
छत्रपती संभाजीनगर मध्ये महाविकास आघाडीचे मूक धरणे आंदोलन. अहिल्यादेवी होळकर निर्मित ऐतिहासिक मनकर्णिका घाटाची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ तोंडाला काळे मास्क लावून आंदोलन सुरू आहे. भाजप सरकारच्या विरोधात आंदोलनाच्या माध्यमातून महाविकास आघाडी एकत्र आली आहे. या आंदोलनाला ठाकरे शिवसेनेचे अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित आहेत.
जालन्यात खाजगी ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागली . आगीमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. पहाटे 3 च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जालना रोडवर शेलगाव गावाजवळ ही घटना घडली . टायरचे घर्षण झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती. अग्निशामक दलाने दीड तासाच्या अथक परिसरामानंतर आग आटोक्यात आणली . सुदैवाने सर्व प्रवासी वाचले, कोणतीही जीवितहानी झाली नाही.
केडीएमसीच्या गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होत असली, तरी सर्वांचे लक्ष महापौर पदाच्या खुर्चीकडे लागले आहे. याबाबत बोलताना गटनेते शशिकांत कांबळे आणि जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी स्पष्ट केले की, महापौर आणि इतर महत्त्वाच्या पदांबाबतचा अंतिम निर्णय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते यांच्यातील चर्चेनंतरच होईल. दोन्ही पक्षांचे नेते लवकरच एकत्र बसून सत्तेचा अंतिम फॉर्म्युला ठरवणार असून, त्यानंतरच महापालिकेतील नव्या कारभाऱ्याचे नाव स्पष्ट होणार आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींनी आता वेग आला आहे. भाजपचे ५० नवनिर्वाचित नगरसेवक आज अधिकृत गट नोंदणीसाठी कोकण भवनाकडे रवाना झाले आहेत. डोंबिवलीतील जिमखाना परिसरातून हे सर्व नगरसेवक एकत्रितपणे नवी मुंबईकडे निघाले. यावेळी भाजपच्या गटनेते पदी शशिकांत कांबळे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केली. महापालिकेत आपला स्वतंत्र गट नोंदवून सत्तेच्या वाटाघाटीत आपले पारडे जड ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सातपुड्याच्या डोंगराळ पट्ट्यात पावसाच्या सरी कोसळल्याने आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. काही दिवसांपूर्वीच आंब्याच्या झाडांना आलेला बहर या पावसामुळे जमिनीवर गळून पडला असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंब्यासोबतच रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेला गहू, पपई आणि इतर नगदी पिकांचेही या अवकाळीमुळे नुकसान झाले आहे. गेल्या महिनाभरापासून सातत्याने हवामानात बदल होत असल्याने शेतीकामांचे नियोजन कोलमडले आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असतानाच, या पावसाने उभ्या पिकांचे नुकसान केल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला आहे. भाजपच्या सर्व २८ नवनिर्वाचित नगरसेवकांचा अधिकृत गट स्थापन करण्यासाठी आज हे सर्व लोकप्रतिनिधी नवी मुंबईतील कोकण भवन येथे जाणार आहेत. भाजपच्या गटनेते पदी माजी उपमहापौर मुकेश मोकाशी यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ही नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी सर्व नगरसेवकांनी माघी गणपतीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. या प्रसंगी भाजप ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर हे देखील उपस्थित राहणार आहेत. कोकण भवनात गट नोंदणी झाल्यानंतर ठाणे महापालिकेतील भाजपची भूमिका अधिक स्पष्ट होणार आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीत ७२ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत एकहाती सत्ता काबीज केली आहे. या विजयानंतर आता प्रशासकीय प्रक्रियेला वेग आला आहे. भाजपच्या गटनेते पदी ज्येष्ठ नेते शाम बडोदे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. गटनेते पदाची माळ बडोदे यांच्या गळ्यात पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष नाशिकच्या महापौर पदाकडे लागले आहे. विशेष म्हणजे, यावेळचे महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने भाजपमधील अनेक दिग्गज महिला नगरसेविकांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. हिमगौरी आडके-आहेर, स्वाती भामरे यांसारखी नावे आघाडीवर असून, लवकरच पक्षश्रेष्ठींकडून अंतिम नाव जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
नाशिकहून निघालेले लाल वादळ आता इगतपुरीत विसावल्यानंतर जुन्या कसारा घाट मार्गे ठाणे जिल्ह्याच्या दिशेने रवाना झाले आहे. गेल्या तीन दिवसांत कडाक्याच्या उन्हात आणि खडतर प्रवासात या आंदोलकांनी १०० किलोमीटरचे अंतर कापले आहे. विशेष म्हणजे, आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार न घेण्याच्या निर्धाराने निघालेल्या या शेतकऱ्यांकडे पुढील १०० दिवस पुरेल इतकी रेशनची व्यवस्था सोबत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलक पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली आणि आंदोलन थांबवण्याची विनंती केली, मात्र एककीडे चर्चा सुरू राहील आणि दुसरीकडे आमचा लढा सुरूच राहील, असे सांगत आंदोलक आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
