तुमच्या महापालिकेत किती प्रभाग? एकूण किती नगरसेवक निवडून येणार? जाणून घ्या A टू Z माहिती
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून मुंबई, पुणे, नागपूरसह सर्व शहरांतील वॉर्ड आणि जागांची सविस्तर माहिती येथे वाचा.

राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बहुप्रतिक्षित वेळापत्रक जाहीर केले आहे. गेल्या १५ डिसेंबर २०२५ रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्या शहराचा विकास आराखडा आणि नागरी सुविधांची जबाबदारी नगरसेवकांवर असते. त्यामुळे आपल्या महापालिकेत नेमके किती वॉर्ड (प्रभाग) आहेत आणि किती लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात, याची माहिती असणे प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे आहे.
राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसह एकूण २९ महानगरपालिकांमधील वॉर्डांची संख्या जाहीर झाली आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये एकूण २८६९ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यानुसार आपण प्रत्येक विभागात किती वॉर्ड आहेत, याची माहिती जाणून घेऊया.
महाराष्ट्र महानगरपालिका : विभागानुसार वॉर्डांची संख्या
| विभाग | महानगरपालिका | वॉर्ड (प्रभाग) संख्या |
| कोकण विभाग | मुंबई | 227 |
| ठाणे | 131 | |
| नवी मुंबई | 111 | |
| कल्याण डोंबिवली | 122 | |
| उल्हासनगर | 78 | |
| भिवंडी निजामपूर | 90 | |
| मिरा भाईंदर | 96 | |
| वसई विरार | 29 (115 नगरसेवक) | |
| पनवेल | 78 | |
| पश्चिम महाराष्ट्र | पुणे | 42 (162 नगरसेवक) |
| पिंपरी चिंचवड | 32 (128 नगरसेवक) | |
| सोलापूर | 113 | |
| कोल्हापूर | 92 | |
| इचलकरंजी | 76 | |
| सांगली-मिरज-कुपवाड | 78 | |
| उत्तर महाराष्ट्र | नाशिक | 122 |
| अहिल्यानगर | 68 | |
| जळगाव | 75 | |
| धुळे | 74 | |
| मालेगाव | 84 | |
| मराठवाडा | छत्रपती संभाजीनगर | 113 |
| नांदेड-वाघाळा | 81 | |
| परभणी | 65 | |
| जालना | 65 | |
| लातूर | 70 | |
| विदर्भ | नागपूर | 151 |
| अमरावती | 87 | |
| अकोला | 80 | |
| चंद्रपूर | 66 |
राजकीय प्रचाराचा धुरळा उडणार
दरम्यान राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका केवळ स्थानिक विकासासाठीच नव्हे, तर आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. वाढते शहरीकरण आणि वाढलेली लोकसंख्या विचारात घेता, अनेक ठिकाणी प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली आहे. या निवडणुकांच्या माध्यमातून शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांचे भवितव्य ठरवले जाणार आहे. प्रशासनाकडूनही या प्रक्रियेसाठी जय्यत तयारी सुरू असून, लवकरच राजकीय प्रचाराचा धुरळा उडताना पाहायला मिळेल.
