कुठे ओबीसी, तर कुठे ST; तुमच्या शहरातील महापौरपद कोणासाठी राखीव? पाहा संपूर्ण यादी
राज्यातील २९ महानगरपालिकांचे महापौर आरक्षण जाहीर झाले असून मुंबई, पुणे आणि नागपूरसह १० शहरांत महिलांचे वर्चस्व असेल. ठाण्यात एससी तर कल्याणमध्ये एसटी आरक्षण निश्चित झाले आहे, संपूर्ण यादी येथे वाचा.

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात काढण्यात आली. नगरविकास विभागाने जाहीर केलेल्या या आरक्षणामुळे अनेक शहरांतील सत्तेची समीकरणे बदलणार आहेत. विशेषतः मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या १० मोठ्या शहरांमध्ये महापौरपद खुला प्रवर्ग महिला गटासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे या शहरांमध्ये आता महिला महापौर विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सामान्यतः निवडणुकांपूर्वी आरक्षण जाहीर केले जाते. मात्र यंदा निवडणुका पार पडल्यानंतर ही सोडत काढण्यात आल्याने विजयी उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर ही सोडत काढण्यात आल्याने अनेक शहरांतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. ज्या राजकीय पक्षांनी किंवा आघाड्यांनी बहुमताचा आकडा गाठला आहे, त्यांना आता आपल्या विजयी महिला उमेदवारांमधून महापौराची निवड करावी लागणार आहे. अनेक ठिकाणी दिग्गज पुरुष उमेदवारांनी महापौरपदाच्या आशेने निवडणूक लढवली होती आणि विजयही मिळवला होता, मात्र आता ते पद महिलांसाठी राखीव झाल्याने या नेत्यांचा हिरमोड झाला आहे.
तर दुसरीकडे, पहिल्यांदाच निवडून आलेल्या किंवा अनुभवी महिला नगरसेवकांसाठी ही सोडत लॉटरी ठरली आहे. पक्षांतर्गत आता महापौरपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. या आरक्षणामुळे केवळ सत्तेचेच नाही, तर आगामी काळातील स्थानिक राजकारणाचे संदर्भही बदलणार असून महिला नेतृत्वाला राज्याच्या मुख्य प्रवाहात येण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे.
1. खुला प्रवर्ग महिला (१० महापालिका) : या गटात सर्वाधिक मोठ्या शहरांचा समावेश आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नवी मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, ठाणे (बदलानुसार), धुळे, मीरा भाईंदर, मालेगाव आणि नांदेड-वाघाळा या शहरांत महिलांच्या हाती सत्तेची सूत्रे असतील.
2. ओबीसी प्रवर्ग (OBC Reservation) :
ओबीसी महिला (४): चंद्रपूर, जळगाव, अकोला आणि अहिल्यानगर
ओबीसी सर्वसाधारण (४): पनवेल, इचलकरंजी, कोल्हापूर आणि उल्हासनगर
3. अनुसूचित जाती आणि जमाती (SC/ST) :
एसटी (ST): कल्याण-डोंबिवली महापालिकेत अनुसूचित जमातीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
एससी (SC): ठाणे महापालिकेत अनुसूचित जातीचे आरक्षण असेल.
एससी महिला: जालना आणि लातूर या दोन शहरांत एससी महिला महापौर होतील.
4. खुला प्रवर्ग (७ महापालिका) : अमरावती, परभणी, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाड, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार आणि पिंपरी-चिंचवड या महापालिकांमध्ये महापौरपद कोणत्याही प्रवर्गासाठी आरक्षित नसून ते ‘ओपन’ ठेवण्यात आले आहे.
राजकीय हालचालींना वेग
निवडणुकीचे निकाल लागलेले असल्याने आता या आरक्षणामुळे कोणत्या पक्षाचा महापौर बसणार, याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. ज्या प्रभागांमध्ये महिला उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर विजय मिळवला आहे, त्या पक्षांचा दावा आता प्रबळ झाला आहे. पुढील १५ दिवसांत महापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
