लाडकी बहीण योजनेचा मोठा फटका, छगन भुजबळांनी थेट म्हटले, आर्थिक ओढाताण होतंय हे…

Minister Chhagan Bhujbal on Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. या योजनेत राज्य सरकारचा मोठा निधी जात आहे. इतर विभागांना निधी देण्यासाठी सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे. लाडकी बहीण योजनेवर छगन भुजबळांनी मोठे विधान केले.

लाडकी बहीण योजनेचा मोठा फटका, छगन भुजबळांनी थेट म्हटले, आर्थिक ओढाताण होतंय हे...
Chhagan Bhujbal
| Updated on: Oct 06, 2025 | 12:05 PM

नुकताच छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठे भाष्य केले. छगन भुजबळांनी म्हटले की, लाडकी बहीण जी योजना आहे ती 35-40 कोटींवर जाते. तेवढे पैसे आपल्याला काढायचे म्हटले की, सगळीकडेच याचा फटका बसतो. त्यामध्येच राज्यामध्ये प्रचंड पाऊस त्यामुळे शेतीची मोठी हानी झाली, त्यामुळे तिकडे देखील मोठ्या प्रमाणावर निधी द्यावा लागणार आहे. निश्चितपणे यामुळे निधीची ओढाताण होत राहणार आहे. लाडकी बहीण योजनेमुळे इतर गोष्टींना फटका बसत आहे. इतर काही गोष्टी करणे शक्य नाही. आमच्या विभागातर्फे दहा किलो तांदूळ आणि गहू वाटप केला जातो आणि ते वाटप आम्ही सुरू केलंय. ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले, त्यांना सरकार पाच हजार रूपये मदत देतंय. बाकी पंचनामे करून भारत सरकार निश्चितपणे मदत करणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न अगोदर सोडवावे लागतील.

पुढे छगन भुजबळांनी म्हटले की, शिवभोजन थाळीच्या निधीसाठी आम्हाला फार जास्त प्रयत्न करावे लागतात, हे खरं आहे. आनंदाच्या शिधाबाबत अर्थखात्याने स्पष्ट सांगितले की, यावेळी शक्य नाही. 350 कोटी एका शिधेचा खर्च जातो. सर्व खात्यांना निधीची कमतरता झाली आहे हे मी सांगू शकतो. अजित पवारांनीही सांगितले की, पैशांचे सोंग करता येत नाही. पैसे वाढले की, कुठेतरी या गोष्टी घडतात आणि ओढाताण होते.

निधीबाबत ओढाताण होतच राहणार असल्याचे भुजबळांनी स्पष्ट म्हटले. दिवाळीमध्ये भेटणारी आनंदाची शिधा यंदा मिळणार नसल्याने सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. त्यामध्येच आता छगन भुजबळ यांनी यावर थेट भाष्य केले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना अगोदर मदत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. यासोबतच लाडकी बहीण योजनेचा फटका इतर विभागांना बसत असल्याचे त्यांनी म्हटले.

शिवभोजन थाळीचा पूर्ण निधी अजून मिळाला नसल्याचे खंत भुजबळांनी बोलून दाखवली आहे. लाडकी बहीण योजनेवर अधिक पैसा खर्च होत असल्याने इतर विभागांना निधी मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेला आपल्या विभागाचा निधी वळवण्यात आल्याने संजय शिरसाट यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामध्येच आता छगन भुजबळ देखील यावर बोलताना दिसत आहेत.