Raj Thackeray-Devendra Fadnavis : मोठी बातमी, राज ठाकरे-फडणवीस ताज लँड एन्ड हॉटेलमध्ये, ठाकरे बंधुंच्या युतीच काय होणार?
Raj Thackeray-Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ताज लँड एन्ड हॉटेलमध्ये आहेत. एकाबाजूला ठाकरे बंधुंच्या युतीची चर्चा सुरु आहे. दुसऱ्याबाजूला मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची भेट होईल अशा चर्चा सुरु आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीआधी मोठा टि्वस्ट पहायला मिळतोय.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात पुढच्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा अशा स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक पक्षाला आपला विस्तार आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करता येते. त्यामुळे सर्वच पक्षांसाठी या निवडणुकी महत्त्वाच्या आहेत. यात मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वात जास्त महत्त्वाची आहे. या निवडणुकीकडे सगळ्या देशाच लक्ष लागलेलं आहे. मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे, हे एकमेव कारण नाहीय, यंदाची निवडणूक एकप्रकारे उद्धव ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे. उद्धव ठाकरे गटातून मागच्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग झालं आहे. त्यामुळे जनाधार टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने मनसे आणि उद्धव ठाकरे गट या दोघांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? ही चर्चा रंगली आहे. दोन्ही बाजूंकडून युती होण्याचे संकेत मिळत आहेत. वरिष्ठ स्तरावर मनसे आणि उद्धव ठाकरे गटात काय बोलणी झालीय? ते माहित नाहीय. पण खालच्या पातळीवर कार्यकर्त्यांच मनोमिलन सुरु झालं आहे. सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत दोन्ही पक्षांनी एकत्र येणं ही गरज बनली आहे. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.
यावर पुढची गणित अवलंबून
दोन्ही ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाची चर्चा सुरु असताना आज मुंबईत एक मोठी घडामोड घडतेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे वांद्रयाच्या ताज ताज लॅंड एन्ड हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. इथे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्या ताफ्यासह दाखल झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये या ठिकाणी भेट होईल अशी चर्चा आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यास ठाकरे बंधुंच्या संभाव्य युतीच्या शक्यतेवर त्याचा काय परिणाम होणार? हे लवकरच समजेल. उद्धव ठाकरे गट महायुतीच्या विरोधात आहे. राज ठाकरे यांचे महायुतीच्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचं उत्तम नात आहे. दोन्ही नेते अनेकदा शिवतीर्थवर येत असतात. त्यामुळे आजची भेट झाली, तर उद्धव ठाकरे गट त्यावर कसा React होणार. यावर पुढची गणित अवलंबून आहेत.
