“माझा डॉक्टरांनी”  गृह विलगीकरणातील रुग्णांच्या उपचाराचं शिवधनुष्य उचलावं – मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील डॉक्टरांना गृह विलगीकरणात रुग्णांच्या उपचाराचं शिवधनुष्य उचलावं असं आवाहन केलंय. तसंच आपल्याला आता कोविड विरुद्धच्या लढाईतील सैन्याचा विस्तार करायचा असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

"माझा डॉक्टरांनी"  गृह विलगीकरणातील रुग्णांच्या उपचाराचं शिवधनुष्य उचलावं - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील डॉक्टरांना गृह विलगीकरणात रुग्णांच्या उपचाराचं शिवधनुष्य उचलावं असं आवाहन केलंय. तसंच आपल्याला आता कोविड विरुद्धच्या लढाईतील सैन्याचा विस्तार करायचा असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. रुग्ण सर्वात जास्त विश्वास आपल्या कुटुंबाच्या डॉक्टरवर ठेवतात. त्या माझा डॉक्टरांनी गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या योग्यवेळी, योग्य उपचाराचे शिवधनुष्य उचलावं, असं मुख्यमंत्री म्हणाले. (CM Uddhav Thackeray’s important appeal to all family doctors in the state)

अजूनही हमखास औषध आपल्याकडे नाही. मात्र मागच्यावर्षीच्या तुलनेत आताच्या स्थितीची तुलना केली तर असं लक्षात येतं की, कोविडच्या सुरुवातीच्या काळात डॉक्टरांमध्ये, सर्वसामान्य माणसांच्या मनात कोविडची प्रचंड दहशत होती. आपल्याला हे कोविडचे युद्ध किती मोठे आणि भयानक आहे हे जाणवू लागले होते. आपण यावर न डगमगता पाऊले टाकली. कोविड विरुध्दची लढाई लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी “माझा डॉक्टर” म्हणून ज्यांची ओळख आहे त्या फॅमिली डॉक्टरांनी शासनासोबत यावे, कुटुंब प्रमुख म्हणून मी आज आपल्याला साद घालत आहे. चला, सर्वांच्या सहकार्यातून आपण करोना विषाणुचा नायनाट करूया, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना आवाहन केलंय.

‘फॅमिली डॉक्टरवर रुग्णांचा मोठा विश्वास’

आपल्या सगळ्यांना माहित आहे की जगभरात प्रत्येक घराचा एक स्वत:चा कुटुंबाचा डॉक्टर असतो. आपल्याला आपल्या त्या माझ्या डॉक्टरवर म्हणजे आपल्या फॅमिली डॉक्टरवर खुप विश्वास असतो. या डॉक्टरांनाही कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची, त्याच्या प्रकृतीची संपूर्ण माहिती असते, घरातल्या लोकांचे आजार माहित असतात. आज मला तुमच्या या अनुभवाची गरज आहे, तुमच्या सहकार्याची  आणि सेवेची गरज आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की, आजही 70 ते 75 टक्के रुग्णांमध्ये कोविडची लक्षणे दिसून येत नाहीत. ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत त्यांना आपण रुग्णालयात दाखल करून घेत नाहीत किंवा तसा सल्ला देत नाहीत. त्यांचा घरच्याघरी उपचार करतो, काहीना तर औषधांची गरज न पडता ते बरे होतात. एकीकडे ही स्थिती आहे तर दुसरीकडे आपल्या लक्षात येते की मृत्यूदर वाढतो आहे, मग त्याची कारणे शोधली तर पेशंट उशिरा रुग्णालयात दाखल होतात हे कारण प्रामुख्याने समोर येते. रुग्ण घरच्या घरी अंगावर काही गोष्टी काढतात आणि उशिरा रुग्णालयात दाखल होतात. मला यामध्ये तुम्हा सर्वांचे सहकार्य हवे आहे. गृह विलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांचे उत्तम उपचार व्यवस्थापन होण्याची गरज यातून पुढे आल्याचं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत नमूद केलं.

