महिला खासदारांनी महाराष्ट्राची धमक दाखवताच पटक पटक के मारेंगे म्हणाऱ्या दुबेंनी जोडले हात, संसदेच्या लॉबीत काय घडलं?
भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या मराठी विरोधी वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर महाराष्ट्रातील तीन महिला खासदारांनी संसदेत त्यांना घेरून जाब विचारला. "जय महाराष्ट्र"च्या घोषणांनी संसद गजबजली. दुबे यांच्या मराठी माणसाला मारण्याच्या धमक्यांना महिला खासदारांनी कडाडून उत्तर दिले. या घटनेमुळे संसदेत एक वेगळेच वातावरण निर्माण झाले.

हिंदी विरुद्ध मराठीच्या वादात उतरून मराठी माणसाला पटक पटक के मारेंगेचा इशारा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिला होता. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दुबेंना थेट मुंबईत येण्याचं आव्हान देत, तुम्ही मुंबईत या, तुम्हाला बुडवून बुडवून मारू, असा इशारा दिला होता. त्यानंतर हा वाद थांबेल असं वाटत होतं. पण आज महाराष्ट्रातील तीन रणरागिणींनी, तीन महिला खासदारांनी संसदेच्या लॉबीतच निशिकांत दुबे यांना घेरून जाब विचारला. यावेळी या तिन्ही महिला खासदारांनी जय महाराष्ट्राचे नारे देत महाराष्ट्राची ताकद आणि धमक दाखवली. त्यामुळे निशिकांत दुबे पाहतच राहिले. पार्लमेंटची लॉबी जय महाराष्ट्राच्या घोषणांनी घुमताच असंख्य खासदार लॉबीत आले. महिला रणरागिणींचं हे आक्रमक रूप पाहून दुबे गुपचूप निघून गेले.
महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली पासून हिंदी लादण्याचा निर्णय घेतला होता. त्याला महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी कडाडून विरोध केला. दोन्ही ठाकरे बंधुंनी सरकारच्या या तुघलकी निर्णायविरोधात मोर्चाची हाक दिली होती. त्यामुळे सरकार बॅकफूटवर आले आणि हा निर्णय बदलला गेला. मात्र, त्यानंतरही भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी पटक पटक के मारेंगेची भाषा वापरली. त्यामुळे संतापलेल्या राज ठाकरेंनी दुबेंना डुबो डुबो के मारेंगेचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर संसदेचं अधिवेशन सुरू असतानाच महाराष्ट्रातील महिला खासदारांनी दुबेंना घेरलं आणि जाब विचारला.
त्या रणरागिणी कोण?
आज संसदेचं अधिवेशन सुरू झालं. सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातल्याने संसदेचं कामकाज काहीवेळासाठी तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर दक्षिण मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड, धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर या तिन्ही महिला खासदार लॉबीत आल्या. त्या निशिकांत दुबेंना शोधत होत्या. तिन्ही महिला खासदारांनी दुबेंना लॉबीत शोधलं आणि त्यांना घेरलं. त्यानंतर तिन्ही महिला खासदारांनी दुबेंवर प्रश्नांचा भडिमार सुरू केला. या महिला रणरागिणींनी जाब विचारता विचारताच जय महाराष्ट्रचे नारेही दिले. महिला खासदारांचा हा आवेश पाहून दुबे शांत उभे होते. काय करावं हेच त्यांना कळत नव्हतं.
दुबेंचा काढता पाय
मराठी लोकांना मारण्याची भाषा तुम्ही कशी वापरू शकता? तुम्ही पटक पटक के कसं मारणार? मराठी माणसा विरोधातील तुमची भाषा आम्ही खपवून घेणार नाही, असा सवाल महिला खासदारांनी केला. महिला खासदारांनी दुबेंना घेरल्याचं कळल्यानंतर इतर खासदारही लॉबीत आले आणि त्यांनीही दुबेंना धारेवर धरण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं. आता आपली खैर नाही, असं लक्षात आल्यानंतर दुबेंनीही तिथून काढता पाय घेतला.
तुम्ही माझी बहीण आहात
पत्रकारांनाही या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पत्रकारांनी लॉबीत धाव घेतली. त्यांनी वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. त्यावर वर्षा गायकवाड यांनी पूर्ण घटनाक्रम सांगितला. दुबेंनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्याचा जाब आम्ही त्यांना विचारला. आम्ही जाब विचारत असताना दुबे निघून गेले. त्यानंतर दुबे परत आले तेव्हा आम्ही जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. त्यावर तुम्ही माझ्या बहिणी आहात असं हातजोडून दुबे म्हणाले आणि निघून गेले, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
