ग्रामपंचायतीचा धुरळा: नांदेडच्या तामसामध्ये महाविकासआघाडी पॅटर्न, काँग्रेस शिवेसना नेत्यांची युती

नांदेड जिल्ह्यात तामसा ग्रामपंचायत निवडणुकीतही महाविकास आघाडी पॅटर्न तयार झाल्याचं पाहायला मिळालं आहे. (Tamasa Gram Panchayat Election)

ग्रामपंचायतीचा धुरळा: नांदेडच्या तामसामध्ये महाविकासआघाडी पॅटर्न, काँग्रेस शिवेसना नेत्यांची युती
तामसा ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढलाय

नांदेड: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची (Gram Panchayat Election) रणधुमाळी सुरु आहे. गावोगावी ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रचाराला जोर चढलाय. नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत आजी माजी आमदार मैदानात उतरले आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत (Gram Panchayat) असलेल्या तामसा गावाच्या निवडणुकीत रंगत आलीय. नगरपंचायत दर्जाइतकी मोठी ग्रामपंचायत असलेल्या तामसा (Tamasa) गावावर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे सेनेचे बंडखोर नेते बाबुराव कदम यांच्या विरोधात आजी माजी आमदार रिंगणात उतरले आहेत. बाबुराव कदम यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडी सर्व ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरलीय. यामुळे तामसा येथील निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागलंय. ( MLA-Ex MLA of Congress and Shivsena came together for win Tamasa Gram Panchayat Election in Nanded)

नांदेडमधील सर्वात मोठी बाजारपेठ विकासापासून वंचित

निजामकाळापासून नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून तामसा गावाची ओळख आहे. मात्र, हदगाव तालुक्यातील तामसा या गावाचा अद्याप काहीही विकास झालेला नाही. या गावाच्या विकासासाठी तामसा गावाला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा, अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. तामसा गावकऱ्यांच्या या मागणीकडे शिवसेना आणि काँग्रेसच्या आजी माजी आमदारांनी दुर्लक्ष केले, त्यामुळे मोठे गाव असलेल्या तामसा गावचा बकालपणा कायम आहे. गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यावधीचा खर्च झालाय. मात्र, गावात पाणीच पोहचलेले नाही. हे मुद्दे घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला, असं शिवसेनेचे बंडखोर नेते बाबुराव कदम यांनी सांगितले. त्यांनी सर्व जागेवर आपले उमेदवार उभे केले आहेत.

काँग्रेस आमदार माधवराव पाटील मैदानात

विधानसभा निवडणुकीत बाबुराव कदम यांनी बंडखोरी केली होती. थोड्याश्या मतांनी कदम यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे माधवराव पाटील निवडून आले. मात्र, या धक्क्यातून सावरत बाबुराव कदम यांनी समर्थकांना घेऊन पुन्हा राजकारण सुरू केलय. कदम यांना मोठे समर्थन मिळत असल्याने त्यांच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि शिवसेनेचे माजी आमदार एकत्र आलेत. त्यामुळे तामसा ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरतेय.

तामसा गावामध्ये निवडणुकीचा जोरदार माहौल तयार झालाय. त्यामुळे तामसा इथले सुज्ञ मतदार कुणाला साथ देतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलंय. धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी ही निवडणूक असल्याचे राजकीय निरीक्षकांनी सांगितले आहे. ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी जोरदार सामना रंगणार असल्याचं चित्र आहे.

संबंधित बातम्या:

ग्रामपंचायत निवडणुकीत बेकायदेशीर हस्तक्षेप, शिक्रापूरच्या पीआयविरोधात पॅनेलचं थेट निवडणूक आयोगाला पत्र

देशाच्या सीमांचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांवर निवृत्तीनंतर गावच्या विकासाची जबाबदारी, धोत्रे ग्रामस्थांचा ऐतिहासिक निर्णय

(MLA-Ex MLA of Congress and Shivsena came together for win Tamasa Gram Panchayat Election in Nanded)

Published On - 2:12 pm, Sun, 10 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI