मोठी बातमी! उरणमधील ONGC प्रकल्पाला भीषण आग, आगीचे लोळ पाहून लोकांमध्ये घबराट
उरणमधील महत्त्वाच्या आणि संवेदनशील अशा ओनजीसी प्रकल्पाला भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेचे काही व्हिडीओ समोर आले असून सगळीकडे धुराचे आणि आगीचे लोट दिसत आहेत.

Uran Fire : उरणमधील महत्त्वाच्या आणि संवेदनशील अशा ओनजीसी प्रकल्पाला भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेचे काही व्हिडीओ समोर आले असून सगळीकडे धुराचे आणि आगीचे लोट दिसत आहेत. ही आग विझविण्यासाठी सीआयएसएफ आमि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागलेली आग पाहून लोकांमध्ये घबराट पसरलेली असून ही आग आणखी रौद्ररूप धारण करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सध्या नेमकी स्थिती काय आहे?
उरणधील ओनजीसी प्रकल्पात मोठी आग लागली आहे. ही आग लागल्याचे समजताच प्रकल्पाच्या प्रशासनाने अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलानेही कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. सध्या ही आग विझविण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी अग्निशमन दलाची पूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. ही आग लागल्यामुळे संपूर्ण उरण परिसरात भीतीचे वातावरण आहे. या प्रकल्पात नैसर्गिक वायू आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे. याच प्रकल्पात नैसर्गिक वायू आणि तेलाचे वितरणही केले जाते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात विलंब लागला तर ही आग आणखी रौद्ररुप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबईतील दहिसरमध्ये भीषण आग
गेल्या काही दिवसांपासून राज्यात आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. मुंबईतील दहिसरमध्येही 7 सप्टेंबर रोजी आग लागल्याची घटना घडली. दहिसरमधील जनकल्याण नावाच्या 24 मजली इमारतीत आग लागली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर पाच ते सहा जण जखमी झाले. या दुर्घटनेमुळे इमारतीच्या परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी तत्काळ परिसर रिकामा केला होता. साधारण एका तासाच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार चालू असून प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली होती. सखोल तपास केल्यानंतर आगीच्या घटनेची माहिती मिळू शकेल असे सांगितले जात आहे.
