आधी अर्थ विभागाशी, कॅबिनेट बैठकीत चर्चा, नंतर मुख्यमंत्री 14 एप्रिलला लॉकडाऊनबाबत निर्णय जाहीर करणार : राजेश टोपे

आधी अर्थ विभागाशी, कॅबिनेट बैठकीत चर्चा, नंतर मुख्यमंत्री 14 एप्रिलला लॉकडाऊनबाबत निर्णय जाहीर करणार : राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 14 एप्रिलला कॅबिनेट बैठकीनंतर लॉकडाऊनबाबत घोषणा करतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली (Rajesh Tope on Lockdown).

चेतन पाटील

|

Apr 11, 2021 | 11:58 PM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचं प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे. राज्यात रविवारी (11 एप्रिल) दिवसभरात तब्बल 63 हजारांपेक्षाही जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जातंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 14 एप्रिलला कॅबिनेट बैठकीनंतर याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली (Rajesh Tope on Lockdown).

मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (11 एप्रिल) राज्याच्या टास्क फोर्ससोबत बैठक घेतली. या बैठकीत लॉकडाऊन विषयी चर्चा झाली. टास्क फोर्समधील जवळपास सर्वच तज्ज्ञांचं मत हे लॉकडाऊन लागू करावं, याच बाजूने आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत आरोग्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली (Rajesh Tope on Lockdown).

‘टास्क फोर्समधील अनेक सदस्यांची लॉकडाऊन करण्याबाबतची भूमिका’

“या बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा झाली. राज्यात सध्या लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टास्कफोर्समधील अनेक सदस्यांची भूमिका आहे. जरुर काही सदस्यांचं मत वेगळं असू शकतं. पण बहुतांश टास्क फोर्सचं मत लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असं मत होतं. याबाबत आता मुख्यमंत्री बुधवारी (14 एप्रिल) कॅबिनेट मिटिंग घेऊन चर्चा करुन योग्य निर्णय घेतील. त्यानंतर ते निर्णय घोषित करतील”, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली.

‘मुख्यमंत्री 14 एप्रिलला निर्णय घोषित करतील’

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक-दोन दिवस अर्थ विभाग आणि इतर विभागांशी चर्चा करतील. त्यानंतर बुधवारी (14 एप्रिल) कॅबिनेट बैठकीत विषय मांडतील. तिथे चर्चा करुन याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत घोषणा करतील”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

राजेश टोपे यांनी सांगितलेले आणखी काही महत्त्वपूर्ण मुद्दे :

  1. मुख्यमंत्र्यांनी आज टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीत फक्त टास्क फोर्सचे सदस्य होते. या बैठकीत ऑक्सिजन कसं वाढवता येईल, याबाबत चर्चा झाली. या बैठकीत ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट करण्याबाबत चर्चा झाली. ही सुविधा थोडी खर्चिक आहे. पण याबाबत नक्की प्रयोग करु, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
  2. दुसरं म्हणजे लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्टबाबत चर्चा झाली. हे प्लॅन्ट जिथे जिथे आहेत तिथे आपण सिलेंडर भरुन आणतो. त्या सिलेंडरला ट्यूबच्या माध्यमातून रुग्णांना देतो. मात्र, आता ज्या पद्धतीने या प्लॅन्टची संख्या आहे त्यानुसार ही पद्धत बंद करावी, हा मुद्दा चर्चेत मांडला. लिक्वेड ऑक्सिजन प्लॅन्ट प्रत्येक जिल्ह्यात टाकायचा, असा निर्णय घेण्यात आला. हा प्लॅन्ट टाकल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांसाठी ऑक्सिजन साठवता येऊ शकतं. त्यामुळे दररोजची पळापळ होणार नाही. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने बैठक घेणार आहेत. त्यावर तातडीने निर्णय होईल, असा विश्वास आहे.
  3. आपण बघतोय, अंत्यसंस्कारच्या ठिकाणी गर्दी होतेय. ही गर्दी होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी विद्युत शवदाहिनी उभारण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. याबाबत बैठक होऊन निर्णय घेतला जाणार आहे.
  4. या बैठकीत रेमडेसिव्हीर इंजेक्शनबाबत चर्चा झाली. हे इंजेक्शन आणखी दहा-पंधरा दिवस काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. कारण त्यानंतर आपल्याला चांगला साठा मिळेल. इंजेक्शनचा अनावश्यक वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतही चर्चा झाली.
  5. रेमडेसिव्हीर इंजेक्शन कलेक्टरच्या नियंत्रणाखाली खासगी हॉस्पिटलला देण्याचा निर्णय झाला आहे. तर सरकारी रुग्णालयाला थेट कंपनीकडून इंजेक्शन दिलं जाईल. त्यांची रेट कॅपिंगही केली जाईल. हे इंजेक्शन 1400 रुपयांवर दिले जाणार नाही. काल मी याबाबत आग्रही भूमिका घेतली. रेमडेसिव्हीरची निर्यात थांबवली जावी, अशी मागणी आम्ही लावून धरली होती. अखेर त्यानंतर आज सरकारने रेमडेसिव्हीर इंजेक्शन निर्यात केलं जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा आभारी आहे.
  6. राज्यातील काही शहरांमध्ये ऑक्सिजन बेड्स आणि व्हेंटिलेटर बेड्सची उपलब्धता अडचणीत आहे. त्यामुळे दोन-एक दिवसात अर्थ विभाग आणि अन्य विभागाची चर्चा होईल. कदाचित मुख्यमंत्री कॅबिनेट बैठकीत चर्चा करतील. त्यानंतर उचित निर्णय मुख्यमंत्री घोषित करतील.

मुख्यमंत्र्यांची आधी सर्वपक्षीय बैठक

राज्यात कोरोना परिस्थिती बघता तातडीने आठ ते पंधरा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचा मुख्यमंत्र्यांच्या विचार आहे. याबाबत सर्वपक्षीय नेत्यांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांनी शनिवारी (10 एप्रिल) बैठक घेतली. या बैठकीत विरोधकांनी सरकार जो निर्णय घेईल, त्याला आमचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र, राज्यातील जनतेला लॉकडाऊन काळात दिलासा मिळावा, यासाठी सरकारने काहीतरी आर्थिक पॅकेज जाहीर कारावा, असं भाजपच्या नेत्यांचं मत आहे. याबाबत राज्य सरकार निश्चितच काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

संबंधित बातमी : मोठी बातमी ! लॉकडाऊन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन ते ऑक्सिजनचा पुरवठा, टास्क फोर्सच्या बैठकीत पाच महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें