Maharashtra News LIVE :संगमनेरच्या भोंदू राजेंद्र गडगे प्रकरणातील दोन आरोपींचे अटकपूर्व जामिन फेटाळले
Maharashtra News LIVE : पुण्यात महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजासाठी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी प्रशासनाला वाहनांच्या वापराबाबतचे निर्देश दिले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील किमान एक दिवस मेट्रो, लोकल, रेल्वे, पीएमपीएमएल बस वापर करावा.

नागपूर शहरात काल तापमान 46.6 अंशावर गेलं होतं. दशकातील सर्वाधिक उष्ण दिवस कालचा ठरला. दुपारनंतर रस्ते ओस पडले होते.यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले. आजही तापमान वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने अलर्ट जाहीर केला आहे. यापूर्वी 27 मे 2024 रोजी नागपुरात 45.6 °c तापमानाची नोंद झाली होती. मात्र यंदाच्या मे महिन्यात उष्णतेने अधिकच भीषण रूप धारण केले आहे. गोंदिया जिल्ह्यात 44.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 44.9 अंश सेल्सिअस यावर्षीचं सर्वाधिक तापमान आहे. तापमान वाढल्यामुळे गोंदियाकरांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. विधान परिषद निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत तुळजाभवानी मंदिरातील रेफरल दर्शन पास सेवा बंद राहणार. निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा निर्णय. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत नियम राहणार लागू .
LIVE NEWS & UPDATES
-
नाशिकमध्ये चोरट्याने घरफोडून २५ लाखांची रोकड आणि १५ तोळे सोनं लंपास केले
नाशिकच्या सुचितानगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी मोठी घरफोडी करत २५ लाखांची रोकड आणि १५ तोळे सोनं लंपास केल्याचे उघड झाले आहे. दीपांश अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये पहाटे ५.३० वाजता तीन अज्ञात चोरट्यांचा प्रवेश करीत चोरी केली. घरातील सदस्य हॉटेलमध्ये गेल्याची संधी साधून चोरट्यांनी हा डल्ला मारला. सकाळी CCTV तपासताना इमारतीचा गेट उघडा असल्याचे घरमालकांच्या लक्षात आले. या प्रकरणात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-
पिंपरी- चिंचवड शहरात शाळेला आग
पिंपरी- चिंचवड शहरातील ASM एम्प्रेस इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज दुपारी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.चिंचवड एमआयडीसी परिसरातील बी ब्लॉक या ठिकाणी ASM एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल आहे. चार मजल्याच्या एम्प्रोस स्कूलमधील पहिल्या मंजल्यावर दुपारी तीन – साडेतीन वाजता दरम्यान अचानक भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणली. एम्प्रोस स्कूलच्या एसी मधील शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी स्कूल मधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
-
-
संगमनेरच्या भोंदू राजेंद्र गडगे प्रकरणातील दोन आरोपींचे अटकपूर्व जामिन फेटाळले
भोंदू राजेंद्र गडगे प्रकरणातील गडगे यांची मुलगी आणि इतर दोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेर न्यायालयाने फेटाळले आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून गडगे याची मुलगी ज्ञानेश्वरी, सहकारी मोहन पुरी आणि सुरज शिंदे फरार आहेत. संगमनेर तालुक्यातील वडगावपान गडगे दरबार चालवत होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गुन्हा दाखल केल्यानंतर भोंदू गडगे याला अटक झाली आहे. तर इतर आरोपी मात्र फरार आहेत.
