Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांना मराठीचं नाव घेतल्यावर मिर्चा का झोंबतायत?, संजय राऊत यांचा हल्लाबोल

राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मुद्यावरून राजकारण तापले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सक्तीचे जोरदार समर्थन केले. मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी भाषेच्या नावाखाली मारहाणीस विरोध केला. यावर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर देत, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकावी हीच खरी भूमिका असल्याचे ठामपणे सांगितले.

Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांना मराठीचं नाव घेतल्यावर मिर्चा का झोंबतायत?, संजय राऊत यांचा हल्लाबोल
संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
Image Credit source: TV9
| Updated on: May 01, 2026 | 11:03 AM

राज्यातील मराठी सक्तीचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आला आहे. अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी येणं अनिवार्य असल्याची भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यांनी घेतली. त्याला रिक्षा , टॅक्सीचालक संघटनांकडून विरोध करण्यात आल्यावर ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. याच मुद्यावरून काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तोफ डागली. आम्ही मराठी बोलणार नाही, असं म्हणण्याची यांची हिंमतच कशी होते? यांचे लायसन्स रद्द करा अशी मागणी राज ठाकरे यांनी काल केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं. मराठी भाषा, अस्मिता जोपासली पाहिजे, पण भाषेच्या नावाखाली कोणाला मारहाण करणं हे आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका फडणवीसांनी घेतली.

मात्र याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना थेट प्रत्युत्तर दिल. मुख्यमंत्र्यांना मराठीचं नाव घेतल्यावर मिर्चा का झोंबतायत, असा सवाल विचारत त्यांनी हल्लाबोल चढवला.

काय म्हणाले राऊत ?

मग सक्तीचा अर्थ काय ? तुम्ही इथे पाहुणे म्हणून येत असाल, जस्ं आपण अनेक देश, राज्यांमध्ये जातो, तिथली भाषा शिकायची गरज नसते. आपण काश्मीरला गेलो, तर तिकडली भाषा शिकत नाही, फिरायला सिमल्याला किंवा अन्य राज्यात, 4 दिवस जातो आणि परत येतो.असे जर कोणी महाराष्ट्रात येत जात असतील, त्यांना भाषा शिकण्याचा कुठे आग्रह आहे ? पण जे इथे येऊन वर्षानुवर्ष राहू इच्छितात, कामधंदा करायची ज्यांना इच्छा आहे, त्यांनी मराठी भाषा शिकावी, ही आमची भूमिका आहे. मराठीचं नाव घेतल्यावर मुख्यमंत्र्यांना इतक्या मिर्चा का झोंबतायत, असा थेट सवाल राऊत यांनी विचारला.

मधल्या काळात या महाराष्ट्रात फक्त मराठी सक्तीची राहील, अशी तुमची गर्जना होती, त्याचं काय झालं ? राज ठाकरे यांचं बरोबर आहे, उद्धव ठाकरे यांचीही तीच भूमिका आहे. आणि बाळसाहेब ठाकरे यांचीही तीच भूमिका होती. इथे, राहणाऱ्या माणसाला मराठी येणं गरजेचं आहे. हे फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, त्या त्या राज्यामध्ये जे नोकरीसाठी जातात, त्यांना त्या राज्यातील भाषा आली पाहिजे. भाषावर प्रांतरचना म्हणजे काय, ती का झाली, याचा अभ्यास मुख्यमंत्र्यांनी करणं फार गरजेचं आहे, असंही राऊत म्हणाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us