महाविकासआघाडीत मोठ्या घडामोडी, काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा, कोणाचे नाव आघाडीवर?
महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. अंबादास दानवे यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीनंतर हे पद रिक्त झाले आहे. काँग्रेसने या पदावर दावा केला असून, सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभेसोबतच आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ २९ ऑगस्ट रोजी संपला. त्यानतंर हे पद रिक्त झाले होते. आता या रिक्त झालेल्या पदावर काँग्रेसने दावा केला आहे. ज्येष्ठ नेते सतेज पाटील (बंटी पाटील) यांची या पदावर नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसचा दावा काय?
सध्या महाराष्ट्र विधान परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता काँग्रेसकडे सर्वाधिक ८ सदस्य आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडे ६ आमदार आहेत. विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसचे सदस्य जास्त असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर आपला हक्क आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी झालेल्या महाविकास आघाडीच्या एका बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे देण्यास आमची कोणतीही हरकत नाही. पण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसलाच मिळायला हवे, असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हटले होते.
सध्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाली आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने आधीच दावा सांगितला आहे. त्यानंतर आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सतेज पाटील यांचा अल्पपरिचय
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडून सतेज पाटील हे नाव आघाडीवर आहे. सतेज पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी महाविकासआघाडी सरकारच्या काळात 2019 ते 2022 या कालावधीत गृह (शहरी), गृहनिर्माण, वाहतूक, माहिती तंत्रज्ञान आणि संसदीय कामकाज या विभागांचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. तसेच कोल्हापूरचे पालकमंत्रिपदही भूषवले आहे. त्यापूर्वी 2010 ते 2014 या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये काम केले आहे. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे गृह (शहरी आणि ग्रामीण), ग्रामीण विकास, अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.
त्यांचा राजकीय अनुभव, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी असलेले जवळचे संबंध आणि स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती आखण्यात असलेली त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका पाहता, त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
