क्लब हाऊसमध्ये खेळत असलेल्या मुलांना सराईत गुन्हेगाराकडून बेदम मारहाण, पुण्याच्या हायप्रोफाईल सोसायटीतील धक्कादायक प्रकार, राजकीय कनेक्शन पुढे
पुण्यातील एका सोसायटीमधील क्लब हाऊसमध्ये खेळत असलेल्या मुलांना बेदम मारहाण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे एका सराईत गुन्हेगाराने ही मारहाण केलीये. पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केली आहे.

पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील एका हायप्रोफाईल सोसायटीमध्ये मोठा राडा झाला. एका सराईत गुन्हेगाराने चक्क छोट्या वादातून अल्पवयीन मुलांना मारहाण केली. सोसायटीच्या क्लबमध्ये मुले खेळत असताना त्यांच्यामध्ये वाद झाला. यानंतर थेट सराईत गुन्हेगार तिथे पोहोचला आणि पोटात लाथ मारत मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी उपस्थित लोकांनी मध्यस्थी करून समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्या मुलांना वाचवले. हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यात पोहोचले असून गुन्हा देखील दाखल झालाय. मात्र, या घटनेने खळबळ उडाली.
पुण्यातील गहूंजे येथील हायप्रोफाईल समजल्या जाणाऱ्या लोढा सोसायटीत ही घटना धक्कादायक घटना घडली. किशोर भेगडे असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असून तो मावळ विधानसभेची निवडणूक लढवणारे बापू भेगडे यांचा पुतण्या आहे. किशोर भेगडे याच्यावर मारहाण आणि हत्यासारखे गुन्हे दाखल आहेत.
मिळालेली अधिक माहिती अशी की, सोसायटीच्या क्लबमध्ये किशोर भेगडेचा मुलगा आणि त्याची मित्र खेळत होती. यादरम्यान खेळता खेळता या मुलांमध्ये अगदी छोट्या कारणावरून वाद झाला. यानंतर ही गोष्ट किशोर भेगडे याला समजताच त्याने सोसायटीचे क्लब हाऊस गाठले आणि त्या मुलांना बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. यादरम्यान काही लोकांनी त्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
यावेळी शिवीगाळही झाला. या भांडणादरम्यानचा व्हिडीओही व्हायरल झाला असून किशोर भेगडे हा एका मुलाच्या पोटात लाथ मारताना स्पष्ट दिसतोय. यानंतर 15 वर्षीय मुलाच्या नातेवाईकांनी थेट पोलिस स्टेशन गाठले आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. या मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच दहशत बघायला मिळाली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी किशोर भेगडे याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा अधिक तपास हा पोलिसांकडून केला जात आहे.
