मुंबईत 29 ऑगस्टला भगवं वादळ धडकणार; जरांगे पाटलांकडून पुन्हा आंदोलनाची हाक, मार्गही ठरला
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आता पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. आता मराठ्यांना विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही असं त्यांनी यावेळी म्हटलं .

रामू ढाकणे, प्रतिनिधी : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला आहे. दरम्यान आज अंतवाली सराटीमध्ये राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. मराठा समाजाचं पुढील आंदोलन आता मुंबईमध्ये होणार आहे. ‘आता मराठ्यांना विजयापासून कोणीही रोखू शकत नाही. विजय मिळवूनच गुलाल फेकायचा. अंतिम लढाई आहे, आरपार आहे. 2 वर्षांपासून सातत्याने लढत असून, अंतिम लढाई पार पाडायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या लेकरासाठी मरमर करा, लेकरावर गुलाल टाका,’ असं आवाहन मराठा बांधवांना या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
आता आपल्याला गावागावातून तयारी करायची आहे, मैदान गाजवायचं आणि विजय मिळवायचा आहे. 29 ऑगस्ट रोजी मुंबईत जायचं म्हणजे जायचं. 27 ऑगस्टला अंतरवली सोडायची, कुठेही न थांबता मुंबई गाठायची आहे. या वेळी जायचा मार्ग बदलायचा आहे. गेल्या वेळी पुणे जिल्ह्यातील सगळ्या जाती धर्मातील लोकांनी आपली सेवा केली, त्यामुळे त्यांचे आभार मानतो. 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली मधून 10 वाजता निघायचं, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले मराठ्यांची लाट काय असते, हे मुंबईत आल्यावर बघा, इथून 10 ते 12 लाख लोक निघाले पाहिजेत, पाऊस पाणी बघू नका. फक्त तुम्ही सर्व जण माझ्या मागे राहा, मी बघतोच की हे आरक्षण कसे देत नाहीत, 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच करायचं आहे. फक्त माझ्यावर एवढ्या वेळेस विश्वास ठेवा, 1 इंच सुद्धा मागे हटणार नाही. मराठ्यांनी आता हुशार व्हा,आपल्या बाजूने विजयाची चाहूल लागली आहे, त्यामुळे घरी थांबायचं नाही. तुमच्या तकदीशिवाय कोणालाही विजय मिळवता येत नाही, आतापासून मुंबईला जाण्याच्या तयारी लागा,घरोघरी जाऊन सांगा, अस आवाहन यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवाना केलं आहे.
मुंबईचा जाण्याचा मार्ग
आंतरवलीतून 27 ऑगस्टला निघाल्यानंतर शहागड पैठण शेवगाव पांढरीपूल अहिल्यानगर नेप्टी नाका मार्गे आळेफाटा शिवनेरी दर्शन माळशेज घाट कल्याण वाशी, चेंबूर मंत्रालय
पर्यायी मार्ग
पैठण,गंगापूर,वैजापूर,येवला,नाशिक मुंबई
