शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला; फडणवीसांचा मार्ग मोकळा, जरांगेंचा पुन्हा इशारा

एकनाथ शिंदे यांनी अखेर मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला आहे, त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला; फडणवीसांचा मार्ग मोकळा, जरांगेंचा पुन्हा इशारा
Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis
Image Credit source: Facebook
| Updated on: Nov 27, 2024 | 5:32 PM

मोठी बातमी समोर येत आहे. आज महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेनंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? 

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला हा त्यांचा राजकीय विषय आहे, त्याच्यावर आम्ही बोलणे योग्य नाही, आम्ही आमच्याच कामात आहोत, येत्या रविवारी आम्ही तुळजापूर दर्शनासाठी जात आहोत. मुख्यमंत्री कोणीही होवो, आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही, परंतु मराठ्यांची एकजूट सरकारचा घाम फोडणारी आहे, कोणीही आले तरी आम्हाला सुख नव्हते, आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. कोणीही मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण घेणार, सुट्टी नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, यावेळी मी आणि माझा समाज मैदानात नव्हतो, माझ्या समाजाने जे करायचे ते केले आहे, माझ्या समाजाशिवाय राज्यात कोणाचीच सत्ता येऊ शकत नाही. मराठा समाज ताकतीने प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहिला आहे, आता सरकारने मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहून त्यांना आरक्षण मिळवून द्यावे, मस्तीत येऊ नये. आजकालचे सरकार भावनाशून्य आहे, त्यांना भावनेची किंमत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण बाबतीत काम केले आहे, पण आम्हाला पण लढावे लागले होते.

मराठ्यांना महाविकास आघडी आणि महायुतीकडून सहजा सहजी काहीही मिळालेले नाही.मुख्यमंत्री हे आरक्षणाबाबत काम करू शकले, आरक्षण मिळवून देऊ लागले, पण सत्य हे पण आहे आम्हाला सहजा सहजी मिळाले नाही. परंतु मुख्यमंत्री कोणाला करायचे हा त्यांचा विषय आहे. आम्ही आमच्या आमरण उपोषणाच्या तयारीला लागलो आहोत. 132 पेक्षा जास्त मतदार संघात 20 हजाराच्या आसपास महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत, तिथे मराठ्यांनी सभा लावली असती तर पूर्ण राख झाली असती. महायुती जास्त मतांनी निवडून आली म्हणजे आता तुमची जबाबदारी वाढली आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.