धावता धावता पडले, रस्त्यातच 27 वार करुन त्यांना संपवले…; शिंदेंच्या शिवसैनिकासोबत शेवटच्या क्षणी काय घडलं? हत्येचा CCTV समोर

रायगडमधील खोपोलीत शिवसेना नेत्या मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची भररस्त्यात हत्या करण्यात आली. या घटनेचा थरारक CCTV व्हिडिओ समोर आला असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी रायगड जिल्हा ढवळून निघाला आहे.

धावता धावता पडले, रस्त्यातच 27 वार करुन त्यांना संपवले...; शिंदेंच्या शिवसैनिकासोबत शेवटच्या क्षणी काय घडलं? हत्येचा CCTV समोर
Mangesh Kalokhe Murder
| Updated on: Dec 28, 2025 | 9:02 AM

रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये शिवसेने शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची भररस्त्यात हत्या करण्यात आली. या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या थरारक हत्याकांडाचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आता समोर आले असून यामध्ये 5 ते 6 हल्लेखोरांनी मिळून काळोखे यांच्यावर तलवारी आणि कोयत्याने वार केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

सीसीटीव्हीत नेमकं काय?

नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून अवघे दोन दिवस उलटले असतानाच ही धक्कादायक घटना घडली. मंगेश काळोखे हे मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेले होते. त्याला सोडून परतत असतानाही ही घटना घडली. यातील सीसीटीव्ही व्हिडीओनुसार, हल्लेखोरांनी मंगेश काळोखे यांचा पाठलाग केला. काळोखे रस्त्यावर पडल्यानंतर दोन-तीन जणांनी त्यांना घेरले. त्यानंतर ५ ते ६ जणांच्या टोळीने त्यांना मारहाण केली. यावेळी हल्लेखोरांनी दगड, तलवारी आणि कोयत्याचा वापर करून काळोखे यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सुमारे २४ ते २७ वार केले. हा हल्ला इतका भयानक होता की काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला.

सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप

या हत्येनंतर रायगडच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी याप्रकरणी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तटकरे हे रायगडचे आका असून त्यांच्या सांगण्यावरूनच विरोधकांच्या हत्या केल्या जात आहेत, असा खळबळजनक दावा थोरवेंनी केला आहे.

एसआयटी (SIT) चौकशीची मागणी

दुसरीकडे, सुनील तटकरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ही घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, मात्र अशा प्रकरणावर राजकारण करणे योग्य नाही. आमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याचा यात सहभाग नाही, असे स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिले आहे. तसेच या प्रकरणाची एसआयटी (SIT) चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी तातडीने चक्र फिरवत मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि त्याचा मुलगा दर्शन देवकर यांना अटक केली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह एकूण १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी मारेकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.