
बीडमध्ये मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झाला आहे. एका रुग्णालयाची लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली असल्याचे समोर आले आहे. मात्र या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या अपघातावेळी नेमकं काय घडलं? याची माहिती लिफ्टमध्ये असलेल्या मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे. त्यांनी नेमकं काय सांगितलं ते जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे शिवाजीराव क्रिटिकल केअर या हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भेटण्यासाठी आले होते. मनोज जरांगे हे लिफ्टने दुसऱ्या मजल्यावर असलेल्या रुग्णाला भेटण्यासाठी जात होते. त्यावेळी लिफ्ट पहिल्या मजल्यावर जाताच अचानक बंद झाली आणि ती थेट ग्राऊंड फ्लोअरला येऊन आदळली. या अपघातानंतर लिफ्टचा दरवाजा तोडून मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे.
बीडमध्ये झालेल्या अपातावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी होते, त्यांनी याबाबत सांगितले की, ‘जरांगे पाटील त्या ठिकाणी सहकार्यांच्या वडिलांना भेटायला गेले होते. आम्ही दहा-अकरा जण त्या लिफ्टमध्ये गेलो. मात्र लिफ्टने तिरिक्त वजन असल्याचे कोणतेही सिग्नल दिलं नाही. लिफ्ट वरती गेली अन् पुन्हा जोरात खाली आदळली. सुदैवाने एक दोन सहकारी वगळता कोणालाही काही झालं नाही. लिफ्टच्या अपघाताचा दोन-तीन मिनिटाचा तो कालावधी असेल. लिफ्टबद्दल माहिती असणारा कोणीही व्यक्ती तिथे नव्हता. आम्हाला दरवाजा जोरात ओढून जरांगे पाटलांना बाहेर काढावे लागले, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे.
मनोज जरांगे पाटील शिवाजीराव हार्ट केअर हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भेटण्यासाठी आले असता अचानक लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि लिफ्ट थेट ग्राउंड फ्लोअरवर येऊन आदळली. यामध्ये जरांगे पाटलांचे सहकारी बद्रीनाथ तारख हे जखमी झाले असून त्यांना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचे सहकाऱ्यांनी सांगितले आहे. आता लिफ्टचा अपघात का झाला? याचे देखील कारण शोधले जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे.