EVM सोबतचे नवीन मशीन नक्की कोणतं? राज ठाकरेंचा संताप, म्हणाले शिवसैनिक आणि मनसेसैनिकांनो….
हापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या नवीन नियमांवर आणि मशीनच्या वापरावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. मतदानाच्या दिवशीपर्यंतच्या भेटी आणि पैसे वाटपाच्या आरोपांनी राजकारण तापले आहे.

राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. गुरुवारी १५ जानेवारीला महाराष्ट्रात सर्वत्र मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या एका नव्या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना मतदानाच्या दिवसापर्यंत घरोघरी जाऊन भेटी घेण्याची मुभा देणाऱ्या नियमावरून त्यांनी सरकार आणि आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.
राज ठाकरे यांनी नुकतंच प्रसारमाध्यामंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या प्रचाराच्या नव्या नियमावलीबद्दल सवाल केले. तसेच ईव्हीएमसोबत असणाऱ्या मशीनवरही त्यांनी संशय व्यक्त केला. प्रचाराची अधिकृत वेळ संपल्यानंतर मतदानाच्या दिवसापर्यंत मतदारांच्या भेटी घेण्याची नवीन मुभा केवळ याच निवडणुकीत का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
प्रचार थांबला. आम्ही इतकी वर्ष निवडणूक पाहत आहोत. त्यात निवडणुकीचा प्रचार ५ वाजता संपल्यावर दुसरा दिवस रिकामा आणि नंतर मतदान, ही आजपर्यंतची प्रथा होती. या सरकारला काय हवंय, यासाठी म्हणून निवडणूक आयोग काम करतोय. काल नवीन नोटिफिकेशन काढलं, मतदानाच्या दिवशी ५ वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता. ही नवीन पद्धत कुठून आली? आजच कशी आली? विधानसभा आणि लोकसभेला का नव्हती? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.
सरकारसाठी निवडणूक आयोग काम करतंय का?
मतदारांना भेटू शकता, पत्रक वाटू शकत नाही, कदाचित पैसे वाटू शकता असं त्यांना म्हणायचं आहे. ही मुभा दिली का? कायदा बदलला का? पाडू (PAU – Printing Auxiliary Unit) नावाची मशीन आणली आहे. प्रिटिंग ऑक्झिलरी युनिट कोणत्याही पक्षाला दाखवलं नाही. लोकांना माहीत नाही. उद्धव ठाकरे यांचं पत्र निवडणूक आयोगाला गेलं, हे मशीन दाखवावं सांगावं इथपर्यंत सौजन्य नाही. हे वाघमारे सांगत नाही, आताच्या सरकारने वाघ कधीच मारला. ही कोणती प्रथा आहे? कोणती गोष्ट चालू आहे? कायदा बदलत आहेत. सर्वांनी हे प्रश्न विचारले पाहिजे. सरकारला जी गोष्ट हवी आहे, त्यासाठी निवडणूक आयोग आहे का? सरकारसाठी निवडणूक आयोग काम करतंय का? अशा शब्दात राज ठाकरेंनी घणाघात केला.
काय प्रकारचं राजकारण सुरू आहे याकडे लोकांनी पाहावं
शिवसैनिक आणि मनसेसैनिकांना सांगतो सतर्क राहा. उमेदवार लोकांकडे जात आहेत, त्याकडे लक्ष ठेवा. पैसे कसे वाटले जात आहेत हे दिसत आहे. भाजप आणि शिंदेंच्या पॅम्प्लेटच्या आत पैसे टाकून दिले जात आहेत. लोक नाकारत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. निवडणूक आयोग सरकारला मदत करत आहे, हा आमचा आरोप आहे. या निवडणुकीलाच तो नियम का? विधानसभा किंवा लोकसभेला ही गोष्ट का नाही आली? जुना नियम परत बाहेर काढावा असं का वाटलं? ईव्हीएमही जुनी आहे. ईव्हीएम जुनी झाली म्हणून युनिट लावतो, या नव्या मशीन कोणत्या आहेत? लोकांना माहीत नाही, आम्हाला माहीत नाही. काय प्रकारचं राजकारण सुरू आहे याकडे लोकांनी पाहावं, असे राज ठाकरे म्हणाले.
नवीन मशीन राजकीय पक्षांना दाखवावी वाटली नाही
ही कोणती मशीन आहे? ती दिसते कशी? यातून काय होतं? ईव्हीएमची मशीन असते बुथवर, राजकीय लोकांना बोलावून बटन दाबायला सांगता, बरोबर आहे की नाही हे दाखवता. आता नवीन मशीन आली, ती राजकीय पक्षांना दाखवावी वाटली नाही. इतकी बेबंदशाही सुरू आहे. ही कोणती निवडणूक आहे? काय चालू आहे? अशा शब्दात राज ठाकरेंनी जाब विचारला.
