…अन् मनोज जरांगेंनी बावनकुळेंचं केलं तोंडभरून कौतुक, म्हणाले मी त्यांना शबासकी देतो; नेमकं प्रकरण काय?
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली, या भेटीवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली, या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. दुसरीकडे या भेटीवर बोलताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची जी भेट झाली त्यानंतर आता मला काहीच सूचत नाही. काय झालं, कसं झालं आणि का भेट घेतली याबद्दल मी कालपासून कन्फ्युजनमध्ये आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गोरगरीब मराठ्यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला तोच माणूस इतका विषारी झाला. कधी स्वप्नातही वाटत नव्हतं की अशी परिस्थिती उद्भवू शकते. याउलट वेळ पडली तर पक्षाला लाथ मारायला पाहिजे होती त्यांनी. त्यामध्ये एक सांगून जातो ही गुप्त भेट होती, पण उघड झाली. जर ही भेट उघड झाली नसती तर हा मराठ्यांशी किती मोठा धोका होता किती मोठा दगा फटका होता. जर हे उघड झालं नसतं तर काय झालं असतं? याचा मराठा समाजानं एकवेळ विचार करावा असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, हे खूप भयंकर आहे. मराठ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांना आपल्या स्वतःच्या घरात घेतलं आणि स्वतःच्या लेकरा प्रति मानलं. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. जर ही भेट झाली असं माहीतच झालं नसतं तर हे सगळं प्रकरण दबलं होतं. जर ही गुप्त भेटीची माहिती उघड झाली नसती तर त्यांनी मीडियासमोर भाषण केलं असतं. परंतु योगायोगाने ही गुप्त भेट उघड झाली. ज्यांनी ही भेट झाल्याची माहिती उघड पाडली त्यांना मी मार्क देतो, शाबासकी देतो. बावनकुळे साहेबांना या संदर्भात शाबासकी दिली पाहिजे, की त्यांनी हे उघड केलं असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.