“भाजप परिवारातील या गुन्हेगारांना कोण वाचवत आहे?” ठाकरे गटाचा सवाल
ठाकरे गटाने भाजप आणि संघाच्या नेत्यांनी मराठी भाषेचा केलेल्या अपमानावर आणि औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर तीव्र निषेध व्यक्त केला आहे. भैयाजी जोशी यांच्या मुंबईची भाषा मराठी नाही या विधानावरून वाद निर्माण झाला आहे.

“आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत,” असे सांगणारे एकनाथ शिंदे व त्यांचे लोकही औरंगजेबाचा गौरव होताना आणि मराठीवर हल्ले सुरू असताना षंढासारखे शांत राहिले, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. भैयाजी जोशी यांनी मुंबईत येऊन केलेले विधान लखनऊवरून आलेल्या समाजवादी पार्टीच्या नेत्याने किंवा अबू आझमींनी केले असते तर देवेंद्र फडणवीस व त्यांच्या आमदारांनी सभागृहात दंगल केली असती आणि या सगळ्यांवर राजद्रोहाचे खटले दाखल करायला लावले असते, अशी टीकाही ठाकरे गटाने रोखठोकमधून केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्राच्या रोखठोक या सदरातून टीका करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी हे मुंबईत येऊन जोरात म्हणाले, “मुंबईची भाषा मराठी नाही.” यावर राज्य सरकार थातूरमातूर उत्तरे देऊन गप्प बसले. मराठीचा अपमान आणि औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे आपल्याच घरातले आहेत. अबू आझमींवर कारवाई झाली, पण भाजप परिवारातील या गुन्हेगारांना कोण वाचवत आहे? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.
दुकानदाराने मराठी भाषेचा अपमान केला तर…
मराठी भाषा आणि मराठी माणसाचे खरे शत्रू आपल्या घरातच आहेत त्याचे प्रत्यंतर रोजच येत आहे. गेल्या 40-45 वर्षांच्या राजकीय, सामाजिक आणि वृत्तपत्रीय जीवनात अनेक लढाया माझ्यासारखे कित्येक जण लढले. त्यात मराठी भाषेची लढाई ही कधीच संपणार नाही. कारण मराठीवर घाव घालणारे घरातच आहेत. जगाच्या इतिहासात अशी कोणतीही लढाई नसेल की, ज्या लढाईत शत्रूच्या हल्ल्यामुळे नव्हे तर ज्यासाठी आपण लढतो, त्या जनतेच्या दुराग्रहामुळे सैन्याला पीछेहाट पत्करावी लागली असेल. भारतीय जनता पक्षाचे व खास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख नेते भैयाजी जोशी यांनी महाराष्ट्राच्या राजधानी मुंबई शहरात येऊन एक धक्कादायक विधान केले. त्यांनी सांगितले, “मुंबईची भाषा मराठी नाही. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी यायलाच पाहिजे असे नाही.” श्री. जोशी यांनी पुढे जाऊन असे जाहीर केले की, “मुंबईतील घाटकोपरसारख्या भागाची भाषा ही गुजरातीच आहे.” मुंबईत येऊन केलेल्या या विधानाने महाराष्ट्राचे मन दुखावले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला. छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजीराजांची ही मराठी भाषा. याच भाषेतून महाराष्ट्र निर्मिती झाली. त्या महाराष्ट्रासाठी ज्या 106 हुतात्म्यांनी बलिदान दिले, त्या हुतात्म्यांची भाषा ही मराठी, पण भैयाजी जोशींसारखे ज्येष्ठ नेते “मराठी कशाला?” हा प्रश्न मुंबईत येऊन विचारतात व महाराष्ट्र थंड राहतो. सरकार पक्षाचे लोक जोशी यांच्या विधानाचे समर्थन करतात. मराठीसाठी लढा देणारे मुंबईत अनेक जण. एखाद्या सामान्य अमराठी दुकानदाराने मराठी भाषेचा अपमान केला तर हे मराठीवादी त्या दुकानदाराच्या कानाखाली आवाज काढतात व त्याचा गाजावाजा करून प्रसिद्धी मिळवतात, पण भैयाजींसारखा संघाचा ज्येष्ठ नेता मराठीबाबत गंभीर विधान करतो तेव्हा हे सर्व पक्ष आणि कार्यकर्ते शांत बसतात, अशा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
…त्यांनी महाराष्ट्रात पाऊल ठेवू नये
छत्रपतींचा मराठी अभिमान राजकारणासाठी नेत्यांना छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी हवे असतात. त्यांना औरंगजेबही लागतो, पण छत्रपतींची मराठीबाबतची भूमिका त्यांना मान्य नाही. हिंदवी स्वराज्य झाल्यावर भाषेचा प्रश्न आला. स्वराज्याची भाषा कोणती? फारसी की मराठी? छत्रपतींनी त्यासाठी अभ्यास समिती नेमली नाही. छत्रपतींनी सांगितले, “महाराष्ट्राची भाषा मराठी.” असे सांगून छत्रपतींनी मराठी ही राजभाषा केली. राज्याभिषेक करून छत्रपतींनी पहिले काम करून घेतले ते म्हणजे ताबडतोब ‘मराठी राजभाषा कोश’ तयार करून परकीय भाषेची महाराष्ट्रातून हकालपट्टी केली. हा इतिहास ज्यांना माहीत नाही त्यांनी महाराष्ट्रात पाऊल ठेवू नये. मात्र मुंबईची भाषा मराठी नाही, असे उघडपणे बोलणाऱ्यांना सरकारचे संरक्षण आज मिळते.
