
Manoj Jarange Patil Dasara Melava : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आज (2 ऑक्टोबर) बीड जिल्ह्यातील नारायण गड येथे दसरा मेळावा आयोजित केला होता. या दसरा मेळाव्याला हजारो मराठा बांधव हजर राहिले होते. जरांगे यांची प्रकृती बरी नाही. तरीदेखील त्यांनी जरांगे यांनी खुर्चीवर बसून जमलेल्या मराठा बांधवांना संबोधित केले. यावेळी जरांगे यांनी मराठा बांधवांना दोन कानमंत्र दिले. त्यांनी मराठा समाजाने शासक आणि प्रशासक बनावे असा संदेश दिला. तसेच आपण प्रशासनात असलो तर भल्याभल्यांना आल्यासमोर झुकावे लागेल, असं यावेळी जरांगे म्हणाले. मराठा आरक्षणाच्या लढ्यावर बोलताना जरांगे भावुक झालेले पाहायला मिळाले. त्यांच्या दोन्ही डोळ्यांत अश्रू आलेले पाहायला मिळाले.
मनोज जरांगे यांनी भाषणाच्या सुरुवातीला मराठा आरक्षणावर भाष्य केलं. त्यांनी मराठा आरक्षणाचा लढा, या लढ्यादरम्यान झालेली फितुरी, झालेली टीका यावरही मत व्यक्त केलं. मी कधीच शांत बसलो नाही. संपूर्ण आयुष्य झिजवलं. आता मला काही वाटत नाही. सातारा संस्थान म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि हैदराबाद गॅझेट म्हणजे मराठवाड्यातील मराठा आरक्षणात गेला. राज्याला वेढा टाकण्याची ताकद मराठ्यात आहे. हे माहीत होतं म्हणून आरक्षण मिळू देत नव्हते, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
तसेच , आपले (मराठा) आणि दुसरे विरोधात गेले. आपल्यांनी फितूर व्हायला नको होतं होतं. झाली असेल एखादी चूक. पण जीव धरणीला टेकला तरी मागे हटलो नाही. हे फितूरांनी समजून घ्यायला हवं होतं. लढणारा मी आहे. लढणारा समाज आहे. तुम्हाला विकून तुमच्या रक्ताशी गद्दारी करून मोठा झालो असतो तर तुम्ही फितुरी करायला हवी होती. तुमचं रक्त आमचं असूनही तुम्ही भेसळ रक्तासारखं कसं वागले हे मराठ्यांना नाही कळलं, अशी खंत जरांगे यांनी व्यक्त केली. या भावना व्यक्त करताना जरांगे यावेळी भावुक झाले.
हे लोक आमच्यासोबत नाहीयेत. पण मिळालं त्याचंही समाधान व्यक्त करू देत नाहीयेत. त्या लोकांना मराठ्यांना आयुष्यात काही देता आलं नाही. पांढरे कपडे घातले, गाड्यातून फिरले. टीव्हीवर दिसले आणि पुस्तकं वाचले. यातच यांची मर्दानगी गेली, अस म्हणत त्यांनी इतर राजकीय पक्षांच्या मराठा समाजाच्या नेत्यांवर टीका केली. तसेच मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी एका वर्षात ५८ लाख लोकांना आरक्षण दिलं. ३ कोटी मराठे आरक्षणात घातले. मी आणि गरीब मराठ्यांनी पुढच्या वर्षातील हैद्राबाद आणि पश्चिम महाराष्ट्राचा जीआर घेतला. दोन वर्षात सर्व मराठा आरक्षणात घातला, असे म्हणत मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी झाला असे मत व्यक्त केला.