
राज्याच्या राजकारणातून महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात सर्वत्र सध्या मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळत आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ठकलण्याचा निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकारणानं घेतला आहे. याबाबत एक परिपत्रकही जारी करण्यात आलं आहे. आता या निवडणुका कधी होणार याबाबत माहिती जाणून घेऊयात.
राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात निवडणूक प्राधिकरणाने म्हटले की, ‘राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पावसाची सद्यस्थिती विचारात घेऊनं ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेतील चिन्ह वाटपाचा टप्पा पूर्ण झाला आहे अशा संस्था, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिली पदाधिकारी निवडणूक प्रक्रिया प्रलंबित आहे अशा संस्था, तसेच ज्या प्रकरणी संस्थेची निवडणूक घेण्याबाबत मा. उच्च न्यायालय/मा. खर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत अशा संस्था वगळून महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम 2014 मधील नियम 4 मध्ये नमुद केलेल्या ‘अ’ व ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक 30 सप्टेंबर, 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार आता या निवडणुका 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहे. आता या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये गेल्या काही काळापासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
मुंबईतही मुसळधार पावसामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. लोकल ट्रेनचे वेळापत्रक कोलमडले आहे. सुरक्षेसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शाळांनी सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. याच सर्व परिस्थितीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.