Malvan Kankavli Nagar Parishad election Result 2025 : मालवण, कणकवली जिंकलं निलेश राणेंची भावावर मात, मी आनंदी आहे, पण आमचा परिवार..
Malvan Kankavli Nagar Parishad election Result 2025 : "जिल्हा परिषदेसाठी त्या त्यावेळी जी पावलं उचलावी लागतात ती उचलू. जिल्हा परिषदेसाठी युती झाली पाहिजे हा आग्रह आहे. कार्यकर्त्यांच्या या निवडणुका गडबड न होता त्यांना सहजतेने लढवता आल्या पाहिजेत"

कोकणातील बहुचर्चित मालवण आणि कणकवली नगर परिषदांचे निकाल लागेल आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या दोन्ही नगर परिषदा येतात. सिंधुदुर्गातील ही निवडणूक खूप गाजली. राणे विरुद्ध राणे, राणे विरुद्ध भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिवसेना विरुद्ध भाजप अशी किनार या निवडणुकीला होती. कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी पैसे वाटपाचा आरोप केला होता. त्यांनी काही लाखांची रक्कम पकडून दिली होती. त्यामुळे ही निवडणूक जास्त चर्चेत आली. आता मालवण आणि कणकवलीचा निकाल लागला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपवर मात केली आहे. निलेश विरुद्ध नितेश या स्पर्धेत निलेश राणे यांनी बाजी मारली आहे. कोकणातील हा निकाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उत्साह वाढवणारा आहे.
“खरा विजय हा सहकाऱ्यांचा, सर्व शिवसैनिकांचा आहे. शिंदे साहेबांनी जो आशिर्वाद दिला, पाठिंबा दिला, मार्गदर्शन केलं त्याचा हा विजय आहे. आमच्या जिल्हाप्रमुखांनी, शिवसैनिकांनी विजयासाठी रक्ताच पाणी केलं” अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली. “निवडणूक जिंकली. जनतेनेत आशिर्वाद दिलाय. 21 व्या शतकाला साजेस शहर बनवण्यासाठी जी पावलं उचलावी लागतात, ते काम पारदर्शकपणे करणार” असं निलेश राणे म्हणाले.
परिवार तसाच अबाधित राहणार
मित्र पक्ष भाजप, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर संघर्ष झाला. त्यावर निलेश राणे म्हणाले की, “निवडणूक जिंकण्यासाठी जे काही करावं लागतं ते केलं. प्रत्येक जण आपपाल्यापरीने प्रयत्न करतो. त्यांनी सुद्धा त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. भाजप माझ्यासाठी वेगळा नाही. मरेपर्यंत भाजपला वेगळा मानू शकत नाही. तो ही परिवारच आहे. आज निवडून आलो हा जनतेचा विजय आहे. परिवार तसाच अबाधित राहणार”
कोणाचा पराभव साजरा करणारा मी माणूस नाही
कणकवलीत शहर विकास आघाडीचे संदेश पारकर निवडून आले. भाजपच्या समीर नलावडे यांचा पराभव झाला. त्यावर सुद्धा निलेश राणे बोलले. “मी एकाबाजूला आनंदी आहे. दुसऱ्याबाजूला दु:खी आहे. आमचा परिवार भाजपचा पराभव झाला, त्याचं दु:ख आहे. कोणाचा पराभव साजरा करणारा मी माणूस नाही. ते आमचेच आहेत. विजयासाठी संदेश पारकर यांचं अभिनंदन करतो” असं निलेश राणे म्हणाले.
कुठे कमी पडलो याचं चिंतन करु
मालवणमध्ये मोठा विजय झालाय. 10 शिवसेनेचे, 5 भाजपचे, 5 उबाठाचे निवडून आले. त्यावर निलेश राणे यांनी उत्तर दिलं की, ’20 पैकी 20 जागा जिंकण्याचा इरादा होता. कुठे कमी पडलो याचं चिंतन करु’
निलेश राणे यांना मंत्रिपदाचं प्रमोशन मिळणार का?
सिंधुदुर्गात एवढ्या मोठ्या विजयामुळे निलेश राणे यांना मंत्रिपदाचं प्रमोशन मिळेल असं म्हटलं जातय. ‘माझ्या घरात नितेशच्या रुपाने एक मंत्रीपद आहे, त्यात मी समाधानी आहे’ असं उत्तर त्यांनी दिलं.