नंदुरबार जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. शहादा शहरासह परिसरात अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली, तर जिल्ह्याच्या अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे बळीराजा अडचणीत सापडला असून, रब्बी हंगामातील पिकांचे गणित बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अमरावती महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली. 30 जानेवारी ऐवजी आता 6 फेब्रुवारी रोजी होणार महापौर पदाची निवड. अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आल्याचा पत्र विभागीय आयुक्तांनी काढले होते. पण आज नवीन पत्र काढून ही निवडणूक आता 6 फेब्रुवारी रोजी आयोजीत करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीचा स्तुत्य उपक्रम. अनगरच्या नूतन नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांनी रोज संध्याकाळी 7 ते 9 यावेळेत गावकऱ्यांनी मोबाईल न वापरण्याचा, टीव्ही न पाहण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांच्या आरोग्य आणि भविष्यासाठी घेण्यात आला निर्णय. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या नगराध्यक्षांच्या नूतन संकल्पनेचे ग्रामस्थांकडून स्वागत.
धाराशिव जिल्हा परिषद जागा वाटपावरून शिवसेना–भाजपमधील तणावावर तोडगा निघाला आहे. जिल्हा परिषदेच्या 23 जागा तर पंचायत समितीच्या 50 जागा शिवसेना लढवणार असल्याची माहिती सरनाईकांनी दिली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर अखेर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली.
भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील, पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांसाठी समतोल राखण्याचा निर्णय घेण्यात आला.
ठाण्यातील घोडबंदर रोडसह इतर काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. हवामान खात्याने विविध भागात पाऊस पडण्याचा इशारा दिला होता.
नाशिकमधील तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी आहे. वकील नितीन पंडित यांनी तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणी याचिका दाखल केली होती. वृक्षतोड प्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रशेखर आणि गौतम अखंड यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
डोंबिवलीत अन्न आणि औषध प्रशासन आणि मानपाडा पोलिसांनी मोठी कारवाई केली. डोंबिवलीतील सोनारपाडा परिसरात छापा टाकून मानवी आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या बनावट औषधांचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला ‘टेल्मा एम’ नावाच्या औषधांची बनावट कंपनी उभारून डोंबिवलीसह महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये विक्री सुरू होती.
सिक्कीममधील गंगटोक येथील मूळ कंपनीच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने तपास करत ठाण्यातील वागळे इस्टेट आणि डोंबिवलीतील सोनारपाडा परिसरात छापा टाकून मोठ्या प्रमाणात बनावट औषधांचा साठा जप्त केला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी मानवी आरोग्यास धोका निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करत पाच आरोपींना बेड्या ठोकत तपास सुरू केला.
नाशिक शहरात ‘हिट अँड रन’चा थरार पहायला मिळाला. भरधाव चारचाकीची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक लागली. या घटनेत दुचाकीवरील दोघंजण गंभीर जखमी झाले. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील ही घटना आहे. घटनेनंतर CCTV व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत सभांचा धडाका असणार आहे. राज्यभरात एकनाथ शिंदे यांच्या तीसहून अधिक सभा आणि रोड शो होणार आहेत. नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांपाठोपाठ आता जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेनेचं मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेनेची प्रचार रणनिती ॲक्टिव्ह झाली आहे. शिवसेनेच्या प्रचार रणनितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक सभा होणार आहेत. तर दुसरीकडे नाशिकच्या तपोवन वृक्षतोडप्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. वकील नितीन पंडित यांनी तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणी याचिका दाखल केली होती. वृक्षतोड प्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रशेखर आणि गौतम अखंड यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. राज्य सरकार आणि नाशिक महापालिकेला न्यायालयात हजर राहण्यासाठी मागच्या तारखेला नोटीस बजावण्यात आली होती. यासोबतच इतर अपडेट्स, राज्याभरातील घडामोडी, राष्ट्रीय पातळीवरील बातम्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..