सदा सरवणकर, गोपाळ शेट्टींसह इतरांची बंडखोरी रोखण्यात महायुतीला यश मिळणार का? दिग्गज नेते मैदानात, बैठकांचे सत्र सुरु
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी दिसून येत आहे. अनेक नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरांशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दिवाळीच्या आधी हे बंड शमवणे हे नेत्यांसाठी मोठे आव्हान आहे.
Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. राज्यातील 288 मतदारसंघांसाठी एकूण 7 हजार 995 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. महायुती आणि महाविकासआघाडीत अनेक ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जाहीर करण्यात आलेल्या उमेदवार याद्यांनंतर काही मतदारसंघांमध्ये पक्षांतर्गत नाराजी समोर आली आहे. त्यामुळे काहींनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकासआघाडीतील नेत्यांची दिवाळी बंडखोरांचं बंड रोखण्यातच जाणार असल्याचे बोललं जात आहे.
महायुती आणि महाविकासआघाडीमध्ये काल बऱ्याच बंडखोरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काहींना तर पक्षातूनच उमेदवारी मिळाल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता हे बंड कसं शमवायचं, याचे राज्यातील सर्वच मोठ्या नेत्यांना टेन्शन आले आहे. महायुती आणि महाविकासआघाडीतील नेत्यांची दिवाळी बंडखोरांचं बंड रोखण्यातच जाणार असल्याचे बोललं जात आहे. ऐन दिवाळीत राजकीय फटाके वाजू नयेत यासाठी नेत्यांचा कस लागणार आहे.
वर्षा बंगल्यावर दुपारी महत्त्वाची बैठक
महायुतीसमोर बंडखोरांचे तगडं आव्हान पाहायला मिळत आहे. बंडखोरांना शांत करण्यासाठी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीची बैठक बोलवल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत, असे बोललं जात आहे. आज दुपारी १ नंतर ही बैठक होणार आहे.
सदा सरवणकरांशीही करणार चर्चा
शिवसेना शिंदे गटातील बंड थांबवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. एकनाथ शिंदे हे प्रत्येक बंडखोराशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. तसेच माहीम विधानसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे हे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्या पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. सदा सरवणकर यांनी दादरमधून माघार घेतल्यास त्यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बंडखोरांना पाच दिवसांत शांत करण्याचे आव्हान
तर शिस्तप्रिय मानल्या जाणाऱ्या भाजपलाही बंडखोरीचा फटका बसला आहे. निष्ठावान समजले जाणारे गोपाळ शे्टटी यांनी बंडाचे निशाण रोवले आहे. भाजपच्या माजी खासदार हिना गावीत यांनीही अक्कलकुवा मतदारसंघात केली बंडखोरी केली आहे. त्यामुळे या बंडखोरांना पाच दिवसांत शांत करण्याचे खडतर आव्हान पक्षातील नेत्यांना पार पाडावे लागणार आहे.
मुंबईत शिवसेनेतून कुणाल सरमळकर, भाजपमधून अतुल शाह आणि गोपाळ शेट्टी यांनी बंडखोरी केली आहे. अजित पवार गटाचे समीर भुजबळ हे नांदगावमधून रिंगणात उतरले आहेत. तर नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये शिंदे गटाचे विजय नाहटा यांनी भाजपविरोधात बंड केले आहे. तसेच अलिबागमध्ये भाजपचे दिलीप भोईर यांचा शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला आहे. पुण्याच्या कसबा मतदारसंघात काँग्रेसच्या कमल व्यवहारे आणि पर्वतीमध्ये आबा बागुल यांचे बंड पाहायला मिळत आहे. या सर्व बंडखोरांना समजवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिन्हीही नेत्यांकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यामुळे आता महायुतीच्या नेत्यांना बंडखोरी रोखण्यात यश येणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.