
राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. बारामती विमानतळावर उतरताना धावपट्टीशेजारी असलेल्या एका शेतात त्यांचे विमान कोसळले. हे विमान खाली कोसळताच त्या विमानाने पेट घेतला. बुधवारी २८ जानेवारीला सकाळी 8.44 च्या सुमारास या अपघात झाला. या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. या विमान अपघातानंतर आता राज्यात सर्वच राजकीय नेत्यांच्या विमानांच्या सुरक्षेबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच आता मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानात बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.
आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर धुळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावर सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहणार होते. मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचे त्यांनी स्वत: सांगितले आहे.
धुळ्यातील महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आज होतं. त्यामुळे मी ठरवलं होतं की मुंबईहून धुळ्याला विमानाने जायचं आणि धुळ्यावरुन शिर्डीला येऊन गाडीने येवल्याला यायचं. त्यानुसार आम्ही विमानात बसलो. विमानाचे दोन्ही इंजिन सुरु झाले. ते धावपट्टीवर जाणार आणि उड्डाण घेणार होते. तितक्यात डॅशबोर्डवरील जे स्क्रीन आहेत ते दोन्हीच्या दोन्ही बंद पडले असते. यामुळे आता सहाजिकच नेव्हिगेशनपासून सर्वच गोष्टी बंद झाल्या असत्या. त्यामुळे मग सॉफ्ट लँडिंगला वैगरे प्रॉब्लेम झाला असता. ते विमान भरकटलं असतं. त्यामुळे आम्ही ते उड्डाण रद्द केले, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
त्यानंतर मग आम्ही त्यांना तुमच्या इंजिनिअरला बोलून काय असेल ते करा. तोपर्यंत तुम्ही थांबा. यानंतर मग मी गाडीने येवल्याला पोहोचलो. इंजिन मध्ये काही वेळा असे प्रॉब्लेम होतात, अशा सुचना छगन भुजबळ यांनी त्यांच्यासोबत उपस्थित लोकांना दिल्या. त्यानंतर मग ते धुळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी दाखल झाले.
दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. छत्रपती संभाजीनगर येथून लातूरसाठी उड्डाण घेण्यापूर्वीच हा बिघाड वैमानिकाच्या लक्षात आला, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. पंकजा मुंडे या लातूरमध्ये प्रचारसभेसाठी जात असताना ही घटना घडली होती.