भाषेवर हल्ले करणाऱ्यांना ते अभय देतात
मराठी ही मुंबईची भाषा नाही असे बोलणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकारनेही राजद्रोहाचे गुन्हे दाखल करायला हवेत, पण महाराष्ट्रात कोण कोणत्या जातीचा व धर्माचा माणूस विधान करतोय त्यावर कारवाया होतात. भैयाजी जोशी यांनी मुंबईत येऊन केलेले विधान लखनऊवरून आलेल्या समाजवादी पार्टीच्या नेत्याने किंवा अबू आझमींनी केले असते तर देवेंद्र फडणवीस व त्यांच्या आमदारांनी सभागृहात दंगल केली असती आणि या सगळ्यांवर राजद्रोहाचे खटले दाखल करायला लावले असते, पण भैयाजी जोशी हे भाजपचे नेते आहेत. त्यांचा साधा निषेधही कोणी केला नाही व मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या उत्तरावर सगळेच खूश. “मुंबईची भाषा मराठीच आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले, पण त्या भाषेवर हल्ले करणाऱ्यांना ते अभय देत आहेत, असेही ठाकरे गटाने म्हटले.
महाराष्ट्रात मराठी भाषा, इतिहास आणि स्वाभिमानाच्या बाबतीत फडणवीस यांचे सरकार कशी दुटप्पी भूमिका घेत आहे ते पाहणे गरजेचे आहे. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी विधान भवनाच्या परिसरात औरंगजेबाविषयी गौरवोद्गार काढले. त्यामुळे शिवराय आणि संभाजीराजांचा अपमान झाला. सरकारने अबू आझमी यांचे विधानसभेतून निलंबन केले. आता त्यांना अटक करण्याची मागणी सगळेच करीत आहेत, पण भाजपशी संबंधित ‘महान’ लोकांनी याच काळात दिवसाढवळ्या शिवरायांचा अपमान केला. ते सर्व लोक मोकाट आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आतापर्यंतचा सगळ्यात घाणेरडा आरोप केला. शिवाजी महाराज हे भ्रष्टाचारी असल्याचेच राहुल सोलापूरकर यांनी म्हटले. “महाराज औरंगजेबाच्या कैदेतून ‘आग्रा’ येथून सटकले ते शौर्य वगैरे अजिबात नव्हते. महाराजांनी पहारेकऱ्यांना व औरंगजेबाच्या लोकांना लाच दिली व सुटले,” असे विधान करून सोलापूरकर यांनी आग्य्राच्या सुटकेचा इतिहासच बदलला. यावर सोलापूरकरांवर काय कारवाई झाली? कोरटकरच्या जागी एखादा ‘खान’ असता तर फडणवीसांच्या सरकारने इतिहासाच्या नावाने हल्लाबोल केला असता. फडणवीस विधानसभेत म्हणाले, “कोरटकर हा चिल्लर माणूस आहे.” त्या चिल्लर माणसाचे फडणवीसांपासून मोहन भागवतांपर्यंत सगळ्यांशी संबंध आहेत. त्याची भाजप वर्तुळात उठबस असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. हा चिल्लर भाजप आणि संघ परिवाराचा असल्याने धमक्या देऊन शिवरायांचा अपमान करूनही मोकाट कसा? कोरटकर, सोलापूरकर यांच्यावर कारवाई न करणे म्हणजे भाजपपुरस्कृत औरंगजेबाचे उदात्तीकरणच आहे, असे रोखठोकमधून सांगितले.
शिवरायांच्या महाराष्ट्रात त्यांच्या मराठी भाषेचा अपमान होतो व औरंगजेबाचा गौरव होतो. भाषेचा अपमान आणि औरंगजेबाचा गौरव करणाऱ्यांवर मुख्यमंत्री फडणवीस कारवाई करत नाहीत. हे चित्र चांगले नाही. अजित पवार यांच्याकडून काहीच अपेक्षा करता येत नाहीत, पण “आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत,” असे सांगणारे एकनाथ शिंदे व त्यांचे लोकही औरंगजेबाचा गौरव होताना आणि मराठीवर हल्ले सुरू असताना षंढासारखे शांत राहिले. अबू आझमींवर कारवाई करा असे सांगणारे शिंदे हे भैयाजी जोशी, राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरने केलेल्या त्याच गुन्ह्यावर गप्प बसले. महाराष्ट्रात ढोंग वाढते आहे. मराठीचा अपमान, औरंगजेबाचा गौरव त्या ढोंगाचीच निर्मिती आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली.
