महापालिका निवडणुकांपूर्वीच महायुतीत फूट? शिवसेना शिंदे गटाने दंड थोपटले, भाजपला थेट टक्कर देणार
महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना, महायुतीत (भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार) तीव्र मतभेद समोर आले आहेत. विशेषतः शिवसेना शिंदे गटाला मित्रपक्षांकडून मिळत असलेल्या वागणुकीबद्दल आणि जागावाटपाबद्दल तीव्र नाराजी आहे.

सध्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तीव्र मतभेद समोर आले आहेत. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मित्रपक्षांकडून मिळत असलेल्या वागणुकीबद्दल टोकाची नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे अनेक भागांतील पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे मुंबई वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यांत महायुती धोक्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना शिंदे गटाने उघडपणे नाराजी व्यक्त केली. नाशिक, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद यांसारख्या महत्त्वाच्या विभागांतील आमदार आणि जिल्हाप्रमुखांनी महायुतीतील जागावाटप आणि मित्रपक्षांचे धोरण यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली.
शिवसेनेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न
भाजपसह मित्रपक्षांकडून युती धर्म पाळला जात नाहीये. शिवसेना जिथे प्रबळ आहे, तिथे मुद्दामहून अडथळे निर्माण केले जात आहेत, अशी तक्रार या बैठकीत करण्यात आली. काही ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांना भाजप पक्षात प्रवेश देऊन शिवसेनेची ताकद कमी करण्याचा आणि पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा थेट आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. नंदुरबारमधील एका आमदाराने तर पक्षातीलच काही माजी पदाधिकारी उघडपणे भाजपसाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
स्वबळावर लढण्याची तयारी सुरू
तर दुसरीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे आणि इतर शहरात हा वाद अधिक तीव्र झाला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, वसई-विरार आणि भिवंडी या महानगरपालिकांमध्ये युतीबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. भाजपचे नेते संजय केळकर आणि गणेश नाईक यांच्यासारख्या नेत्यांनी वेळोवेळी स्वतंत्र लढण्याची वक्तव्ये केली आहेत. ठाण्याचा महापौर भाजपचाच व्हावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे संजय केळकर यांनी जाहीरपणे बोलून दाखवले आहे. भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे शिवसेनेनेही खबरदारी म्हणून स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे.
सध्या ठाण्यापासून वसईपर्यंत शिवसेनेकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन विभागांच्या बैठका लवकरच होणार असल्या तरी तिथेही परिस्थिती फारशी वेगळी नाही. अनेक जिल्ह्यांत जागावाटपाचे गणित जुळणे कठीण असल्याचे संकेत आहेत. या तीव्र नाराजीमुळे शिवसेनेने आता युती झाली तर ठीक, नाहीतर स्वबळावर लढण्यास सज्ज राहा असा संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार, मंत्री आणि जिल्हाप्रमुखांना कोणत्याही परिस्थितीत स्वतंत्र लढण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरुवात करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. सध्या मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये मतभेद कायम आहेत. त्यामुळे स्वबळाची तयारी सुरू केली जात आहे.
