Maharashtra News LIVE : टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग
Maharashtra News LIVE : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबईत तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनेक पथकं तैनात केली आहेत.

LIVE NEWS & UPDATES
-
मुंबईतील हवा प्रदूषणाची समस्या कायम; सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 127 वर
मुंबईतील हवा प्रदूषणाची समस्या कायम असून, शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 127 वर नोंदवण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ होत असल्याचे चित्र आहे. शहरातील आणि उपनगरांतील विविध हवा गुणवत्ता मापन केंद्रांवर सातत्याने हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ श्रेणीत नोंदवली जात आहे. त्यामुळे मुंबईच्या सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांकातही वाढ झाली आहे. रविवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईचा सरासरी AQI 127 नोंदवण्यात आला असून, ही हवा ‘मध्यम’ श्रेणीत मोडते. विशेष म्हणजे, शहरातील एकूण 22 हवा गुणवत्ता मापन केंद्रांपैकी केवळ तीन केंद्रांवर हवेची गुणवत्ता ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदवण्यात आली. तर बहुतांश केंद्रांवरील हवा गुणवत्ता निर्देशांक 140 च्या आसपास नोंदवण्यात आला.
-
टायगर श्रॉफची एकनाथ शिंदेंनी भेट घेतल्यानंतर प्रदीप पुर्णेकर यांच्या मुलाची पोस्ट चर्चेत
अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची भेट घेत विचारपूस केली. मात्र, या भेटीनंतर प्रदीप पुर्णेकर यांच्या मुलाने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. ठाण्यात प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येला १९ दिवस उलटूनही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये, “ठाण्यातील हत्येला १९ दिवस उलटल्यानंतरही कुटुंबीयांची भेट न घेणारे उपमुख्यमंत्री टायगर श्रॉफची विचारपूस करायला घरी पोहोचले आणि कठोर कारवाईचे आश्वासन दिले. ठाण्यात घराजवळ असलेल्या प्रदीप पुर्णेकर यांच्या भेटीला मात्र वेळ नाही. याला म्हणतात शिवसेना मीनाक्षी राजा पर्व,” असा उल्लेख करण्यात आला आहे.
-
-
नाशिकमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात धडक कारवाई
नाशिक विभागात अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांत विभागातील तब्बल १ हजार ३५६ खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५६ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधील अस्वच्छता, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक तसेच कीटकांचा प्रादुर्भाव आढळल्यास प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
-
टायगर श्रॉफची कार पोलिसांनी घेतली ताब्यात
अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या BMW कारवर काल झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित कार ताब्यात घेतली असून, ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान काल फॉरेन्सिक टीमने कारची पाहणी करत गोळ्यांचे निशाण आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा केले. ही कार सध्या तपासाचा महत्त्वाचा भाग असल्याने पोलिसांकडून ती झाकून सुरक्षित ठेवण्यात आली आहे. तसेच कारच्या आजूबाजूला पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
तुळजापुरात 510 किलो खवा, पेढे, कलाकंद जप्त
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवत तब्बल ५१० किलो खवा, पेढे आणि कलाकंदाचा संशयास्पद साठा जप्त करून नष्ट केला आहे. दोन दिवसांत प्रशासनाकडून आठ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी खवा, कंदी पेढे, साधे पेढे आणि केशर पेढे असा ३०५ किलो साठा जप्त करण्यात आला, तर कलाकंद आणि पेढ्यांचा आणखी २१० किलो संशयास्पद साठा नष्ट करण्यात आला. काही पदार्थांमध्ये पाम तेल, वनस्पती तेलासह बिगर-दुग्धजन्य घटकांचा वापर केल्याचे आढळून आल्याची माहिती प्रशासनाने दिली. तसेच संबंधित पदार्थांवर उत्पादकाचे नाव, घटकांची माहिती आणि आवश्यक लेबल नसल्याचेही तपासणीत उघड झाले.
-
-
मातोश्री परिसरात दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी
मुंबईतील मातोश्री परिसरात दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बॅनरवर ‘भगवा घेऊन खांद्यावर, शिवसैनिक दिसेल बांधावर’ असा आशय पाहायला मिळत आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ‘संविधानाच्या रक्षणासाठी मशाल, महाराष्ट्रासाठी’ असा संदेश देण्यात आला आहे. मुंबईत विविध ठिकाणी दोन्ही शिवसेनेकडून बॅनर आणि पोस्टर्स लावण्यात आले असून, दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार तयारी सुरू आहे.
-
टायगर श्रॉफ याच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी पल्सर दुचाकीवरून पळ काढला
टायगर श्रॉफ याच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी पल्सर दुचाकीवरून घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांनी ही दुचाकी अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात पार्क केली आणि त्यानंतर तेथून पसार झाले. सध्या ही दुचाकी पोलिसांच्या ताब्यात असून, तिच्या नंबरच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही दुचाकी तिसऱ्या मालकाच्या नावावर असल्याचे समजते. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी दुचाकीच्या पहिल्या मालकाला चौकशीसाठी बोलावले आहे. दुचाकीच्या मालकीचा तपशील आणि हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस विविध बाजूंनी तपास करत आहेत.
-
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर रविवारी संध्याकाळी मुंबईतील जुहू परिसरातील पुष्पा पार्कजवळ गोळीबार झाला. फुटबॉल खेळून घरी परतत असताना टायगरच्या बीएमडब्ल्यू गाडीवर हल्लेखोरांनी तीन ते चार गोळ्या झाटल्या. या हल्ल्यात टायगर पूर्णत: सुरक्षित असून त्याला कोणतीही दुखापत झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र त्याचा ड्राइव्हर फिरदौस आण घटनास्थळी उपस्थित असलेला एक जण जखमी झाला. पोलीस उपायुक्त डॉ. मोहित गर्ग यांनी या हल्ल्याबाबत माहिती दिली. मुंबई पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, प्रत्यक्षदर्शींची चौकशी आणि फॉरेन्सिक विश्लेषण सुरू केलं आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी अनेक पथकं तैनात केली असून विविध शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत. यासह विविध क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Oct 19,2026 8:09 AM
