Ratnagiri Sindhudurg Local Body Election Results 2025 : आज तळ कोकणात काय घडणार? दोन भावांमध्ये टफ फाईट
Maharashtra Nagar Parishad and Nagar Panchayat Election Results 2025 Updates in Marathi : आज महाराष्ट्रात नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. सर्वांच लक्ष तळ कोकणातल्या निकालाकडे आहे. रत्नागिर-सिंधुदुर्गमध्ये मिळून किती नगरपरिषदा आणि नगरपंचायती आहेत जाणून घ्या.

रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींसाठी काल मतदान पार पडलं. आज निकाल आहे. उद्योग मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, शेखर निकम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन माजी आमदार नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहेत. राजापूरमधून हुस्नबानो खलिपे तर चिपळूण मधून रमेश कदम नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहेत. भाजप बंडखोर 13 अपक्ष लांजा कुवे संघटनेच्या माध्यमातून निवडणुक रिंगणात आहेत. लांजा नगरपंचायतीत मायलेक निवडणूक रिंगणात आहेत. प्रियांका यादव या नगराध्यक्ष पदासाठी तर त्यांची आई वंदना काटगाळकर नगरसेवक पदासाठी रिंगणात आहे.
भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मृणाल शेट्ये देवरूख मधून नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहेत. देवरूख नगरपंचायतीमधून त्या दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहेत. माजी आमदार बाळ माने यांची सून शिवानी सावंत माने रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुक रिंगणात आहेत.
सिंधुदुर्गात काय होणार?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नगरपंचायत तर तीन नगरपरिषदेसाठी आज मतमोजणी होणार आहे. मालवण, कणकवली नगरपंचायतीच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष आहे. कणकवलीमध्ये भाजप विरुद्ध सर्व राजकीय पक्ष एकत्र. दहा वाजल्यापासून होणार मतमोजणीला सुरुवात. एक ते दोन तासात चित्र स्पष्ट होईल.
सिंधुदुर्गात किती फेऱ्यांमध्ये मतमोजणी?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून मतं मोजणीचे सर्व निकाल दुपारी एक वाजण्यापूर्वी हाती येण्याची शक्यता आहे. मतमोजणीसाठी पाच टेबल्स लावण्यात आली आहेत.
शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर काय म्हणाले?
“कणकवली शहरवाशियांनी साथ दिलेली आहे. परिवर्तनासाठी कणकवली सज्ज झालीय. 80 टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. कणकवली शहर भयमुक्त व भ्रष्टाचार मुक्त करणार असा आम्ही नारा दिला होता. कणकवलीचं जे महत्त्व आहे, राजकीय, अध्यात्मिक ते राखलं जाईल. संपूर्ण महाराष्ट्राचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं. कणकवली शहर हे महत्त्वाचे शहर आहे. निलेश राणे यांनी कणकवली शहराचं पालकत्व घ्यावं अशी माझी भूमिका होती” असं संदेश पारकर म्हणाले.
‘माझी नगरपंचायत निवडणूक ही शेवटची’
“सर विकास आघाडीतील सर्व राजकीय नेत्यानी राजकीय पादत्राणे बाहेर ठेवली. भ्रष्ट टोळीच्या विरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र आले. निलेश राणे यांनी फार मोठी मेहनत घेतली. माझी नगरपंचायत निवडणूक ही शेवटची आहे, मला एक संधी द्या. असा आव्हान मी मतदारांना केल होत. जर तसा कौल मिळाला तर माझी जबाबदारी राहील. कणकवलीच्या शाश्वत विकासाचा शुभारंभ आहे जे श्रीफळ आहे मला जे चिन्ह मिळालं आहे. नारळ वाढूनच आम्ही करू” असं संदेश पारकर यांनी सांगितलं.
