
राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांची लगबग सध्या सुरु झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवार निवडणुकीसाठी अर्ज भरताना दिसत आहेत. पुणे, नागपूर आणि मालेगावमध्ये अर्ज विक्रीचा आकडा हजारोच्या घरात आहे. मात्र प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याबाबत उमेदवारांनी अद्याप सावध भूमिका घेतल्याचे चित्र आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप अधिकृत उमेदवार याद्या आणि ए बी फॉर्मचे वाटप पूर्ण न केल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
पुण्यात आतापर्यंत ९,१७१ पेक्षा जास्त अर्जांची विक्री झाली आहे, परंतु शनिवार अखेर केवळ ३८ जणांनी प्रत्यक्ष अर्ज दाखल केले आहेत. येत्या मंगळवारी ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. आज रविवार (२८ डिसेंबर) सुट्टी असल्याने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे उद्या सोमवार आणि परवा मंगळवार असे केवळ दोनच दिवस उमेदवारांकडे शिल्लक आहेत. त्यातच महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूंकडून अधिकृत उमेदवारांची यादी गुलदस्त्यात आहे. वेळेआधी नावे जाहीर केल्यास नाराज इच्छुक उमेदवार अपक्ष किंवा विरोधी पक्षात जाऊन बंडखोरी करण्याची शक्यता असल्याने पक्षांनी ही सावधगिरी बाळगली आहे.
तसेच भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयात अर्ज भरण्यासाठी गेलेल्या आंदेकर कुटुंबियांच्या अर्जात त्रुटी आढळल्याने त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना पुन्हा प्रयत्न करावा लागणार आहे.
नागपूर महानगरपालिकेत १५१ जागांसाठी निवडणूक होत आहे. येथे ४ दिवसांत केवळ २१ अर्ज आले आहेत, प्रस्थापित पक्षांनी ए बी फॉर्म न दिल्याने अनेक मातब्बर इच्छुक अद्याप वेटिंगवर आहेत. दाखल झालेल्या २१ अर्जांपैकी बहुतांश हे अपक्ष किंवा लहान पक्षांचे आहेत. आता उद्या सोमवारपासून निवडणूक कार्यालयांत होणारी गर्दी लक्षात घेता अतिरिक्त खिडक्या आणि पोलीस बंदोबस्त वाढवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
तर मालेगावमध्ये ८४ जागांसाठी राजकीय रणसंग्राम सुरू आहे. या अर्ज विक्रीतून महापालिकेला आतापर्यंत २.६२ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. १३८१ अर्ज विक्री झाले असून ७१८ इच्छुक शर्यतीत आहेत. समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि AIMIM यांसारख्या पक्षांनी काही जागांवर उमेदवार जाहीर केले असले तरी, शिवसेना-भाजप युतीचा निर्णय न झाल्याने येथील पेच अद्याप सुटलेला नाही.