भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजींना किती वेळा भेटला? उदय सामंताचा विजय वडेट्टीवारांबद्दल मोठा दावा
"माझे आणि एकनाथ शिंदेंचे संबंध राजकारणाच्या पलीकडे आहेत. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा केविलवाणा प्रयत्न केला, तर तो यशस्वी होणार नाही", अशा स्पष्ट भाषेत उदय सामंत यांनी संजय राऊत यांनी केलेला दावा फेटाळला.

“उदय सामंत यांच्याकडे २० आमदार आहे. शिवसेना फोडल्यानंतर आता भाजपा शिंदे गट फोडायच्या तयारीत आहे”, असा मोठा दावा शिवेसना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच पक्षांची फोडाफोडी करणं हे भाजपाचं राजकारण आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला. संजय राऊतांच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. आता या दाव्यावर उदय सामंत यांनी म्हटले आहे.
उदय सामंत यांनी दावोसवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी संजय राऊत, विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “माझे आणि एकनाथ शिंदेंचे संबंध राजकारणाच्या पलीकडे आहेत. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा केविलवाणा प्रयत्न केला, तर तो यशस्वी होणार नाही”, अशा स्पष्ट भाषेत उदय सामंत यांनी संजय राऊत यांनी केलेला दावा फेटाळला.
हा धादांत राजकीय बालिशपणा
संजय राऊत यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं आणि ऐकलं देखील. हा धादांत राजकीय बालिशपणा आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे माझी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला, त्यात मी सहभागी होतो. त्याचमुळे मला राज्याचे दोनदा उद्योगमंत्रीपद मिळाले. याची मला पूर्णपणे जाणीव आहे. त्यामुळे अशा एका सर्वसामान्य नेत्याने माझ्या राजकीय जीवनासाठी मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेत ते मी कधीही विसरु शकत नाही. माझे आणि एकनाथ शिंदेंचे संबंध राजकारणाच्या पलीकडे आहेत. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा केविलवाणा प्रयत्न केला, तर तो यशस्वी होणार नाही, असे उदय सामंत म्हणाले.
मी काही राजकीय एथिक्स पाळतो
“विजय वडेट्टीवारदेखील यावर बोललेत असं कळलं आहे. विजयजी, एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झाले आहेत. मी देखील सर्वसामान्य कुटुंबातून मोठा झालेलो आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्यच कुटुंबातून मोठे झालेले आहात. त्यामुळे मला असं वाटतं की दोन सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती जर एकत्र असतील, तर त्यांना बाजूला करण्याचे षडयंत्र तुम्ही करु नका. कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना किती वेळा भेटलात, याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. पण मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि त्यामुळेच मी कधीही वैयक्तिक बदनामी होईल, अशी टीका करत नाहीत”, असेही उदय सामंत यांनी म्हटले.
मी या अशा षडयंत्राला भीक घालत नाही
“पण एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातील राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करु नये. जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं, ते धादांत खोटं आहे. ते निषेध करण्यासारखं आहे. त्याचा मी निषेध करतो. मी एकनाथ शिंदेंसोबत होतो, भविष्यात ज्या ज्या वेळी त्यांना गरज लागेल, त्या त्या वेळी मी त्यांच्या सोबत असेन. मी या अशा षडयंत्राला भीक घालत नाही. यामुळे आमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही”, असेही उदय सामंत म्हणाले.