Manoj Jarange: ‘आंदोलकांना त्रास दिला जातोय, इंग्रजांपेक्षा तुम्ही बेक्कार आहात’, मनोज जरांगे सरकारवर संतापले
मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. मात्र या आंदोलकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे.

मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. जरांगे पाटलांसोबत हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झालेले आहे. मात्र या आंदोलकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच मी आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी हटणार नाही असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. जरांगे पाटलांनी सरकारची तुलना ही इंग्रजांशी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जरांगे पाटलांनी म्हटले की, एक दिवसांची परवानगी देण्याचे हे असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा सरकारने मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावे, सरकारला ही संधी आहे. आरक्षण दिल्यास मराठे तुम्हाला विसरणार नाहीत. कारण आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी हटणार नाही. हे आंदोलन मोडावं की चालू ठेवावं हे सरकारच्या हातात आहे. त्यांनी आरक्षण द्यावं असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.
इंग्रजांपेक्षा तुम्ही बेक्कार आहात
पुढे बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, ‘मराठ्यांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. आता सरकारने शौचालये, खाण्यापिण्याची दुकाने बंद केली आहेत. आंदोलकांना पाणी जेवण मिळू नये यासाठी सरकारचा प्रयत्न आहेत. इंग्रजांपेक्षा तुम्ही बेक्कार आहेत. गरिबांच्या लेकरांना त्रास देऊ नका. सरकार आडमुठात घुसले की मराठेही आडमुठात घुसतील असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.
मुंबईत गेल्यावर आमचे हाल केले हे आमच्या लक्षात असेल
जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, आंदोलकांना त्रास दिला जात आहे, सरकारने भंगार खेळ खेळणे बंद करावं. तुम्ही आम्हाला इथे त्रास दिला तर तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्हीही त्रास देऊ. मुंबईत गेल्यावर आमचे हाल केले हे आमच्या लक्षात असेल. तुमच्या दारात आलो तर तुम्ही एक-एक दिवसाची रडण्यासारखी परवानगी देताय.
मराठे माज नव्हे तर वेदना घेऊन आलेत
आंदोलकांबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मराठ्यांची मुलं काही म्हणणार नाहीत, ते माज घेऊन नव्हे तर वेदना घेऊन मुंबईत आले आहेत. मी मराठ्यांसाठी बलिदान देण्यासाठी तयार आहे. आता मी मरेल किंवा आरक्षण मिळवेल. मी एकतर उपोषण करुन मरेल किंवा सरकार मला गोळ्या घालून मारेल, पण मी आता मागे हटणार नाही.
