मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार का घेतली? सांगितली तीन कारणं, कुणावर फोडलं खापर?
आता निवडणूक लढणार नाही, पण उमेदवार पाडणार असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्यामागील कारणंही सांगितले आहे.
Manoj jarange patil Withdraw Nominations : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र २४ तास उलटण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी ही घोषणा केली. आता निवडणूक लढणार नाही, पण उमेदवार पाडणार असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्यामागील कारणंही सांगितले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्यामागचे कारणही सांगितले आहे. मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे एका जातीवर लढणे शक्य नाही, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
मनोज जरांगे पाटील यांनी मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजासोबत एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांनी 14 मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार असल्याची घोषणा केली होती. तसेच आज सकाळी उमेदवारांची घोषणा करु असे त्यांनी म्हटले होते. पण त्यांनी सकाळी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजावर खापर फोडले.
मनोज जरांगेंनी ‘या’ तीन कारणांनी घेतली माघार
आमची मध्यरात्री ३ वाजेपर्यंत चर्चा सुरु होती. आम्ही १४ उमेदवार निश्चित केले होते. मात्र इतर समाजाकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही. मध्यरात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून कोणतीही यादी आलेली नाही. मित्रपक्षांनी उमेदवारांची नावं न पाठवल्याने उमेदवार घोषित केले नाही. आम्हाला एकाच जातीच्या आधारावर लढणं शक्य नाही. मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाही. एकाच जातीवर निवडणूक जिंकणे सोपं नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
“कोणाला पाठिंबा देणार नाही”
विधानसभा निवडणुकीतून आम्ही माघार घेतलेली नाही. हा गनिमी कावा आहे. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज मागे घ्यावेत. महाविकासआघाडी असो किंवा महायुती असो, दोन्हीकडचे नेते सारखेच आहेत. त्यामुळे कोणाला पाठिंबा देणार नाही. तसेच कोणालाही निवडून आणा, असे देखील सांगणार नाही. आपण कुणाच्याही प्रचाराला, सभेला जायचं नाही, मतदान करायचं आणि मोकळ व्हायचं. गुपचिप जायचं, मतदान करायचं आणि पडायचं म्हणत नाही. केवळ माझे आंदोलन सुरु राहणार असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.