“दर 15 दिवसाला…” राज ठाकरेंनी महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. कामचुकारपणा असल्यास पदावरुन काढून टाकल जाईल असा इशारा त्यांनी दिला.

राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वच पक्षांकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जात आहे. सध्या राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकलं आहे. राज ठाकरे यांनी आजच्या वर्धापन दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांना चांगलीच तंबी दिली आहे. मला कामचुकारपणा दिसला, तर मी त्याला पदावर ठेवता येणार नाही, अशा शब्दात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १९ वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चिंचवडमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी राज ठाकरेंनी जोरदार भाषण केले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने विविध जबाबदाऱ्या देणार असल्याचे सांगितले.
..तर मी त्याला पदावर ठेवणार नाही
“आपली पक्ष संघटना सर्व ठिकाणी आहे. पण ती मजबूत करणं जास्त गरजेचं आहे. गटाध्यक्षाच्या घरच्यांनाही वाटलं पाहिजे माझ्या मुलाची काळजी घेतात. त्याच्याशी कोण तरी बोलतंय. मी त्याला आकार दिला. मी एक गोष्ट लिहून आणली. ती अख्खी नाही. इथे सर्व बसलेले आहेत. माझ्यासकट, प्रत्येकाचं काम काय असणार, ते दर १५ दिवसाला तपासलं जाणार. जर महिना दीड महिन्यात असं जाणवलं, हा पदाधिकारी… तो कोणी का असेना… मला त्याच्यात कामचुकारपणा दिसला तर मी त्याला पदावर ठेवणार नाही”, अशा शब्दात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तंबी दिली.
“आता सांगून ठेवतो. त्यानंतर ज्या फुटपाथवर जायचं असेल तिथे बसावं त्याने. ती गोष्ट यापुढे होणार नाही. काल कोणी तरी सांगितलं. मुंबईत एक बैठक लावली होती. मुंबईतील शाखा अध्यक्ष , उपाध्यक्ष हजर झाले नाहीत. त्यांची हजेरी घेतली. प्रत्येकाला विचारलं, कारणं एक एक दिली. घरचे ते आजारी, हे होतं, ते होतं. पाच सहा जणांनी सांगितलं कुंभला गेलो होतो. म्हटलं गधड्यांनो पापं करता कशाला. हेही विचारलं आल्यावर अंघोळ केली ना”, असेही राज ठाकरे म्हणाले.
12 तारखेला जबाबदारीचे वाटप
“मी १२ तारखेला प्रत्येकाला जबाबदारी देईल. प्रत्येक पदाधिकारी तुम्हाला देईन. सर्व गोष्टी तुम्हाला उघडपणे सांगता येणार नाही. ही संघटनात्मक गोष्ट आहे. याचे रिझल्ट निवडणुकीत दिसले पाहिजे. येत्या ३० तारखेला शिवतीर्थावर यावं”, असे आवाहन राज ठाकरेंनी केले.