कोरोना रुग्णांच्या रक्तातील साखरेकडे लक्ष द्या

‘माझा डॉक्टरांनी’ रुग्णाची कोविड स्थिती, त्याला असलेल्या सहव्याधी आणि त्याची ऑक्सीजन पातळी लक्षात घेणे, योग्यवेळी त्याला योग्य उपचारासाठी मार्गदर्शन करणे, दवाखान्यात दाखल करण्याची गरज असेल तर अंगावर न काढता त्याला त्याच्या गरजेनुसार संबंधित रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु करणे, या गोष्टी फॅमिली डॉक्टरने करणे गरजेचे आहे. अशाच पद्धतीचे गृहविलगीकरणातील रुग्णाचे व्यवस्थापन केल्यास मृत्यूदर कमी करता येऊ शकेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय. कोविडमुळे रुग्णांच्या शरीरातील साखर वाढते, त्यात रुग्णास मधुमेह असेल तर स्थिती आणखी बिकट होते. हे लक्षात घेऊन रुग्णाच्या रक्तातील साखर मर्यादित आणि स्थिर ठेवणे गरजेचे असते. हे आव्हानात्मक काम आहे, घरच्याघरी रुग्णाच्या उपचाराची जबाबदारी घेतलेल्या फॅमिली डॉक्टरांनी याकडे लक्ष द्यावे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. (CM Uddhav Thackeray’s important appeal to all family doctors in the state)

जवळच्या जम्बो कोविड केअर रुग्णालयात सेवा द्यावी

मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाचा डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या राज्यभरातील सर्व डॉक्टरांना त्यांच्या सेवेचा विस्तार करण्याबाबत विनंती केली. माझा डॉक्टरांनी त्यांना शक्य असेल तिथल्या, त्यांच्या परिसरातील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये  सेवा देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यामुळे शासनाला सहकार्य तर होईलच पण आपल्या भागातील डॉक्टर आपल्याला येऊन पाहून गेल्याचा आनंद ही रुग्णांना मिळेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. आज राज्य टास्कफोर्समधील सर्व डॉक्टरर्स आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, उपचार पद्धती, औषधांचा वापर, त्याचे परिणाम, दुष्परिणाम सगळ्या गोष्टींवर ते आपल्याशी बोलतील, आपल्या शंकांचे निरसन करतील. मला विश्वास आहे आपण सगळे  चांद्यापासून बांद्यापर्यंतचे “माझा डॉक्टर” म्हणून ज्यांची महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला ओळख आहे ते या लढाईत उतरले तर आपण कोविडला महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.

‘तुम्ही देवदुत होऊन लढाईत उतरा’

आता पावसाळा उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. पावसाळा म्हटले की साथीचे आजार आले, लिप्टो आला, मलेरिया आणि डेंग्यु बरोबर ताप, सर्दी, खोकला पडसे आले.  या साथीच्या आजारांना रोखण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर असल्याचे आणि त्यात माझा डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या फॅमिली डॉक्टरची भूमिका खुप महत्वाची असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात सुरुवातीला फक्त 2 चाचणी प्रयोगशाळा होत्या. त्या आपण 500 वर नेल्या. आपण करोना चाचण्या वाढवल्या. आरोग्य सुविधांचा विस्तार केला. आता पावसाळ्यात होणारे आजार लक्षात घेता रॅपिड अँटीजन टेस्ट मोठ्याप्रमाणात घेण्याच्या सुचना आपण दिल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले

राज्यातील सर्व डॉक्टर्स आपल्या स्वत:च्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सैनिकाप्रमाणे या युद्धात उतरला आहात, शासन तुमच्या सोबत आहे. तुम्हाला आवश्यक असलेले सर्व सहकार्य शासन करील, तुमच्या अडचणींची जाणीव आहे त्या सोडवायला शासन प्राधान्य देत आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आज सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे बंद असतांना मग देव कुठे दिसतो, तर तो तुमच्यात दिसतो, तुम्ही देवदुत होऊन लढाईत उतरा, आपण कोविड विरुद्धची ही लढाई नक्की जिंकू असा विश्वास ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात राज्य टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहूल पंडित, डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं.

संबंधित बातम्या :

Tauktae Cyclone | जम्बो कोव्हिड सेंटरमधील रुग्णांचे स्थलांतर ते रुग्णालयात बॅकअप यंत्रणा, राज्य शासनाची नेमकी तयारी काय?

कोरोनाची तिसरी लाट आलेल्या अमरावतीत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

CM Uddhav Thackeray’s important appeal to all family doctors in the state