‘आम्ही नाराज असण्याचे….’ काय म्हणाले मंत्री उदय सामंत ?
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांचे एकीकडे पडघम वाजत असताना महायुतीतील शिवसेना आणि भाजपात खडाजंगी सुरु झाली आहे.

शिवसेना आणि भाजपात एकमेकांच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी सुरु झाल्याने शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याचे समजते. त्यामुळे आज सरकारच्या कॅबिनेट बैठकीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले यांनी भेट घेऊन नाराजी देखील व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी आपली बाजू मांडली आहे.
राज्यात महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहेत. महायुतीतील दोन्ही पक्षात एकमेकांच्या नेते आणि कार्यकर्त्यांना फोडण्याचे सत्र सुरु झाल्याने शिवसेनेने भाजपावर उघड नाराजी व्यक्त केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीवर एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला आहे. त्या संदर्भात मंत्री उदय सामंत यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच बैठकीला उपस्थित असल्याचे सांगत असेही कोणताही बहिष्कार घातला नसल्याचा दावा केला आहे.
आपण स्वत: बैठकीला मंत्रीमंडळाच्या बैठकीला का उपस्थित राहिलो नाही याचे कारण मी तुम्हाला सांगितले आहे. शंभुराज देसाई का उपस्थित राहिले नाहीत याचे कारण सांगितले. राठोड का उपस्थित राहिले नाहीत याचे कारण सांगितले.योगेश कदम का आले नाहीत याचे कारण सांगितले. आणि माझे रायगड बंगल्यावर येण्याचे कारण तुम्हाला सांगितले.त्यामुळे काही सूत्रांकडून येणारी माहिती ही चुकीची देखील असू शकते असे उदय सामंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी भाजपातील इनकमिंगबद्दल सुरुवात तुम्ही उल्हासनगरातून केली आहे असे या शिंदेंच्या नाराज मंत्र्यांनी म्हटले आहे असे पत्रकारांनी विचारले असता उदय सामंत यांनी तुमची सूत्रे तंतोतंत कसे काय सांगू शकता हे फार मोठे कुतुहलच आहे. आता सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे एकाच बैठकीला उपस्थित आहेत. त्यामुळे नाराजी कशाला असणार ? स्वत: कॅबिनेट मीटींगला एकनाथ शिंदे साहेब उपस्थित होते असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
दावा त्यांनी फेटाळून लावला
आमची गाऱ्हाणी आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगणार नाही तर कोणाला सांगणार एकतर आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगू शकतो किंवा आमचे नेते एकनाथ शिंदे यांना सांगू शकतो, त्यातही काही गैर नाही असे सांगत उदय सामंत यांनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना बगल देत महायुतीत कोणताही बेनाव नसल्याचा दावा केला. भाजपामधील डोंबिवलीतील इन्कमिंगमुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला.