-
धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस
धाराशिवमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने उकाड्याने त्रस्त असलेल्या धाराशिवकरांना दिलासा मिळाला आहे. गेल्या अर्ध्या तासापासून वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
-
धाराशिवच्या ग्रामीण भागामध्ये डिझेल, पेट्रोलचा तुटवडा
धाराशिवच्या ग्रामीण भागामध्ये डिझेल, पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे. डिझेल संपल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य हतबल झाले आहेत. भूम तालुक्यातील पेट्रोल पंपामध्ये डिझेल नसल्याने शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतात ट्रॅक्टर उभे करून शेतकरी कॅन घेऊन डिझेल पंपावरती दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतातील मशागतीची कामे थांबली आहेत. -
9 वर्षे चप्पल न घालणाऱ्या कार्यकर्त्याचा आमदार विवेक कोल्हे यांच्याकडून सन्मान
अहिल्यानगर : आपला नेता आमदार व्हावा यासाठी गेल्या सात वर्षांपासून चप्पल न घालणाऱ्या कार्यकर्त्याची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे.. विवेक कोल्हे यांना भाजपने विधानपरिषदेच्या माध्यमातून आमदारकी दिल्याने कोपरगाव येथील वासुदेव शिंदे यांनी आज अखेर पायात चप्पल घातली आहे. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर कोल्हे यांनी नवीन कोल्हापुरी चप्पल देऊन आपल्या कार्यकर्त्याचा सन्मान केला आहे. -
लासलगाव परिसरात डिझेल तुटवड्याची स्थिती
केंद्र आणि राज्य सरकारकडून पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला जात असतानाच लासलगाव परिसरात डिझेल तुटवड्याची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतीच्या मशागतीची कामे सुरू असल्याने ट्रॅक्टर, शेती अवजारे तसेच इतर वाहनांसाठी डिझेलची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. यामुळे लासलगाव येथील विविध पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टर,चारचाकी वाहने आणि दुचाकींच्या लांबच लांब रांगा लागल्या असून शेतकरी आणि वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे. -
पुण्यातील भोर शहराला आजपासून दिवसाआड पाणी पुरवठा
पुण्यातील भोर शहराला आजपासून दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भाटघर धरणामध्ये केवळ १०% इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्यानं भोर नगरपालिकेकडून हा निर्णय घेण्यातं आलाय -
पिंपरी- चिंचवडमध्ये पाणी कपातीचे संकट?
पिंपरी- चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने आता पाणी कपातीची शक्यता निर्माण झाली आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार दररोज साडेसातशे एमएलडी पाण्याची गरज असताना सध्या केवळ साडेसहाशे एमएलडी पाणीपुरवठा केला जातोय. त्यामुळे आधीपासूनच कमी दाबाने आणि अपुऱ्या प्रमाणात पाणी मिळणाऱ्या नागरिकांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आगामी काळात पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागू शकतो, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रमोद ओंबासे यांनी दिली.
-
बीडमध्ये नोटा उधळत मोटेगावकर आणि कुलकर्णीच्या प्रतिमेचे केले दहन
नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी मोटेगावकर व कुलकर्णी यांच्या फोटो समोर नोटा उधळत त्याचे दहन करण्यात आले. बीड मधील विद्यार्थ्यांनी हे लक्षवेधी आंदोलन केले. मोटेगावकर आणि कुलकर्णी सारख्या आरोपींनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत कोट्यावधी रुपयांची माया जमवली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
-
नागपूरमध्ये सिग्नलवर ग्रीन नेट आणि पाण्याचा फवारा
नागपूर 46 पार झालेल्या तापमानात सिग्नलवर थांबणाऱ्या नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा देत आहे सिग्नल वर लावलेल्या ग्रीन नेट आणि त्यात हलक्या पाण्याचा फवारा असणारे फॉगर लावण्यात आले आहेत. नागपुरात तापमानाचा पारा 46 पार झाल्याने रस्त्यावर जाताना जीव लाहीलाही होते मात्र या फॉगर खाली येताच सिग्नल सुरू होत पर्यंत दिलासा मिळाल्या सारखं वाटत आहे. महापालिकेने शहरातील अनेक सिग्नल वर ग्रीन नेट लावल्या तर महत्वाच्या वर्दळीच्या सिग्नल वर ग्रीन नेट सोबत फॉगर लावले आहेत.या फॉगर मुळे सिग्नलवर थांबणाऱ्या दिलासा मिळत असून तापमान 1 ते 2 अंश कमी होते.या उपक्रमाचे नागरिक कौतुक करत आहे मात्र दुसरी कडे काही ठिकाणचे फॉगर बंद झाले त्यामुळे नाराजी सुद्धा आहे
-
नीट पेपरफुटी प्रकरणात अंबाजोगाईतील विद्यार्थ्यांची दोन तास कसून चौकशी
नीट पेपरफुटी प्रकरणात अंबाजोगाईतील विद्यार्थ्यांची दोन तास कसून चौकशी करुन सीबीआयचे पथक लातूरकडे रवाना झाले आहे. हे दोन्ही विद्यार्थी लातूर येथे क्लासेसला असल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांनी नीटचा या पेपर खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
बंद खोलीतील चर्चा आता आपण बंद करू- मंत्री उदय सामंत
राजेंद्र जंजाळ म्हणाले बंद खोलीत चर्चा करू, संभाजीनगर मध्ये जोपर्यंत बंद खोलीतील चर्चा थांबत नाहीत तोपर्यंत छत्रपती संभाजीनगर मधील संघटना वाढत नाही. बंद खोलीतील चर्चा आता आपण बंद करू जे काही बोलत जाते जाहीर बोलू. छत्रपती संभाजीनगर मधील शिवसेनेतील अंतर्गत वादावर उदय सामंत यांच दुसर्यांदा मोठं वक्तव्य आलं आहे.
-
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे निफाड आणि चांदवड या दोन विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. शिवसैनिकांना योग्य त्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. तर नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी CBI कडून चौकशी सुरू आहे. सरकार गंभीर आहे पुढील काळात अशा काही गोष्टी होणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
-
मंत्री उदय सामंत यांनी नेत्यांचे कान टोचले
शिवसेना हा एक संपूर्ण गट आहे. स्वत:चा गट आहे असं कोणी समजून नये. महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये काय काय झालं ते आमच्या कानावर आलं आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शिवसेना गटबाजीवर उदय सामंत यांनी नेत्यांचे असे कान टोचले आहे.
-
नाशिकच्या चांदवड, निफाड विधानसभा मतदारसंघाचा श्रीकांत शिंदे यांनी घेतला पक्ष संघटनेचा आढावा
नाशिकच्या चांदवड, निफाड विधानसभा मतदारसंघाचा श्रीकांत शिंदे यांनी पक्ष संघटनेचा आढावा घेतला. सेना नेते श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे,आनंद परांजपे यांचा आज नाशिक ग्रामीण भागात शिवसंवाद दौरा आहे. आगामी काळातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. शिवसंवाद दौऱ्यात बंद दाराआड चर्चेत स्थानिक नेत्यांना श्रीकांत शिंदे यांनी इशारा दिला. पक्ष संघटना मजबूत करत संघटना वाढवावी लागेल तरच आगामी काळात निवडणुकीत उमेदवारी संदर्भात विचार केला जाईल अशाही सक्तीच्या सूचना केल्याची माहिती आहे.
-
विधान परिषद निवडणुकीत भाजप ठाणे आणि पुणे सोडणार का?
विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेनं भाजपकडे सात जागांची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. तर राष्ट्रवादीने तीन जागांची मागणी केली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. तर काल सुनेत्रा पवार, सुनिल तटकरे आणि रविंद्र चव्हाण यांचीही बैठक झाली. ठाणे आणि पुणे या जागा कळीचा मुद्दा ठरू शकतात. ठाण्याची जागा एकनाथ शिंदे यांना पाहिजे आहे पण तिथे भाजपचं संख्याबळ जास्त आहे. पुण्याची जागा सुनेत्रा पवार यांना पाहिजे पण तिथेही भाजपचं संख्याबळ जास्त आहे.
ठाणे आणि पुणे भाजप सोडणार का, हा मोठा प्रश्न आहे. ठाणे आणि पुणे सोडली तर बदल्यात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जास्तीच्या जागा पदरात पाडून घेण्याची शक्यता आहे. जर तडजोड झाली नाही तर महायुतीत अंतर्गत वाद होण्याचीही दाट शक्यता आहे. महायुतीत दिलजमाई झाली नाही तर विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार अटळ आहे.
-
गडचिरोलीतील एसटी महामंडळाच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू
गडचिरोली जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या अपघातात जखमी झालेल्या सात जणांवर उपचार सुरू होते. त्यापैकी उपचारादरम्यान तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोलीतील सामान्य रुग्णालयात प्रवाशांवर उपचार सुरू होते. बसमध्ये प्रवास करत असलेल्या 51 प्रवाशांयांपैकी 10 जणांना गंभीर दुखापत झाली होती. तर किरकोळ जखमी झालेल्या 21 प्रवाशांना प्रथमोपचार करून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
-
वांद्रे इथल्या गरीबनगरमध्ये भाजप नेत्या रिदा रशीद यांनी रेल्वे आणि पोलीस अधिकाऱ्यांची घेतली भेट
भाजपच्या महिला नेत्या रिदा रशीद यांनी वांद्रे इथल्या गरीब नगरमध्ये पोहोचून रेल्वे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. रिदा रशीद म्हणाल्या की, “आम्ही विकासाच्या विरोधात नाही आणि जे विकासाला विरोध करतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. काल जे घडलं ते चुकीचं होतं, पण ते मशिदीच्या पाडकामाच्या निषेधार्थ घडलं होतं. मशिदीच्या जागेची मागणी केली. जेव्हा इथं अतिक्रमण झालं, तेव्हा त्यासाठी लोकांसोबतच अधिकारीही जबाबदार आहेत आणि त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे.”
-
बीड – नीट घोटाळ्यातील आरोपी पी. व्ही. कुलकर्णीच्या बांधकामावर नगरपालिकेने लावली नोटीस
नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याचं बीडमध्ये वडिलोपार्जित घर असून या ठिकाणी तो आता टोलेजंग इमारत उभारत आहे. या इमारत बांधकामाच्या संदर्भात कोणतेही निकष पाळले गेले नसल्याचं आता समोर आलं आहे. नगरपालिकेने या इमारतीची मोजणी करत नोटीस देखील बजावली आहे.
-
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय उष्मघाताचे 17 रुग्ण..
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय उष्मघाताचे 17 रुग्ण आहेत. अनेक वॉर्ड मध्ये असलेल्या कुलर मध्ये पाणीच नाही तर एसीही बंद, वॉर्ड मधील कुलर मध्ये पाणी नसल्याने रुग्ण घामाघूम झालेत.
अमरावती जिल्ह्यातील तापमानाचा पारा हा 46 अंश डिग्री सेल्स वर गेल्या असल्याने उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाने लाखो रुपये खर्च करून नवीन एसी, कुलर खरेदी केले, मात्र त्यामध्ये पाणी नसल्याने त्याचा रुग्णांना फायदा काय? असा संतप्त सवाल विचारण्यात येत आहे. अनेक वॉर्ड मध्ये एसी आहे मात्र तेही बंद अवस्थेत अल्याने संताप व्यक्त होतोय.
-
संतोष देशमुख खून प्रकरणाची पुढील सुनावणी 4 जून रोजी
बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाची पुढील सुनावणी 4 जून रोजी होणार आहे.
आरोपींनी कोर्टासमोर कॉलर उडवली, सर्व आरोपी व्हिसीद्वारे उपस्थित होते. – आरोपींना कसलाही पश्चाताप नाही त्यांची आजची वागणूक न्यायाधीशांनी आणि आम्ही सर्वांनी पाहिली , असं धनंजय देशमुख म्हणाले.
-
NEET प्रकरणाचे धागे दोरे बीड नंतर अंबाजोगाईपर्यंत
NEET प्रकरणाचे धागे दोरे बीड नंतर अंबाजोगाईपर्यंत . सीबीआयकडून अंबाजोगाईत दोन विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे मोबाईल आणि मेमरी कार्ड हे देखील ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे विद्यार्थी लातूर येथे शिक्षण घेत होते. या विद्यार्थ्यांनी पेपर घेतल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे असून त्याचसंदर्भात चौकशी केली जात आहे. या चौकशीतून आता नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
नागपूर – तीव्र उष्णतेमुळे होरपळणाऱ्या विदर्भाला तूर्तास दिलासा नाही – हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी काय सांगितलं ?
