सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई…मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानातून मोठा इशारा
Manoj Jarange Patil Maratha Morcha : मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा हा मुंबईत दाखल झाला आहे. यावेळी काही काळ मुंबईत वाहतूकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला. गोळ्या घातल्या तरीही मागे हटणार नसल्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले आहेत. जरांगे पाटील हे ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसले. मराठा समाजाचे लोक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. अनेक ठिकाणी वाहतूकीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबईतील अनेक भागात वाहतूककोंडी झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी आंदोलनाला परवानगी दिल्यामुळे सरकारचे आभार मानताना मनोज जरांगे पाटील दिसले. मात्र, यासोबतच त्यांनी थेट मोठा इशारा दिला आहे. आम्हाला अमरण उपोषणाची करण्याची परवानगी द्या, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील यांना एकच दिवसाची उपोषणाची परवानगी दिली आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, आमच्या सर्व मागण्या या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत, हा माझा शब्द आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला कोर्टाने परवानगी नाकारली होती. मात्र, पोलिसांनी 20 अटी घालून या उपोषणाला परवानगी दिली आहे. मात्र, आजसाठीच ही परवानगी असणार आहे.
जरांगे पाटील हे आपल्या मागण्यांवर अजूनही ठाम आहेत. मराठा समाज हा मोठ्या संख्येने आझाद मैदानावर पोहोचला आहे. सकाळच्या वेळी मुंबईत अनेक भागात वाहतूककोडी झाल्याचे बघायला मिळाले. हेच नाही तर काही वाहने देखील रस्त्यावर लावली आहेत. यामुळे जरांगे पाटील यांनी लोकांना सांगितले की, आपली वाहने बाजूला काढा आणि मुंबईचे रस्ते रिकामे करा. पोलिसांना विचारा पार्किंग कुठे आहे, पोलिसांना सहकार्य करा.
यासोबतच गोंधळ, धिंगाना अजिबात घालायचा नाही, असे जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले आहे. जरांगे पाटील हे अजूनही अमरण उपोषण करण्याच्या त्यांच्या मागणीवर ठाम असल्याचे बघायला मिळतंय. सरकारचे शिष्टमंडळ हे जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते. मात्र, त्यामधून पर्याय निघू शकला नाही. जरांगे पाटील यांना मुंबईमध्ये येण्यापासून रोखण्यात सरकारला अपयश मिळाल्याचे बघायला मिळतंय. आता काहीही झाले तरीही मागे हटणार नसल्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
