीवर बोलवण्यात येत असून त्यांना सूचना दिल्या जात आहेत. अशा पद्धतीने आतापर्यंत एकूण 53 जणांना उमेदवारी निश्चितीबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत.
मविआमधून शरद पवार गटाची माढ्याची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि शरद पवारांची आज भेट होणार. आज शरद पवार-जयंत पाटील यांच्या समवेत भेटीला बोलावल्याची माहिती असून या तिघांमध्ये मुंबईत बैठक होणार आहे. शरद पवार आमदार बबनराव शिंदेना तिकीट देण्यास सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आमदार शिंदेचा मुलगा रणजितसिंहला तिकीट देण्याचा आग्रह पवारांकडे सुरु असल्याची माहिती tv9 ला सुत्रांकडून मिळाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरण्यासाठी म्हणजेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसीलनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 29 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.