पाऊस न पडण्याचं सर्वात मोठं कारण आलं समोर, किनारपट्टी भागात ढगच… काय आहे नवी अपडेट?

महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा ओढ दिल्याने शेतकऱ्यांसह नागरिक चिंतेत आहेत. किनारपट्टी भागात पावसाचे ढगच कमी असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात तुरळक पाऊस असून, आर्द्रतेमुळे उकाडा वाढला आहे. रत्नागिरीत सरासरीपेक्षा खूप कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने 18 ते 20 जुलैनंतर पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पाऊस न पडण्याचं सर्वात मोठं कारण आलं समोर, किनारपट्टी भागात ढगच... काय आहे नवी अपडेट?
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jul 16, 2026 | 3:16 PM

आधीच उशिरा आलेल्या पावसाने आठ दिवस हजेरी लावली आणि त्यानंतर पुन्हा गायब झाला आहे. जून कोरडाच गेला. त्यानंतर आता जुलैचा अर्धा महिना उलटून गेला आहे. पाहिजे त्या प्रमाणात पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच चिंता लागली आहे. त्यातच आता आणखी एक चिंता करणारी बातमी येऊन धडकली आहे. त्यामुळे पावसाचे काळेकुट्ट ढग आकाशात जमण्याऐवजी सामान्यांच्या डोक्यावर चिंतेचे ढग जमा झाले आहे. किनारपट्टी भागात पाऊस वाहून नेणारे ढगच कमी असल्याने पावसाने ओढ दिल्याची नवीन अपडेट समोर आली आहे.

कोकणात दमट हवामान आहे. त्यामुळे पावसाच्या केवळ तुरळक सरी पडत आहेत. पावसाच्या एकूण सरासरीच्या तुलनेत गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 11. 14 टक्के पावसाची नोंद झाली आहे. ढगाळ हवामान, त्यात तुरळक पावसाच्या सरींचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. किनारपट्टी भागात पाऊस वाहून येणारे ढग कमीच आहेत. त्यामुळे जुलै महिना अर्धा संपला तरी समाधानकारक पाऊस झालेला नसल्याचं हवामान विभागातील सूत्रांनी सांगितलं.

उकाड्याने हैराण

किनारपट्टी भागातील हवेतील आद्रता 75 टक्यांवर आहे. त्यामुळे किनारपट्टी लगत राहणारे लोक उकाड्याने हैराण झाले आहेत. हवेतील आद्रता 60 टक्यांवर गेल्यावर प्रचंड उकाडा जाणवतो. तोच परिणाम आता दिसू लागला आहे. 18 जुलै ते 20 जुलै दरम्यान नंतरच पाऊस होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

सोलापुरात यलो अलर्ट

दरम्यान, सोलापूर जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र काल सायंकाळी काही तालुक्यात पाऊस झाल्याने बळीराजा काहीसा सुखावला. मात्र, अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील पेरण्या रखडल्या आहेत. जिल्ह्यात केवळ 20 ते 21 टक्केच पेरण्या झाल्या आहेत. त्यातच हवामान विभागाने आज पावसाचा यलो अलर्ट जाहीर केल्याने शेतकरी आनंदी झाला आहे. जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असले तरी अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे आज तरी पाऊस पडतो की नाही हे पाहणे महत्वाचे आहे.

Follow Us