Manoj Jarange : ‘…तर 2029 साली महायुतीची सत्ता जाणार’, जरांगे पाटलांचा फडणवीसांसह अजित पवारांना गंभीर इशारा

Manoj Jarange vs Dhananjay Munde : मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता. यावरून आता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गंभीर इशारा दिला आहे.

Manoj Jarange : ...तर 2029 साली महायुतीची सत्ता जाणार, जरांगे पाटलांचा फडणवीसांसह अजित पवारांना गंभीर इशारा
Jarange Fadnavis and Ajit Pawar
Image Credit source: TV 9 Marathi
| Edited By: | Updated on: Dec 08, 2025 | 4:50 PM

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता. यासठी 3 जणांना सुपारी दिली होती असं जरांगे पाटलांनी म्हटलं होतं. मात्र धनंजय मुंडेंनी जरांगे पाटलांचा आरोप फेटाळला होता. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होत नसल्याने जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

जो घातपात करत असेल त्याला वाचवू नका

मनोज जरांगे पाटील यांनी ठाण्यात बोलताना म्हटले की, ‘घातपाताचा कट प्रकरणात पोलीसांना आरोपींनी जबाब दिला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांना चौकशीसाठी बोलावलं जात नाही. अटक केली जात नाही. अजित पवार आणि फडणवीस यांच्यावरती शंका उपस्थित करणारा प्रश्न आहे. 100% धनंजय मुंडे त्यांच्या पायाखाली लोळला आहे. जरांगे पाटील यांच्या चौकशी पासून टाळा अशी विनंती केली असेल. रश्मी शुक्ला यांना माझी विनंती आहे, जो घातपात करत असेल त्यांना वाचवू नका, फडणवीस साहेब तुम्ही या पापामध्ये सहभागी होऊ नका. मराठ्यांची लाट फडणवीस आणि अजित पवार तुम्ही घेऊ नका.’

सांगून कट रचणारा मुख्य आरोपी म्हणजे धनंजय मुंडे

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ‘अडीच कोटीची सुपारी घेतली त्या पोरांच्या कुटुंबांना मी दोष देणार नाही. समाजाला सांगितले आहे की आरोपीच्या कुटुंबाना त्रास द्यायचा नाही. करणाऱ्या पेक्षा करून घेणारा महत्त्वाचा आहे तो म्हणजे धन्या आहे. मी गरिबांसाठी लढत आहे आणि हे लोक माझा घातपात करत आहेत. सांगून कट रचणारा मुख्य आरोपी म्हणजे धनंजय मुंडे.’

एकट्यामुळे तुमचा नाश होऊ शकतो

जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, ‘अजित दादांनी धन्या सारखी लोक ठेवू नयेत, ते तुमच्यासाठी आणि मराठा समाजासाठी घातक ठरतील. तुमच्या पक्षाचा विनाकारण बळी जाऊ नये, तुमच्या पक्षाची उतरती कळा त्यांच्यामुळे लागू नये. तुमच्या पक्षातील लोक चांगले आहेत, मात्र याच्या एकट्यामुळे तुमचा नाश तुम्ही करून घेऊ नका असं माझं अजित दादांना सांगणं आहे आणि अपेक्षा सुद्धा आहे.’

CM फडणवीस आणि अजित पवार यांना गंभीर इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना इशारा देताना जरांगे पाटील म्हणाले की, ‘मराठे फडणवीस आणि अजित पवार यांच्या विरोधात विरोधात गेले तर 2029 हातातून जाऊ शकते. काँग्रेस पक्ष समुद्रासारखा होता त्याची देखील सत्ता गेली आणि भाजपची सत्ता आली त्यामुळे फडवणीस यांनी गर्वात राहायचं नाही. ते असं जर करत राहिले तर सरकारला उतरती कळा लागणार. मराठे सोपे नाहीत, जीवाला जीव देणारे मराठे आहेत. धनंजय यांच्या पापात अजित पवार आणि फडणवीस सहभागी झाल्यामुळे यांच्या पक्षाचा सत्तेचा बळी जाऊ शकतो.’