तीव्र उष्णतेमुळे होरपळणाऱ्या विदर्भाला तूर्तास दिलासा मिळण्याची शक्यता नाही. पुढील तीन दिवस विदर्भातील तीन जिल्ह्यत रेड अलर्ट तर तीन जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, असं नागपूरमधील हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी सांगितलं.
अमरावती , अकोला वर्धा रेड अलर्ट तर नागपूर चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला. पुढील पाच ते सात दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेच्या जुन्या रेकॉड पर्यंत तापमान पोहोचू शकते असा इशाराही त्यांनी दिला.
-
विधानपरिषद निवडणुकीवरून नाशिकमध्ये पुन्हा भाजप-शिवसेना संघर्षाची चिन्हे
विधानपरिषद निवडणुकीवरून नाशिकमध्ये पुन्हा भाजप-शिवसेना संघर्षाची चिन्हं दिसत आहेत. नाशिकमध्ये सर्वाधिक मतदार भाजपकडे असल्याने ही जागा भाजपला मिळावी अशी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार याची मागणी आहे.
नाशिक विधानपरिषद जागा सध्या शिवसेनेकडे आहे. मात्र जागा शिवसेनेकडे असली तरी नाशिकमध्ये भाजपची ताकद अधिक असल्याचा भाजपचा दावा आहे. नाशिकची जागा भाजपलाच द्यावी, अशी मागणी प्रदेश नेतृत्वाकडे केल्याची माहिती सुनील केदार यांनी दिली.
-
रेल्वे भरती आंदोलन प्रकरण, राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता
2008 रेल्वे भरतीदरम्यान झालेल्या आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यातून राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. सरकारी पक्षाने गुन्हा सिध्द होईल आणि आरोपींचा सहभाग स्पष्ट होईल असे ठोस पुरावे मांडले नसल्याचा निर्वाळा देण्यात आला. पुराव्यांअभावी ठाणे सत्र न्यायालयाने राज ठाकरे यांना निर्दोष मुक्त केलं. राज ठाकरे यांची कथित चिथावणी दिल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली आहे.
-
बुधवारी बांद्रा स्थानकच्या बाहेर झालेल्या दगड फेकी प्रकरणी महत्वाची अपडेट
पोलिसांनी कलम 109 नुसार अटेम्प तू मर्डरचा गुन्हा दाखल केला आहे. एकूण 100-150 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापेकी 16 लोकांना अटक करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये १० जणांची नावे आहेत. काल झालेल्या दगडफेकीत पाच पोलीस जखमी झाले होते.
-
बीड शहरातील भाजी मंडई परिसरात बसलेल्या भाजीपाला विक्रेत्यांना उठवले
वृद्ध महिला आणि नगरपालिकेच्या लोकांमध्ये झटापट झाली. भाज्या आणि संपुर्ण साहित्य कचरा वाहणाऱ्या गाडीत टाकले. यावेळी वृद्ध महिलेने भाजीपाला घेऊन जाण्यास नकार देत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र नगरपालिकेच्या लोकांनी महिलेशी झटापट करत संपूर्ण भाजीपाला उचलून कचरा डेपोच्या गाडीत फेकून दिला. याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. यावर स्पष्टीकरण देताना फोनवरून नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की.. भाजीपाला विक्रेते काही वृद्ध आणि महिला आहेत. यामुळे त्यांना आम्ही वेळोवेळी पूर्व सूचना दिली होती. ते मध्य रस्त्यावरती बसतात यामुळे वाहतुकीला अडथळा होतो मात्र काल त्यांना हटवण्याचा आमच्या लोकांनी प्रयत्न केला. त्यावेळी असा काही प्रकार झाला असेल मात्र आमचा उद्देश तसा नाही.. रस्त्यावर बसत असल्याने शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होत आहे.
-
वांद्रे पूर्व गरीब नगर रेल्वे कारवाई – दिवस तिसरा
वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमध्ये रेल्वेच्या कारवाईचा आज सलग तिसरा दिवस आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू झालेली ही मोहीम निर्णायक टप्प्यात पोहोचलीय. काल 60 टक्के पाडकाम पूर्ण झालं, पण संध्याकाळी अतिक्रमण हटवण्याच्या निषेधार्थ संतप्त स्थानिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. बुलडोझर पुन्हा एकदा उरलेल्या झोपड्यांवर चालवले जात आहेत. रेल्वेने आज सलग तिसऱ्या दिवशी येथील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केलीय. कालच्या दगडफेकीच्या घटनेनंतर आजही कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे. ज्यामध्ये मुंबई पोलीस, RPF, GRP सह रॅपिड ऍक्शन फोर्सच्या तुकड्या तैनात आहेत.
-
NEET पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख आरोपी मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे यांना चौकशीसाठी दिल्लीहून पुण्यात
NEET पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख आरोपी मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे यांना चौकशीसाठी दिल्लीहून पुण्यात आणण्यात आलं आहे. दोघींना समोरासमोर बसवून सीबीआयकडून कसून चौकशी सुरू आहे. मांढरे आणि वाघमारे या पुण्यातील सुखसागर परिसरातील एकाच इमारतीत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. मनीषा वाघमारेच्या ब्युटी पार्लरमधूनच NEET पेपरफुटीचा कट रचल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या दोघीही सीबीआयच्या ताब्यात असून, प्रकरणातील इतर धागेदोरे शोधण्यासाठी चौकशी वेगाने सुरू आहे.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा ठाणे न्यायालयात सुनावणी साठी हजर राहणार..
2008 साली कल्याण रेल्वे स्थानक परप्रांतीय रेल्वे भरती मारहाण प्रकरणी राज ठाकरे सह इतर सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता… आज ठाणे न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे… आतापर्यंत राज ठाकरे दोनदा ठाणे न्यायालयात हजर राहिले होते….
-
जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ
सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 62 हजार 225 रुपये झाले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह सह 2 लाख 78 हजार 100 रुपयांवर पोहोचले आहेत. अमेरिकेने इराणला युद्ध संदर्भात तडजोड करण्यासाठी आणखी एक संधी दिल्याने त्याचा सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम झाल्याची सुवर्ण व्यवसायिकांचं म्हणणं आहे.
-
वांद्रे गरीब नगर पाडकाम मोहीम, तिसऱ्या दिवशीही कारवाई सुरू, प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात
वांद्रे पूर्व येथील गरीब नगर परिसरात रेल्वेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेचा आज सलग तिसरा दिवस आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू झालेल्या या कारवाईत कालपर्यंत ६० टक्के पाडकाम पूर्ण झाले आहे. मात्र, काल संध्याकाळी संतप्त स्थानिकांनी केलेल्या दगडफेकीमुळे आज परिसरात तणावपूर्ण शांतता असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई पोलीस, RPF, GRP आणि रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) च्या तुकड्यांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या कडाक्याच्या बंदोबस्तात आज सकाळी पुन्हा एकदा उरलेल्या बेकायदेशीर झोपड्यांवर बुलडोझर चालवला जात आहे.
-
पालीत नळांना काळे जंतुयुक्त पाणी; अष्टविनायक तीर्थक्षेत्रात नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अष्टविनायक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील पाली शहरातील धुंडीविनायक नगर भागात गेल्या काही दिवसांपासून नळांना अत्यंत दुर्गंधीयुक्त आणि काळे जंतुयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अंबा नदीच्या वाढत्या प्रदूषणामुळे शहराचा पाणीपुरवठा आधीच धोक्यात आला असताना, नागरिकांना असे दूषित पाणी प्यावे लागत असल्याने नगरपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मंजूर झालेली २७ कोटी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना अद्यापही रखडलेलीच असल्याने, या समस्येवरून स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
-
नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमध्ये सीबीआयची मोठी कारवाई, बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरूरे ताब्यात
नीट (NEET) पेपर फुटी प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने लातूरमधून बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरूरे यांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणात लातूरमधून झालेली ही तिसरी अटक आहे. डॉ. शिरूरे हे यापूर्वी नीट घोटाळ्यात अटक करण्यात आलेले जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पी. व्ही. कुलकर्णी आणि मुख्य आरोपी संजय मोटेगावकर यांच्या थेट संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण पेपर फुटी प्रकरणामध्ये एका विद्यार्थ्याचा पालक म्हणून अटक होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या कारवाईमुळे शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
-
परभणीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतीकामासाठी दररोज 100 लिटरपर्यंत पेट्रोल-डिझेल मिळणार, पुरवठा विभागाचे आदेश
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्व मशागत आणि शेतीची कामे वेळेवर करता यावीत म्हणून जिल्हा पुरवठा विभागाने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक आदेश जारी केला आहे. या नव्या आदेशानुसार, शेतकऱ्यांना आता दररोज १०० लिटरपर्यंत पेट्रोल किंवा डिझेल उपलब्ध करून दिले जाणार असून, यासाठी त्यांना पेट्रोल पंपावर आपले आधार कार्ड आणि ७/१२ उतारा दाखवणे बंधनकारक असेल. पेट्रोलियम नियमांच्या मानकांचे पालन करत हे इंधन केवळ जाड प्लास्टिक किंवा धातूच्या कॅनमध्येच दिले जाईल; जर कोणत्याही पेट्रोल पंपाने प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल
-
नालासोपाऱ्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; भररस्त्यात महिलेला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल
नालासोपारा पूर्व येथील तुळींज पोलीस ठाण्याजवळ असलेल्या सेंट्रल पार्क परिसरात बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास एका महिलेला पुरुषाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका जागरूक नागरिकाने या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मारहाण करणारा पुरुष हा गुटखा विक्रेता असल्याची प्राथमिक माहिती असून, व्हिडिओमध्ये दुकानाच्या शटरमधून बाहेर काढल्या जाणाऱ्या गोण्यांमध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. पोलीस ठाण्याजवळच घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची आणि रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
-
ग्रामपंचायत प्रशासक सरपंच नियुक्तीचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६०५ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक सरपंच नियुक्ती प्रकरणाला अखेर गती मिळाली आहे. प्रशासक सरपंच नियुक्तीविरोधातील जुन्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली असून, हा निर्णय जिल्हा ग्रामपंचायत प्रशासनासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे. या नव्या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रखडलेल्या ६०५ ग्रामपंचायतींमध्ये अधिकृतपणे प्रशासक सरपंच नियुक्त करण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.
-
कांद्याचे दर घसरल्याने केंद्राचे पथक कालपासून नाशिक दौऱ्यावर
विविध बाजार समित्या आणि नाफेड खरेदी केंद्रांना भेट देत परिस्थितीचा आढावा. आज जिल्हाधिकारी कार्यलयात केंद्रीय पथक आणि जिल्हाधिकारी यांच्यात बैठक. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. अवघ्या ३०० ते ४०० रुपये क्विंटल दर मिळत असल्याने शेतकरी अडचणीत. नाफेडकडून १२३५ रुपये क्विंटलने खरेदी सुरू. मात्र ग्रेडिंगमुळे अनेक कांदा उत्पादकांना फटका
-
बदल्यांच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात राज्यातील परिचारिका आक्रमक
आज राज्यभर ‘तीव्र निदर्शने’ पुण्यातील ससून रुग्णालयातही परिचारिकांनी केली निदर्शने. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या परिचारिका संवर्गाच्या प्रशासकीय बदली प्रक्रियेला महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन ने तीव्र विरोध दर्शवला आहे.
-
पंढरपुरात पाद्य आणि तुळशी पूजा तसेच व्हीआयपी दर्शन बंद
अधिक मासानिमित्त पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. दररोज एक लाखांहून अधिक भाविक विठ्ठल दर्शनासाठी येत आहेत. भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जूनपर्यंत पाद्य आणि तुळशी पूजा तसेच व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी ही माहिती दिली……
-
गारपिटीच्या नुकसानीपोटी 6 तालुक्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर
:जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतकऱ्यांना प्रचंड तडाखा बसला होता यामध्ये 6 तालुक्यातील जवळपास दीड हजार हेक्टर वरील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं असून 2857 शेतकरी बाधित झाले होते, या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली असून जालना जिल्ह्यासाठी 2 कोटी 52 लाख 90 हजार रुपयांची मदत जाहीर झालीय.
-
पंतप्रधानांच्या आवाहनाला श्रीकांत शिंदे यांचा प्रतिसाद वंदे भारत ट्रेनने प्रवास
पंतप्रधानांच्या आवाहनाला श्रीकांत शिंदे यांचा प्रतिसाद. खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिक दौऱ्यावर. खासदार श्रीकांत शिंदे यांनी वंदे भारत ट्रेनने केला ठाणे ते नाशिक प्रवास. श्रीकांत शिंदे आज चांदवड,मनमाड,येवला, नांदगाव आणि मालेगाव मतदार संघांची आढावा बैठक घेणार. बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी राहणार उपस्थित. आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे घेणार आढावा ..
-
संतोष देशमुख खून प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज सुनावणी
दरवेळी सुनावणी घेणारे न्यायाधीश पाटोदकर यांची सात दिवसांपूर्वीच बदली झालेली आहे. यामुळे आजची सुनावणी पाटोदकर यांच्याकडे होते की नवीन न्यायाधीशांसमोर सुनावणीला सुरुवात होते हे पाहणं महत्त्वाचं. आरोपी जयराम चाटे याने न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केलेला आहे त्यावर युक्तिवाद होण्याची शक्यता. घटनास्थळ पंचनाम्याचे व्हिडिओ चित्रीकरण दाखवण्याची आरोपीच्या वकीलांनी मागील सुनावणीत केली होती मागणी. यावर देखील कोर्ट काय निर्णय घेणार ? हे पाहणं महत्त्वाचं.
-
पंढरपुरात पाद्य आणि तुळशी पूजा तसेच व्हीआयपी दर्शन बंद
अधिक मासानिमित्त पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. दररोज एक लाखांहून अधिक भाविक विठ्ठल दर्शनासाठी येत आहेत. भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 15 जूनपर्यंत पाद्य आणि तुळशी पूजा तसेच व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
नाशिकमध्ये विवाहाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
लग्नासाठी वधू मिळत नसल्याच्या समस्येचा गैरफायदा घेतला. नाशिकमध्ये विवाहाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. मुंबई नाका पोलिसांनी मोठी कारवाई केली. विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली लाखोंची उकळपट्टी सुरु होती. लग्न लावून दिल्यानंतर काही दिवसांत नवरी फरार व्हायची. वरपक्षांची योजनाबद्ध फसवणूक सुरु होती.
-
ठाण्यात गावदेवी भाजी मार्केट परिसरात आग
ठाणे रेल्वे स्थानकाजवळील अत्यंत गजबजलेल्या गावदेवी भाजी मार्केट परिसराला आज पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत मार्केटमधील अनेक दुकानं आणि गोडाऊन जळून खाक झालं. ही आग विझवताना धुरामुळे गुदमरून आणि होरपळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
-
सोलापूर विधानपरिषदेच्या जागेवरून मविआमध्ये होऊ शकतो वाद
सोलापूर विधानपरिषदेच्या जागेवरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता. सोलापूर विधानपरिषदेची निवडणूक काँग्रेसने पक्षाने लढवावी अशी मागणी. काँग्रेस पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे मागणी. सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसची वाढलेली ताकद लक्षात घेता ही निवडणूक काँग्रेसने लढवावी अशी मागणी आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी या संदर्भात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली.
-
आजपासून 24 मे पर्यंत मुंबईत किती अंश सेल्सिअस तापमान असेल?
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उकाड्याने नागरिक हैराण आहेत. मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. पुढील काही दिवस पारा चाळीशीपार राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारपर्यंत मुंबईमध्ये कोरड्या वातावरणाचा अंदाज. 21 ते 24 मे या कालावधीत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल अशी शक्यता आहे. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उकाड्याचे प्रमाण मुंबईत वाढले आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणात सध्या कमाल तापमानाचा पारा नियंत्रणात आहे.