मनोज जरांगे पाटील यांचा ज्या लिफ्टमध्ये अपघात झाला, त्या लिफ्टबाबत धक्कादायक माहिती समोर
मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात घडल्याची घटना घडली, आता चौकशीमध्ये या लिफ्टबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झाला आहे, ही लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट ग्राऊंडवर आदळली. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा मनोज जरांगे पाटील हे आपल्या काही सहकार्यांसोबत या लिफ्टमध्ये होते. लिफ्ट पहिल्या मजल्यावरुन खाली आदळल्यानंतर लिफ्टचा दरवाजा तोडून मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं.
मनोज जरांगे पाटील हे एका रुग्णाला भेटण्यासाठी बीडमधील एका हॉस्पिटलमध्ये गेले होते. तेथेच हा प्रकार घडला आहे. मनोज जरांगे पाटील यांना ज्या रुग्णाला भेटायचं होतं, तो रुग्ण तिसऱ्या मजल्यावर होता, मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व सहकारी लिफ्टच्या मदतीने तिसऱ्या मजल्यावर जात असताना, लिफ्ट अचानक पहिल्या मजल्यावर बंद पडली, त्यानंतर ती थेट खाली ग्राउंडवर आदळली, सुदैवानं मोठा अपघात टळला, या अपघातामध्ये लिफ्टमधील सर्वजण सुरक्षित आहेत. मात्र जरांगे पाटील यांच्या एका सहकाऱ्याला थोडी दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
आता या लिफ्टबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीडच्या शिवाजीराव हार्ट केअर हॉस्पिटलमध्ये आज दुपारी मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर एका रुग्णाला भेटण्यासाठी जात होते, त्या लिफ्टमध्ये अचानक बिघाड होऊन ती पहिल्या मजल्यावरून थेट खाली येऊन आदळली. यामध्ये जरांगे पाटलांचे एक सहकारी किरकोळ जखमी झाले असून इतर कोणालाही इजा पोहोचली नाही.
दरम्यान अपघातानंतर रुग्णालयाकडून या लिफ्टचा परवाना असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून सदरील लिफ्टला परवानगी नसल्याचं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात आपण लिफ्ट बंद करण्याच्या त्यांना सूचना दिल्या असून, इन्स्पेक्शन देखील केले जाणार आहे, अशी माहिती सहाय्यक विद्युत निरीक्षक गणेश सोळंके यांनी दिली आहे. या अपघातामुळे काही काळ रुग्णालयात गोंधळ उडाला होता, मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना लिफ्टचं दार तोडून बाहेर काढण्यात आलं.
