बचेंगे तो और भी लढेंगे, मुंबईच्या महापौरांनी मूठ आवळली, लॉकडाऊन की निर्बंध लवकरच घोषणा

मुंबईत आता कोरोना रुग्ण वाढत आहेत. रुग्णालयातील खाटा भरून जात आहेत. (mayor kishori pednekar reaction on lockdown in mumbai)

बचेंगे तो और भी लढेंगे, मुंबईच्या महापौरांनी मूठ आवळली, लॉकडाऊन की निर्बंध लवकरच घोषणा
kishori pednekar

मुंबई: मुंबईत आता कोरोना रुग्ण वाढत आहेत. रुग्णालयातील खाटा भरून जात आहेत. त्यामुळे काळजी वाढली आहे. टाळेबंदी कोणालाच नकोय. पण काही कठोर नियम करावेच लागणार आहे. शेवटी बचेंगे तो और भी लढेंगे. जिवंत राहिलो तर या पृथ्वीतलावर आपण काही तरी करू शकतो, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. लॉकडाऊन की कठोर निर्बंध याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच घोषणा करणार असल्याचंही पेडणेकर यांनी सांगितलं. (mayor kishori pednekar reaction on lockdown in mumbai)

महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. मुंबईतील कोरोनाची परिस्थिती वाढत चालली आहे. रुग्णसंख्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर बोजा येत आहे. आरोग्य यंत्रणेवरील बोझा कमी करायचा असेल तर आपल्याला अधिक काळजी घ्यायला हवी, असं महापौर म्हणाल्या.

हमीपत्र द्यावं लागणार

कोरोनाचा संसर्ग वाढला तरी घाबरण्याचं कारण नाही. पण प्रत्येकाने स्वत: ला सांभाळले पाहिजे. स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. नियम पाळायला हवेत. सर्व व्यवहार जर सुरळीत ठेवायचे असतील तर कोरोना नियमांचं सक्तीनं पालन केलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. घरी राहूनही लोक घरीच बाधित होत आहेत. उपचार नीट घेतले जात नाहीत. ज्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात येत आहे, ते लोक बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे आता या लोकांकडून हमीपत्र घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

केंद्राकडून मदत नाही

यावेळी महापौर पेडणेकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली. केंद्रातून फार मोठी मदत मिळत नाही. त्यामुळे आम्ही आमच्यापरीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा आणि कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न करत आहोत. कोरोना रोखण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज आहे. धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या आपण शून्यावर आणली होती. त्यामुळे आताही आपण त्याच दिशेने काम करत आहोत, त्यासाठी सर्वांनी त्रिसूत्रीचं पालन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं. आपण कोरोनावर नियंत्रण आणल्यानंतर बऱ्याच गोष्टी शिथील केल्या होत्या. पण लोक नियम पाळत नाहीत. त्यामुळे ते बाधित होत आहेत, असं त्या म्हणाल्या. तसेच नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

नेत्यांचं प्रबोधन कोण करणार?

कोरोनाच्या संकटात राजकारण करणं योग्य नाही. कोरोनामुळे लोक मरत आहेत. त्यामुळे ज्यांच्या जीवावर निवडून येतो, त्यांना चेतवणं योग्य नाही. राजकारण्यांनी नागरिकांच्या जीवाशी खेळू नये, असं सांगतानाच नागरिकांचं प्रबोधन करता येईल. पण राजकीय नेत्यांचं प्रबोधन कोण करणार हाच खरा यक्ष प्रश्न आहे, असा टोला त्यांनी विरोधी पक्षाला लगावला. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कोरोना वाढेल, त्याला हातभार लागेल, असं कोणतंही कृत्य करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

मंदिरही बंद करावे लागतील

यावेळी त्यांनी थेट भाजपवर टीका केली. कोरोना वाढत असताना भाजपने बेजबाबदारपणे वागू नये. हे करणार नाही ते करणार नाही, असं बोलून चालणार नाही. आम्ही हे सहन करणार नाही. लोकांच्या जीवाशी खेळू नका. तुम्ही जमिनीवर उतरून काम करणार आहात का?, असा सवाल त्यांनी केला. मंदिरांमध्ये गर्दी होत असेल तर ते बंद करावे लागतील. शेवटी बचेंगे तो और भी लडेंगे. आपण पृथ्वीतलावर राहिलो तर खूप काही करू शकतो, असंही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री सर्वांशी बोलून निर्णय घेतील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. राज्याच्या हिताचे निर्णय घेत आहेत. त्यांच्या कामावर कुणाला पोटशूळ उठत असेल तर ते थांबवा, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. तसेच जिथे गर्दी होते त्या सर्व गोष्टी पूर्वी बंद होत्या. याबाबत मुख्यमंत्री सर्वांशी बोलून निर्णय घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (mayor kishori pednekar reaction on lockdown in mumbai)

संबंधित बातम्या:

लोकलमध्ये केवळ ‘या’ प्रवाशांनाच परवानगी?; मुंबईत मॉल, मंदिरही बंद होणार?; महापौरांचं मोठं विधान

महाराष्ट्रात एकाच दिवसात तब्बल तीन लाखांहून अधिक जणांना लस, मुंबई, पुण्यात किती जणांचे लसीकरण?

येत्या काही दिवसांत मुंबईत कडक निर्बंध लागणार, महापौरांचे मोठे संकेत

 शरद पवारांचा उपचारांना चांगला प्रतिसाद, चालण्याचीही परवानगी

(mayor kishori pednekar reaction on lockdown in mumbai)

Published On - 1:16 pm, Fri, 2 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI