मराठा आरक्षणासाठी चलो मुंबईची हाक, मनोज जरांगेंची आज फुल अँड फायनल बैठक, काय होणार?
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोठे आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. सोलापूरहून २५००० गाड्या या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. येत्या २९ ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज दुपारी १२ वाजता आंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईत केल्या जाणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील आज महत्त्वाची भूमिका घेणार आहेत. आता ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत चलो मुंबईची घोषणा केली होती. “तुम्ही गर्व वाटावं असं काम करत आहेत. बीडचं हे नुसतं रुप बघून सरकारला रातभर झोप राहणार नाही. बेजार होणार. चलो मुंबई. 29 ऑगस्टला जमून फाईटच आहे. आपल्याला शांततेत जायचं आहे आणि शांततेत आंदोलन करायचं आहे. आरक्षणासाठी ही शेवटची लढाई आहे. मुंबईला येण्याची हौस नाही. पण लेकरंबाळांसाठी यावं लागतंय. 29 ऑगस्टला मुंबईला जायचं आहे. 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आंतरवलीतून मुंबईला निघायचं. समाजाला डाग लागेल असं पाऊल उचलायचं नाही. कुणी दगडफेक आणि जाळपोळ करायची नाही”, असे आवाहन मनोज जरांगेंनी केले.
आता याच पार्श्वभूमीवर आज सकाळी मनोज जरांगे हे आंतरवाली सराटीत दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील काय महत्त्वाचा निर्णय घेणार की राज्य सरकारला पुन्हा एकदा वेळ देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. या आंदोलनासाठी गावोगाव आणि विविध जिल्ह्यात बैठका आणि गाठीभेटी घेऊन जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना मुंबईला येण्याचा आवाहन केले आहे.
सोलापुरातून २५ हजार गाड्या मुंबईकडे रवाना होणार
सोलापूर जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी २५ हजार गाड्या मुंबईला जाणार आहेत. माढा येथे झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समाजासाठी जे नेते पुढे येतील, त्यांनाच पाठिंबा देण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. गरजू मराठ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. यावेळी राज्य मराठा समन्वयक माऊली पवार यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सरकारने मराठा आंदोलनात अडथळा आणण्यासाठी हाके यांना फॉर्च्युनर गाडी आणि फ्लॅट देऊन पाठवले असा आरोप त्यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांना १० लाख रुपये कोणत्या आमदारांनी दिले, हे हाके यांनी जाहीर करावे. जरांगे पाटील यांनी कोट्यवधी मराठ्यांची मने जिंकली आहेत, त्यामुळे १०-१५ लाखांची चर्चा करून काही फायदा नाही. लोकांनी लाखो-कोटींच्या संख्येने सभेला येऊन पाठिंबा दिला आहे. हाके धनगर समाजाशीही प्रामाणिक नाहीत, त्यामुळे त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. हाके यांनी मराठ्यांवर टीका करत राहावे, आम्ही मात्र आरक्षणाची लढाई जिंकणारच, असा निर्धारही माऊली पवार यांनी केला.
