दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा मुंबईत नव्हे, तर दिल्लीतच होणार, एनसीपीच्या मंत्र्याचा मोठा दावा; 29 जुलैनंतर…
minister hasan mushrif on ncp merger : मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर मोठं वक्तव्य केलं आहे. विलिनीकरणाची चर्चा दिल्लीत होइल, अशी माहिती त्यांनी दली.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन एनडीएमध्ये सहभागी व्हावे, अशी भाजपची इच्छा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही स्वतंत्र राष्ट्रवादी ऐवजी विलिनीकरणानंतरच शरद पवारांना एनडीएमध्ये सहभागी होता येईल, असं भाजपने स्पष्ट केल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितंय. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी अधिवेशनादरम्यान काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर आता मंत्री हसन मुश्रीफ यांनीही मोठं भाष्य केलं आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. मुश्रीफ यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर भाष्य करताना हसन मुश्रीफ म्हणाले, ‘केंद्र सरकारने कॉकरोच जनता पार्टीच्या दिपके यांना अनेक वेळा आंदोलनासाठी परवानगी दिली आहे. वांगचुक यांनी देखील आंदोलन सुरू केलं होतं. नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही त्यांची मागणी आहे. मात्र आता नव्याने नीट परीक्षा झाली. त्याचे निकालही लागले. आता काही तक्रार राहिलेले नाही. असं असताना एखाद्या मंत्र्यांनी राजीनामाच द्यावा, यासाठी असं आंदोलन करणं हे काही बरोबर नाही. त्यांची तब्येत बिघडलेली होती. त्यांच्या तब्येतीच्या कारणावरून औषधोपचार घेत नसतील म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतला असावं. ज्यावेळी लोकांना वेठीस धरलं जातं, रस्ते अडवणं अशा गोष्टी केल्या जातात, तेव्हा न्यायालयीन स्वतःहून याची दखल घेत असते’.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर मुश्रीफ म्हणाले, ‘मी राष्ट्रवादी एकत्र येण्यात संदर्भात भाजपने सूचना केल्या आहेत का याची कल्पना मला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर सुनील तटकरे आणि सुनेत्रा वहिनींनी आमच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली होती. काल पार्थ पवारही मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर या बातम्या सुरू झाल्या आहेत. याबाबतीत आता चर्चा होणार नाही.
22 जुलैपासून आम्ही अजितदादांच्या स्मरणार्थ सेवा सप्ताह साजरा करणार आहोत. त्यानंतर 29 जुलैला पार्थ पवार यांचा साखरपुडा आहे.
यासंदर्भात आता 29 तारखेनंतरच राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक होईल. सर्व आमदार खासदारांच्या समोरच याबाबतीतला निर्णय होईल. सोमवारपासून संसदीय अधिवेशनामुळे आमचे तिन्ही महत्त्वाचे नेते दिल्लीत असतील. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरण आणि एनडीएसोबत जाण्याबाबत आता मुंबईत नाही तर दिल्लीतच चर्चा होईल. मंत्रिपदाबाबत काय ऑफर दिल्या गेल्या आहेत. हे प्रसारमाध्यमामधूनच मला कळतंय’.
मंत्री मुश्रीफ यांनी जयंत पाटील यांच्यावरही भाष्य केलं. ‘जयंत पाटील आणि माझी गेल्या काही दिवसांत चर्चा झालेली नाही.
ईश्वरपूरमधील नगराध्यक्ष अपात्रतेबाबत भेट झाल्याचं जयंत पाटील यांनी स्वतः सांगितला आहे. नगराध्यक्षपद हे लोकनियुक्त असतं.
कार्यकर्त्यांवर अन्याय झाला म्हणून नेता भेटू शकतो. मात्र ते नेमकं कशासाठी भेटले आहेत. हे माझ्यापेक्षा त्यांनाच माहिती असेल, असे मंत्री मुश्रीफ म्हणाले.
प्रफुल्ल पटेल यांच्या नाराजीच्या चर्चेवर मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नाही. सगळ्या नाराजी दूर होतील.
सुनेत्रा वहिनींच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत. आमचा पक्ष एकसंध आहे’. तर राज्यातील अर्थमंत्रिपदाबाबत ते म्हणाले, ‘अर्थमंत्री राष्ट्रवादीला देण्याबाबत सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले आहेत. त्यावर सकारात्मक चर्चा देखील झाली आहे. संसदेचा अधिवेशन झाल्यानंतर यावर चर्चा होईल’.