Manoj Jarange Patil : लोकांचं ऐकून गैरसमज नको, सर्व मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार – मनोज जरांगेंनी ठणकावलं

मनोज जरांगे यांनी पाच दिवसांच्या उपोषणानंतर मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन संपवले. सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतल्याने हे शक्य झाले. जरांगे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, यामुळे मराठा समाज ओबीसीत समाविष्ट होईल. लोकांना अफवांना बळी न पडण्याचे आवाहनही केले.

Manoj Jarange Patil : लोकांचं ऐकून गैरसमज नको, सर्व मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार - मनोज जरांगेंनी ठणकावलं
manoj jarange live
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 03, 2025 | 12:47 PM

गेल्या 5 दिवसांपासून आझद मैदानात मराठा समाजासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांनी काल आंदोलन संपवले. काल सरकारकडून एक जीआर काढण्यात आला. यात राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जरांगे यांनी उपोषण संपवण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू असून तेथून आज पत्रकार परिषद घेत सर्वांना पुन्हा संबोधित केलं.

मात्र या गॅझेटच्या मुद्यावरूनही संभ्रम असून अनेक चर्चा सुरू आहेत. मनोज जरांगे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सर्व मुद्यांवर भाष्य करत काही गोष्टी स्पष्ट केल्या. हैद्राबाद गॅझेटच्या नोंदी लक्षात घेऊन मराठा समाज ओबीसीत जाणार आहेत. सरकारने काढलेल्या जीआर मुळे सर्व मराठे ओबीसीत जाणार म्हणजे जाणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही लोकांचे ऐकून गैरसमज करुन घेऊ नका असं सांगत त्यांनी अफवांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला.

काय म्हणाले जरांगे पाटील ?

मराठ्यांनी जीवाची बाजी लावली. या लढ्याला जे यश मिळालं ते सगळं यश माझ्या मराठा बांधवाचं आहे, मी मात्र नाममात्र आहे.  मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार, त्यात तिळमात्रही शंका नाही, कोणी शंका घेऊही नका. ज्यांच्या नोंदी नाहीत, म्हणून तर गॅझेटिअर लागू करायचं आहे. त्याचा जीआर निघणं खूप आवश्यक होतं.

75 वर्षात हक्काचे गॅझेटियर असून सरकारने एक ओळही लिहिली नव्हती. मात्र आता समाजाने संयम ठेवावा, कोणाही  विदुषकाचे, अविचारी माणसाचे ऐकू नका, संयम, विश्वास ढळू देऊ नका असा सल्ला मनोज जरांगे यांनी दिला.

काहींचं पोट दुखत होता कारण त्यांना  ज्या आरक्षणावर राजकारण करायचं होतं, जीवन पूर्ण जगत होते, ते पूर्ण कोलमडायला आलं आहे.  ज्याच्या जीवावर राजकारण करायचे होते ते त्यांच्या हातून गेलं आहे.

माझा कोणताही निर्णय मान्य केल्यावर, सुरूवातील मराठा समाजाला वाटते की जरांगे पाटलाने हे करायला नको होतं. मात्र नंतर ते सगळ्यांना मान्य होते. मी काय करतो ते समजून घ्या. मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणावाचून राहणार नाहीहे पक्कं डोक्यात ठेवा आणि आनंदी रहा.काही लोकांचे ऐकून गैरसमज करुन घेऊ नका, त्याने आपलं भलं होणार नाही, असं जरांगे म्हणाले.

मला तुमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न आहे

तुमच्यात आणि माझ्यात दूरी करून, मला आणि तुम्हाला एकमेकांपासून तोडायचा प्रयत्न आहे. मी एकदा तुमच्यापासून बाजूला झालो की वाटोल झालं, हा त्यांचा उद्देश आहे असा आरोप जरांगे यांनी केला.   त्यामुळे कोणीही यांच्यावर विश्वास ठेवू नका.  जर गरीब मराठ्यांच्या कोणाच्या मनात काही शंका असेल तर ती काढून टाका.  मी तुमचं वाटोळं करणार नाही,  तसं करायचं असतं तर एवढं केलं नसतं.  मात्र माझ्यावरील तुमचा विश्वास ढळू देऊ नका असंही जरांगे म्हणाले.

मराठ्यातील काही लोकं सोशल मीडियावर काहीतरी दिशाभूल करत आहेत,  जे विरोधात बोलत आहेत त्यांनी 70 वर्षात काही दिले नाही अशी टीका जरांगेंनी केली.