Manoj Jarange Patil : जैन मुनींचे आता मुनीर भाई झालेत, मुनी ह्या सडलेल्या डोक्याच्या अवलादी, मराठ्यांची पोर फटकावतील, मनोज जरांगे यांचा इशारा
Manoj Jarange Patil : "पण पुतळ्याच्या अडून अमुक अमुक जाती अंगावर आल्या पाहिजे. हा जर उद्देश असेल तर तुम्ही खूप मोठं पाप करत आहात. मराठा समाजाने नुसता पुतळा बसवायचा म्हणून बसवू नका, त्या मागचं षडयंत्र सुद्धा बघा. आता हे शोधावं लागेल की पुतळे देणारा कोण? हे आम्हाला माहित नाही, बसवत कोण हे सुद्धा मला माहित नाही, ही टीम नेमकी कोणा कोणाची आहे?" असा सवाल मनोज जरांगे यांनी विचारला.

मनोज जरांगे यांनी जैन मुनीचा मुनीर भाई म्हणून उल्लेख केला आहे. “हा जैन मुनि राहिलेला नाही, आजपासून मुनीर भाई झालेला आहे. यांना धर्माशी काहीही घेणं देणं नाही. जैन समाज बांधवांनी यांना समजावून सांगावं, अन्यथा मराठ्यांची पोरं याला फटके देतील” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ‘वाद होतील अशा ठिकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे बसवूच नका’ असं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना आवाहन केलं. “पुतळे देणारा कोण? आणि बसवणारा कोण? हे आम्हाला माहीत नाही, ही टीम नेमकी कोणाची आहे शोधावं लागेल” असं ते म्हणाले.
“अंजनगावचा वाद मिटला हे चांगलं झालं. देवस्थानच्या ठिकाणी वाद करायचा की नाही याची अक्कल आम्हाला आहे. मात्र काही जण फडफड करतात हे देखील खरं आहे. कारण त्यांना ती संधी मिळाली” असं म्हणत नाव न घेता लक्ष्मण हाके यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधला. “धनगर समाजाचे धर्मगुरू फरांदेबाब यांना शब्द दिला होता की, तुम्ही काळजी करू नका मराठा, धनगर वाद मिटणार आहे. देवस्थानच्या ठिकाणी वाद लावून धरायचा नसतो. तिथे गेलेले काहीजण चिमणी सारखी फडफड करत होते. परंतु ते मिटलं तर खूप चांगलं झालेलं आहे. काहींना या प्रकरणातून नेता व्हायचं होतं आणि दंगली घडवायच्या होत्या” असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
त्या ठिकाणी मराठ्यांवर अन्याय झालेला होता
“चिखला येथे झालेलं प्रकरण शंभर टक्के खरं होतं. त्या ठिकाणी मराठ्यांवर अन्याय झालेला होता. आम्ही मागे सरकणार नाही. वाद होणार नाही अशा ठिकाणी महाराजांचे पुतळा बसवण्याची आमची भूमिका आहे. इथून मागे वाद झाले नाहीत. आत्ताच कसे काय वाद व्हायला लागले, छत्रपतींवर जळणारे आहेतच. त्यांना छत्रपती नको वाटत आहेत. पुतळे बसवले पाहिजे हे पण खरं आहे. पण वाद होईल अशा ठिकाणी नको,सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याचा उद्देश नीट असला पाहिजे” असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
‘मुनी ह्या सडलेल्या डोक्याच्या अवलादी आहेत’
जैन मुनीच्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. “यांची काय डोकी सडलेली आहेत का? छत्रपती छत्रपती आहे. जैन बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही या मुनीला एकदा समजून सांगा. आपले चांगले मैत्रीचे संबंध आहेत. मुनी ह्या सडलेल्या डोक्याच्या अवलादी आहेत, एखाद्या वेळेस मराठ्यांची पोर यांना फटके देतील. हे मुनी नाही तर मुनीर भाई झाले आहेत. निजाम भाई, मुनीर भाई तसे हे मुनीर भाई आहेत. यांना धर्माशी काहीही घेणं देणं नाही, हे नवीन मुनीर भाई निघाले आहेत” असा खोचक टोला मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी जैन मुनींना लगावला